श्रीरामसंकल्पाची नवमी

श्रीराम- बस्स एवढंच लिहिलेली एक पत्र्याची छोटी पाटी आमच्या गावी शेजारी नवीनच वास्तू बांधलेल्या श्री. वायंगणकर कुटुंबियांकडून गृहप्रवेशाच्या प्रसंगी सगळ्यांना भेट म्हणून दिली गेली. आम्ही ती लाल अन पिवळ्या रंगात रंगवून मुख्य दरवाज्यावर लावली. त्याआधी आमच्या गणपतीच्या भिंतीवर श्रीरामचं मोठ्ठ चित्र मामाने काढलेले. श्रीराम समजायला लागला तो हा तेव्हापासून. मात्र पुढे राम अनुभवला तो काहीसा असा-

प्रसंग पहिला ः- बाबरी पतनानंतर साधारण चार वर्षानंतर साधारण १९९६ साली घरी कृष्णधवल टीव्ही आला. त्यावर आई सोबत बसून तो प्रसंग, त्यावरच्या क्रिया आणि प्रतिक्रिया बघितल्या. साधारण दहा वर्षे वयाच्या माझ्या बालमनाला सुद्धा मंदिर का नाही याचं दुःख झालं.

प्रसंग दुसरा ः- घरातला टीव्ही रंगीत झालेला. रंगीत टीव्हीवर बघितलेले अडवाणी, सोमनाथ ते अयोध्या रथ, रथामधले मोदी, याआधी झालेल्या संघर्षाची वेळोवेळी जाणीव करून देत होता. वर्ष साधारण २००७ असेल अन माझं वय वर्ष २१.

प्रसंग तिसरा ः- सन २००९, गोगटे विद्यालय देवगड येथील आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्राथमिक वर्ग. माझं वय वर्ष २२ पूर्ण. एका बौद्धिकच्या वेळी, आम्हाला ज्यू धर्मियांनी शेकडो वर्षांच्या संघर्षानंतर आपलं इस्राईल कसं मिळवलं त्याची कथा आणि त्यामागचा संकल्प कसा असेल हे सांगण्यात आलं. अखंड भारत परत मिळविण्यासंदर्भातील बौद्धिक असावं ते. पण त्याच वेळी श्रीराममंदिराचा ओझरता उल्लेख खूप कष्ट देऊन गेला मनाला. किमान माझ्यापुरता मी त्या क्षणाला बदललो. अजूनही तसाच आहे बदललेला.

प्रसंग चौथा ः- एल. एल. एम.च्या मुंबई विद्यापीठातील एक तास. त्याचवेळी अलाहाबाद उच्च न्यायालयाचा आलेला श्रीरामजन्मभूमीच्या बद्दलचा पदीर्घ चाललेल्या खटल्याचा निकाल नुकताच आलेला. वर्ष साधारण २०१०-११ असेल आणि माझं वय २४ वर्षे. केवळ भांडण सोडविण्यासाठी झालेला निकाल असं स्पष्ट मत मांडण्याची पात्रता आलेली थोडीबहुत.

प्रसंग पाचवा ः- तुलसीविवाह असलेला तो दिवस. म्हणून कदाचित त्रिपुरारी पौर्णिमा असावी. आईसोबत मुंबई ते वेंगुर्ला असा बस प्रवास. बस मधील बिघडामुळे पहाटे पाच वाजता येणारे राजापूर दुपारी दीड वाजता आलेलं. एका हॉटेलला बस जेवणासाठी थांबविलेली. समोरच टीव्हीवर ब्रेकिंग बातमी यायला लागली. वर्ष २०१९ माझं वय वर्ष ३३. श्रीराम जन्मभूमी संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हिंदूंच्या बाजूने.

    मनापासून प्रार्थना आणि एक संकल्प याव्यतिरिक्त काहीही योगदान नसताना माझ्या मनाला का आनंद व्हावा याचा? तरीही तो झालाच. माझ्या सारख्या कोट्यावधी मनांना झाला.

    या राममंदिराच्या संघर्षात गेली पाचशे साडेपाचशे वर्षे झगडणा-या आणि आशेचा किरण जिवंत ठेवणा-या प्रत्येक हिंदू मनाचा हा विजय होता. प्रश्न केवळ मातीचा नव्हता तर श्रध्येचा संस्कृतीचा आणि अस्मितेचा सुद्धा होता. न्याय केवळ कागद पत्रावरच केला जाऊ शकतो या संकल्पनेला छेद देत पार दगड मातीतून खोदून हक्क मिळविला जाऊ शकतो हे अधोरेखित करणारा हा न्यायदेवतेचा सुद्धा विजय होता.

    या धार्मिक अस्मितेच्या स्वातंत्र्यासाठी रक्तपात झाला, मग तो तत्कालीन राज्यसरकारने केलेला गोळीबार असो किंवा कारसेवा करून परतणाया हिंदूंना गोध्रा येथे रेल्वे मध्ये जाळण्याचा प्रसंग असोत किंवा बाबरी पतन झालं म्हणून मुंबईत घडवेलेले बॉम्ब स्फोट असोत. मात्र प्रतिपक्षाच्या रक्ताचा एकही थेंब न मागता मिळालेला हा विजय श्रीरामाच्या आशीर्वादाशिवाय शक्य असेल का?

    बाबरीपतन ते न्यायालयीन संघर्ष ते भूमिपूजन ते मंदिर निर्माण सारं काही कल्पनातित असंच घडून आलंय. प्रत्येकाने आपला राम शोधलाय यात. आपल्या बलिदान देणा-यांनी, ६डिसेंबरच्या दिवशी विवादास्पद बांधकामावर चढणा-यानेरामलल्लाला कापडाच्या मंडपात स्थापित करणा-याने, पुराव्यांसाठी खड्डे खणणा-याने आणि भूमिपूजनाचा खड्डा खणणा-याने सुद्धा शोधलाय. आता रामनामाचा महिमा एवढा झालाय की नास्तिकांनी सुद्धा रामाचा शोध घ्यायला सुरुवात केलीय. असो.

