संक्रमण काळ आणि युवा पिढी

        Nothing is permanent in this world except change. जगात बदला शिवाय; शाश्‍वत असं काहीच नाही. म्हणजे केवळ बदलच शाश्‍वत आहे. म्हणजेच बदल अनिवार्य असतात. बदल होत असतानाचा मधला कालावधी संक्रमणाचा असतो. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जाणं म्हणजे संक्रमण होय. बदल जेव्हा प्रचंड मोठा असतो तेव्हा त्याची तीव्रता आणि संक्रमण कालावधी मोठा असतो. बदल यशस्वी की अयशस्वी हे संक्रमण काळावर मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. संक्रमण काळातील आपल्या सकारात्मक प्रयत्नांमुळे संक्रमण सुकर होते आणि येऊ घातलेला बदल सहज अंगवळणी पडतो. सूर्याचा मकर राशीत प्रवेश हा संक्रमण काळ असतो. हे संक्रमण सुकर व्हावे ह्याच सदिच्छेने तीळगुळ वाटला जातो. ही भौगोलिक घटना आहे. दरवर्षी घडते. आधुनिक काळात अशा कित्येक संक्रमणां मधून आपले युवक जात असतात. मी युवक म्हणते कारण लहान मुलं पण संक्रमणातून जातात. पण पूर्व स्थिति बाबत पक्की चौकट त्यांच्या मनात नसते. ते संक्रमण काळ हसत हसत पार करतात आणि कोणतेही बदल पटकन स्वीकारतात कारण ते निरागस असतात. याउलट मोठे किंवा प्रोढ प्रगल्भ असतात. अनुभवाची शिदोरी मोठी असते. त्यामुळे संक्रमण सहज निभवतात. पण युवक मात्र संक्रमणावर तुलनात्मक विचार करणारे असतात. ही प्रक्रिया त्यांच्यासाठी फार गुंतागुतीची, क्लिष्ट असते. कारण आधीच्या स्थितीचे ठसे गडद असतात. त्यातून पुढच्या स्थितीत जाणं तसं सोपं नसतं.

      सध्याचा युवक अनेक संक्रमणातून जात आहे. जसे कोवीडपूर्व अभ्यास पद्धती आणि कोवीड नंतरच्या अभ्यास पद्धती हेही संक्रमणच. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे शिक्षण क्षेत्रातलं संक्रमण, युवक म्हणून बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत होणारं आणि कुमारावस्थेतून युवक हे संक्रमण, काळानुरूप नोकरी आणि नोकरीच्या पध्दतींमध्ये होणारं संक्रमण अशा कितीतरी संक्रमणांतून युवक जात आहे.

      मुलं बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत येणं. वय 13 ते 19 हा एवढा मोठा संक्रमण काळ असतो. या काळात अनेक शारीरिक बदल मुलांच्यात होतात. त्यामुळे मानसिक बदल सुद्धा दिसतात. अत्यंत तरल भावना, अलवार मन या संक्रमण काळात मुलांचं असतं. प्रौढांनी केलेल्या चूका, चूकीचं वागणं याबाबत ही मुलं जजमेेंटल बनतात. घरात प्रौढांशी वाद घालतात. शरीरातील बदलांमुळे अस्वस्थता, चिडचिड होते. भिन्न लिंगी व्यक्तीचं आकर्षण वाटू लागतं. परस्परांबाबत जाणून घेण्याची ओढ वाढते. याच काळात अभ्यासाची महत्त्वाची वर्षे येतात. मी नेमका लहान आहे की मोठा हा प्रश्‍न भेडसावतो. कारण खरं तर ही सगळी अर्धवट वयातील संक्रमणावस्थेतील मूलं असतात. हा सगळा वादळी अशांततेचा कालखंड असतो. पण हा संक्रमण काळ आपण पालक, शिक्षक, मार्गदर्शक म्हणून ह्या कुमार आणि युवकांना सोबत घेऊन सुकर करू शकतो. याच वयात युवकांमध्ये खूप उर्जा, नवीन काहीतरी करण्याची उर्मी, स्वओळख जागृत होत असते. ह्याच उफाळलेल्या उर्जेला सकारात्मकतेकडे, सर्जनशीलतेकडे, संशोधनाकडे वळविणे हे आपले काम आहे. ह्या वयात काही जबाबदाऱ्या मुलांवर सोपविणं आवश्‍यक असतं. यातून ते योग्य त्या ठिकाणी गुंतून राहातात आणि नवनवीन शिकत जातात. जसे शाळा – महाविद्यालयातील कार्यक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी सोपविणं. यात त्यांचं खूप शिकणं होतं. संवाद कौशल्य वाढतं, परस्पर आंतरक्रिया करणं जमतं. चर्चा करायला मूलं शिकतात. मुद्दे, मतं मांडतात. मुख्य म्हणजे व्यक्त होतात. चांगल्या कामात गुंतल्यामुळं व्यसन, वाईट संगत यापासून दूर राहातात. याशिवाय कला, क्रिडा, चित्र, गायन, वादन, नृत्य, हस्तकला, लेखन, वाचन यातही त्यांना वाव आणि प्रोत्साहन दिले तर सकारात्मकतेकडे त्यांच्या वादळी कालखंडाचा प्रवास सुरू होतो. मुलं संक्रमणातून जातात तेव्हा ते स्वतः त्याचा एक भाग असतात. ते त्रयस्थ बनून स्वतःला बघू शकत नाही. म्हणून कुमारांच्या, युवकांच्या ह्या संक्रमण काळात पालक, शिक्षक, समाजाची महत्त्वाची भूमिका असते.

