भासते ते सत्य असतेच असे नाही!

“स्वामीजी, तुम्ही सांगताय की चित आणि जड यात भेद आहे आणि आपण म्हणजे चित म्हणजे चिन्मयता किंवा जीवंतपणा. पण ही केवळ एक शक्यता आहे. आणि शक्यता म्हणजे वास्तव नव्हे!“ मी म्हणालो.

      स्वामीजी हसले आणि म्हणाले, “छान, तू याला एक शक्यता म्हणून स्वीकारलेस, हे छान झाले. दुसरीकडे चिन्मयता किंवा जीवंतपणा हा जड पदार्थचा गुण आहे, हे जे तू मानत होतास, तीदेखील एक शक्यता आहे. बरोबर ना?“ त्यांनी विचारले.

      “हो!“

      “म्हणजे आपल्याला तीन शक्यता मिळाल्या. एक तू जी मानत होतास ती शक्यता. म्हणजे आपण हे अन्नमय आहोत म्हणजे पदार्थापासून बनलेले आहोत. एका ठराविक स्थितीत जड पदार्थ एकत्र आले की मेंदू नावाचा जड पदार्थ तयार होतो. आपली जाणीव ही या जड पदार्थाचाच गुणधर्म आहे. म्हणजे जड पदार्थ आधी आणि जाणीव नंतर. याचा अर्थ खरा मी म्हणजे फूड रिॲरेंज्ड (food rearranged).

      दुसरी शक्यता अशी आहे की जड शरीर आणि चिन्मयता (किंवा जीवंतपणा) या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत. आणि चिन्मयता म्हणजे खरा मी.“

      “ही तुम्ही म्हणताय ती शक्यता झाली. पण तिसरी शक्यता कोणती?“ मी कुतूहलाने विचारले.

      “चिन्मयता आधी आणि जड पदार्थ हा चिन्मयतेची उत्पत्ती!“ स्वामीजी शांतपणे म्हणाले.

      मला याचे हसू आले. पदार्थशिवाय चिन्मयता कशी असू शकेल, हा माझ्या मनातला संशय होता.

      “तुला कधी स्वप्न पडलंय का?“ स्वामीजींनी विचारले.

      “हो!“

      “तू स्वप्नात असताना तुला माणसे दिसली असतील, प्राणी दिसले असतील, झाडे दिसली असतील, गाड्या दिसल्या असतील, घरे दिसली असतील. स्वप्नात असताना तुला कधी हे खोटे आहे याचा संशय आला का? आपण स्वप्न पाहतो आहोत अशी जाणीव कधी स्वप्नात झाली का?“

      “नाही!“

      “जरा सुद्धा ज्याच्या अस्तित्वाचा तुला संशय आला नाही, त्या वस्तू खऱ्या होत्या का? त्या जड पदार्थाच्या वस्तू होत्या का?“

      “नाही. ते मनाचे खेळ होते,“ मी म्हणालो.

      “पण तरीही ते स्वप्न संपेपर्यंत खरे वाटतात. त्यात अशक्य असलेल्या गोष्टी दिसल्या तरी खऱ्या वाटतात,“ ते म्हणाले.

      “हो. जाग येईपर्यंत ते खरेच वाटते,“ मी म्हणालो.

      “स्वप्नात जर आपण स्वतःलाच भ्रमित करता येईल अशी निर्मीती आपले मन करते, मग चिन्मयता जीवसृष्टी निर्माण करत असण्याची शक्यता नसेल का?“ स्वामीजींनी विचारले.

      “स्वामीजी, तुम्ही जसे तर्काने विचार करायला सुचवता तसा दुसरा कोणी अध्यात्मिक माणूस मला भेटला नाही. हे तुमच्या मूळ ग्रंथात आहे की तुम्ही आधुनिक अनुभवातून सांगताय?“ मी विचारले.

      स्वामीजी मोठ्याने हसले आणि म्हणाले, “तुला ग्रंथप्रामाण्य मानायचे आहे का? आदिशंकराचार्य एकदा म्हणाले होते की शंभर शहाण्या माणसांनी अग्नी शीतल असतो असे मला छाती ठोकून सांगितले तर त्यावर विश्‍वास ठेवता येत नाही. आणि हेदेखील लक्षात ठेव, प्रत्येकवेळी अनुभव हे प्रमाण सत्य असतेच असेही नाही.“

      “कसे काय?“

      “आकाश निळे दिसते, पण ते निळ्या रंगाचे आहे का? नाही. आकाशाला रंगच नाही. आकाशाला रंग नाही हे तर्काने पटले तरी ते निळेच दिसते. सूर्य पूर्वेला उगवताना आणि आकाशातून फिरत फिरत पश्‍चिमेला मावळताना दिसतो. पण प्रत्यक्षात पृथ्वीच सूर्याभोवती फिरते.

      उपनिषदे म्हणतात, तुम्हाला विविधता दिसते. असंख्य गोष्टी दिसतात. सतत बदल होताना दिसतो. हा असंख्यपणा, ही विविधता, हा सतत बदल हे सत्य आहे की या भासणाऱ्या गोष्टीमागे काही अपरिवर्तनीय एकमेव गोष्ट आहे. त्यामुळे विविध शक्यतांचा विचार करणे हे अध्यात्मिक माणसासाठी आवश्‍यक आहे,“ स्वामीजी म्हणाले.

-डॉ. रुपेश पाटकर, मो. 9623665321 (क्रमशः)

Leave a Reply

Close Menu