    मला सुद्धा थोडा फार शोधता आलाय या सत्तावीस वर्षांच्या प्रवासात. वर उल्लेखित पाच प्रसंगाव्यतिरिक्त, दादर येथील वास्तव्यादरम्यान श्रीरामजन्मभूमी निधी समर्पण अभियानात माझा खारीचा का असेना वाटा राहिलाय. या अभियानात वस्ती प्रमुख या नात्याने शक्य त्या त्या दरवाज्यावर खटखट केलीय आम्ही. काही कटू अनुभव आणि या शुभ प्रसंगी उल्लेख करू नयेत असे अनुभव सहकार्यांनी सुद्धा अनुभवलेत. मात्र श्रीरामाचे कामं म्हणजे देशाचं काम म्हणून भर कोरोना महामारी दरम्यान सुद्धा घरात बसवून लाडू आणि पाणी देणारी माणसे कशी विसरता येतील? सर्वात कमी असलेली रु. १०/- ची सुद्धा पावती फाडता येत नाही याची जाणीव असलेल्या एका आज्जीने, जमलं तर श्रीरामाचा स्टिकर दरवाज्यावर लावा म्हणून केलेली विनंती ही तर आयुष्यभराची ठेव वाटतेय. सगळाच श्रीराम नामाचा महिमा.

    ‘‘मत्स्यया पासून चारिते नरहरी… श्रीराम सीतापती‘‘ यात सर्वांनाच परशुरामापासून थेट श्रीकृष्णाची आतुरता असताना परमेश्वराने श्रीरामाचा अवतार का घ्यावा? तसा असता तर क्रोधी अन जलद निर्णय घेणा-या परशुरामापासून साम-दाम – दंड – भेद असा श्रीकृष्णावतार अपेक्षित होता. मग अचानक शांत, सोज्वळ श्रीराम कसा काय अवतरावा? या प्रश्नांची उत्तरे कदाचित आपण आज अनुभवतोय. विद्यमान सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनातून. परमेश्वराला सांगायचंय श्रीकृष्ण बनायचं असेल तर आधी राम बनायला शिक.

    श्रीरामनवमीच्या पूर्वसंध्येला हे प्रांसगिक लिहिताना, उद्याची रामनवमी सर्वार्थाने वेगळी, विशेष आणि खरं सांगायचं तर विशेष आहे. संपूर्ण सनातन संस्कृतीसाठी. अर्थातच वर अनुभवलेल्या प्रसंगातून साकारलेले अयोध्यावासी श्रीराम मंदिर हे या यंदाच्या रामनवमीचे वैशिष्ट्य असेल.

    आयुष्यात गेल्या कित्येक पिढ्यांनी गमावलेलं खुप काहीतरी मोठ्ठ आपल्याला मिळालंय. अर्थातच ते मिळवलंय. श्रीरामाने दाखवून दिलेल्या न्यायाच्या मार्गाने. निव्वळ न्यायाच्या मार्गाने. निष्ठा असेल आणि प्रयत्न प्रमाणिक असतील तर यश हे मिळतंच हे आजची रामनवमी अधोरेखित करेल. हा संघर्ष दोन धर्मातील कधीच नव्हता. दोन विचारामधला होता. ‘‘माझं ते माझं अन तुझं ते सुद्धा माझं‘‘ म्हणणा-या प्रवृत्तीला कुठेतरी अडविणारा होता. तसं नसतं तर या सर्वांचा नायक पुरातत्व विभागाचा मुख्य अधिकारी अन्य धर्मीय असून सुद्धा का मान्य केला गेला असता बरं?

    आज एक मोठा विजय मंदिराच्या रूपाने उभा आहे. मात्र त्याचवेळी संपूर्ण जगभरातील मंदिरे आणि हिंदुत्व आणि पर्यायाने आपली संस्कृती जपणारी माणसं यांच्यात चेतना निर्माण झालीये. पुढील कित्येक पिढ्यासाठी.

    केवळ जय श्रीराम या एका शब्द सामर्थ्याने संपूर्ण जगाचा इतिहास बदलून टाकला. त्याचे साक्षीदार आपण झालो. काळ्याकुट्ट पाषाणातील मूर्तीला पहिल्यांदा मंदिरात विराजमान झालेलं बघितलं तेव्हा टीव्ही समोर बसून रामरक्षा म्हणताना आपोआप कोट्ययावधी हात आपसूकच जोडले गेले आणि अर्थातच आनंदाश्रू सुद्धा ओघळले.

    आता या रामराज्यात जबाबदारी आपली वाढलीय. देवभूमीचे घटक असल्याने. अरे परमेश्वराने स्वतः पाचशे वर्षे वाट बघितली तर केवळ स्वतः पुरता विचार करणारे आपण, नको का आता बदलायला? देवाने आपल्या संयमाची परीक्षा घेतली तोच संयम आता टिकवायचा आहे पुढील पिढ्याना दयायचा आहे. देशाला अन स्वधर्माला उच्चपदी विराजमान करून जगाला राममार्ग  दाखवायचा आहे.

    ही रामनवमी अशाच संकल्पाची. अभिमानाची अन श्रीकृष्ण बनण्याआधीच्या श्रीरामाची.

-समीर मधुसूदन घोंगे, उभादांडा – वेंगुर्ला, ९९६००३६१७४

 

 

 

Leave a Reply

Close Menu