      शिक्षणातील संक्रमण आणि कुमार वा युवक ह्यांचा विचार केला तर त्यांच्या सुरवातीच्या वर्षांत म्हणजे मागच्या पंधरा, वीस वर्षापूर्वी आपण त्यांना वयाच्या तीनच वर्षा पर्यंत खेळू दिलंय. तीन वर्षाचे असतानाच वही पुस्तकातून होणाऱ्या, परीक्षा असणाऱ्या अभ्यासास बसविले. आज आठवी नववीत येताच ती शिक्षणास कंटाळली. आपण त्यांना अभ्यासात त्याचं स्वमत विचारलं नाही. विचार करण्यास संधी दिली नाही. मात्र आज नवीन शैक्षणिक धोरणात त्यांना अचानक विचार करणं, मांडणं हे करायचं आहे. पूर्वी आर्टस्‌, कामर्स, सायन्स अशा शाखा होत्या. आता अनेक विषय एकत्र करून अभ्यासक्रम तयार झालेत. आता त्यांच्या समोर अनेक विकल्प आहेत. आवडी प्रमाणं विषय निवडण्याच्या संधी आहेत. हे कुमारांच्या आणि युवकांच्या शारीरिक, मानसिक संक्रमण काळात आलेलं शैक्षणिक संक्रमण आहे. आपली भूमिका म्हणजे मुलांना सहज ठेवणं, योग्य मार्गदर्शन करणं, त्यांच्या भावनांचा, मतांचा आदर करणं. नवीन शैक्षणिक धोरणात असणाऱ्या कौशल्य विकासाच्या संधींची माहिती त्यांना देणं आवश्‍यक आहे. शिक्षणातलं अपयश म्हणजे आयुष्यातलं अपयश नव्हे. हे देखील नवे शैक्षणिक धोरण सांगते. शिक्षण आणि उपजीविका ह्यांचा संबंध ह्या धोरणात जोडलेला आहे, त्यासाठी या धोरणात केलेल्या योजना कुमारांना सांगायला हव्यात. कोणत्याही टप्प्यावर अर्धवट सुटलेलं शिक्षण फुकट वाया जात नाही, ते पुन्हा जोडता येतं ही योजना, हा विश्‍वास; हे धोरण देतं हे मुलांसमोर मांडणं आवश्‍यक आहे. मग कुमार आणि युवकांची जीवनाबाबतची सकारात्मकता वाढून आणि शिक्षणावरची श्रद्धा दृढ होईल यात शंकाच नाही.

      हे सर्व साध्य होण्यासाठी कुमार आणि युवकांशी मुक्त संवाद झालाच पाहिजे.

– प्रा. सोनाली अनिल खर्चे, मो. 8080711513

Leave a Reply

Close Menu