जन्मस्थळ दर्शन श्‍यामच्या आईचे

पूज्य साने गुरूजीच्या शतकोत्तरी रौप्यमहोत्सवी जन्मवर्षानिमित्त

      ‘आई माझा गुरू, आई माझा कल्पतरू! सौख्याचा सागरू, आई माझी!’ असे भावोत्कट उद्गार उभ्या महाराष्ट्राला देणाऱ्या संस्कारभूषण पांडुरंग सदाशिव साने उर्फ साने गुरुजींचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्ष! एक प्रासादिक लेखक, थोर स्वातंत्र्यसेनानी, प्रतिभासंपन्न शिक्षक, चैतन्याचा महोदधि, चंदनाप्रमाणे देह झिजविणारा आधुनिक संत, शिक्षणाच्या माध्यमातून नवनिर्माण करणारा थोर शिल्पकार, प्रकाशाची उधळण करणारा देवदूत, आंतरभारतीचा ध्यास घेतलेला विश्‍वमानव, आदी शेकडो सानेगुरूजींना जनतेकडून प्राप्त झालेली बिरुदे तराजूच्या एका पारड्यात टाकली आणि दुसऱ्या पारड्यात मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र सानेगुरूजींची श्‍यामची आई हे पुस्तक घातले तर निश्‍चितच महाराष्ट्रातील चार पिढ्यांच्या प्रेमाने जड होऊन ते पारडे खाली जाईल, एवढे प्रेम त्या पुस्तकाला प्राप्त झालेले आहे. यात दुमत असण्याचे कारण नाही. गेल्या शतकातील सर्वाधिक खपाचे पुस्तक म्हणून या पुस्तकाला नावलौकीक प्राप्त झाला आहे. संख्यात्मक नाही तर केवळ गुणात्मकच.

      साने गुरूजींना पूज्य आई यशोदा लाभली. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील पालगड गावी आणि उभ्या महाराष्ट्राला श्‍यामची आई मिळाली ती नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील एका कोठडीमधून! तीही आई तेवढीच लोकप्रिय झाली आणि अजरामरही झाली. एका शुभदिनी, गुरूवारी 9 फेब्रुवारी 1933 या दिवशी रात्री सानेगुरूजींनी हे पुस्तक लिहायला घेतले आणि सोमवार दिनांक 13 फेब्रुवारी 1933 ला पहाटे अवघ्या साडेचार दिवसात हे मातृप्रेमाचे महन्मंगल स्तोत्र लिहून हातावेगळे केले. एवढे गुरुजीचे हृदय आईच्या प्रेमाने भरून गेले होते. ते रिते व्हायला वेळ लागला नाही. ये हृदयीचे ते हृदयी सहजरित्या गेले. हे महाराष्ट्रातील मुलांचे महद्भाग्य!

      1932 साली स्वातंत्र्य आंदोलनात सानेगुरुजीना शिक्षा झाल्यावर त्यांना नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले तेथे त्यांचे सहकारी राजबंदी नवल आनंद पाटील आणि अन्य मित्रांनी सानेगुरुजीना विनंती केली. गुरुजी तुमच्या बालपणीच्या आठवणी आम्हाला सांगा. साने गुरूजींचे हृदय बालहृदय होते. त्यांना राजबंद्यांचा आग्रह मोडणे कठीण झाले. दिवसभर कारागृहात नेमलेले काम करणे त्यानंतर त्या आठवणी क्रमशः लिहून काढून मित्रांना सांगणे सुरू झाले. या पुस्तकात एकूण 42 प्रकरणे आहेत. त्यांना 42 रात्री असे संबोधण्यात आलेले आहे. अवघ्या 421 रात्रीत सामावलेली ही आईची प्रेमस्वरूप आणि वात्सल्यपूर्ण कथा म्हणजे मातृप्रेमाने दुथडी भरून वाहणारी गंगाच होय. ह्या गंगेचा उगम ज्या कैद्याच्या कोठडीत झाला ते पवित्र ठिकाण ती पांडुरंगाची पंढरी बघण्याचे आणि तेथे जाऊन आठ दिवस राहण्याचे भाग्य कथामालेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मला जवळ जवळ 3 दशकापूर्वी प्राप्त झाले.

      जून 1995 च्या सुमारास नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात अधिक्षक म्हणून मा. दवणे साहेब आले होते. दवणे साहेबांवर सानेगुरूजींच्या विचाराचा दांडगा प्रभाव होता. त्यावेळी त्या कारागृहाची क्षमता जवळ जवळ दोन हजार कैद्यांची होती. काही कैद्यांना ‘श्‍यामची आई’ ह्या पुस्तकातील एक एक प्रकरण रोज वाचून दाखवायचा एक नवीन प्रयोग दवणे साहेबांनी सुरू केला. काही कैद्यांच्या मनावर आणि जीवनावर ते पुस्तक फारच परिणाम करून गेले. त्या कैद्यांमध्ये जवळ जवळ पाचशे सानेगुरूजीप्रेमी कैद्यांचा एक गट तयार झाला. त्यांनी ज्या कोठडीत सानेगुरूजीनी श्‍यामची आई सांगितली ती कोठडी श्‍यामची आई पुस्तकातील प्रसंग चित्रांनी चितारली. त्या खोलीचा अंतरंग बदलून टाकला. तेथे कैद्यांची श्‍यामची आई पुस्तकांवर कथाकथनाचे कार्यक्रम होऊ लागले. सानेगुरूजी कथामाला त्या बराकीत सुरू झाली. मा. दवणेसाहेबांचा हा नवाप्रयोग महाराष्ट्रात सर्वत्र गेला आणि ही बाब सानेगुरूजी कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या कानावर गेली. त्यावर्षीचा अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा राष्ट्रीय पुरस्कार मा. दवणे साहेब अधिक्षक, मध्यवर्ती कारागृह नाशिक रोड यांना जाहीर झाला. सरकारच्या परवानगीने आठ दिवसाचे कैद्यांसाठी संस्कार शिबिर कारागृहात घेण्याचे ठरले. ज्या खोलीत श्‍यामच्या आईचा जन्म झाला ती गुरुजींची कैदेच्या खोलीला एका आगळ्या स्मारकाचे रूप देण्याचा कार्यक्रम ठरला आणि त्या कैद्यांच्या सानिध्यात आठ दिवस राहाण्याचा त्यांचे विचार रहाणीमान आणि बदललेले संस्कार जाणून घेण्याचा कार्यक्रम ठरला. आले प्रकाशभाई मोहाडीकरांच्या मना तिथे कोणाचे चालेना! आमचे सोबत स्वतः कै. प्रकाशभाई, कै. राजाभाऊ मंगळवेढेकर, कै. यदुनाथ थत्ते, कै. मधुकरराव चौधरी, कै. नरूभाऊ लिमये आदी प्रत्येक पूजनीय माणसे, की ज्यांना सानेगुरूजीचा चिरसहवास लाभला अशी माणसे होती. आम्ही राष्ट्रीय स्तरावरील तरुण वीस- बावीस कार्यकर्ते होतो. माझ्या आयुष्यातील तर तो सोन्याचा क्षण! ती खोली प्रत्यक्ष बघण्याचा तेथे वास्तव्य करण्याचा आणि तेथील अलौकीक आठवणी मनात साठवून ठेवण्याचा.

      आठ दिवसात विविध कार्यक्रम झाले. बंदिवान बांधवांचे करमणूकीचे कार्यक्रम, त्यांचे कवि संमेलन, त्यांची कथाकथने! त्यांच्या कविसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रकाशभाई मोहाडीकरांनी कुसुमाग्रजांना निमंत्रित केले होते. राजाभाऊ मंगळवेढेकरांचे कैद्यांसाठी कथाकथन, यदुनाथ थत्ते यांचे ‘प्रतिज्ञ’ या विषयावर प्रबोधन, मधुकरराव चौधरी यांचे शैक्षणिक विचार, प्र. दी. पुराणिक यांचे सुंदर पत्रांचे वाचन, स्वतः प्रकाशभाई मोहाडीकरांचे सानेगुरूजींचे मंगल विचार आदी अनेक कार्यक्रम झाले. त्यात मा. दवणे साहेबांचा सत्कार झाला. तुरुंगातील सर्व विभाग आम्ही फिरून बघितले. त्यांची स्वच्छता, टापटीपपणा पाहून भारावून गेलो.

      मी आठ दिवस तेथील काही कैद्यांच्या एका गटाला रोज सायंकाळी एका झाडाच्या पाराखाली शुभं करोती सांगायचो. प्रत्येक कार्यकर्त्याला एक एक गट प्रकाशभाईंनी वाटून दिलेले होते. ते जन्मठेप झालेले कैदी अगदी भावुक होऊन ‘शुभं करोती कल्याणम’ म्हणायचे. त्यानंतर ‘आस ही तुझी फार लागली’ अशी गीते व्हायची. नंतर साने गुरूजींच्या श्‍यामची आई पुस्तकावर आधारित कथा व्हायच्या. त्या आगळ्या वेगळ्या शुभंकरोतीने ते जन्मठेप झालेले कैदी भारावून जायचे. त्यातील एक कैदी मला म्हणाला अशी शुभंकरोती आज आम्ही प्रथमच ऐकतो. आमच्या कानावर अशा प्रार्थना, अशी गीते आणि आमच्या मनावर बालपणीच ‘श्‍यामची आई’ सारखे पुस्तक विराजमान झाले असते तर आमच्यावर ही वेळ आलीच नसती. तो कैदी बांध फुटल्यासारखा भरभरून बोलत होता. मी मात्र सुन्न झालो. संस्काराचे एका पुस्तकाचे आगळे महत्त्व त्या दिवशी मनावर एक नवीन विचार रेखांकीत करून गेले. चांगल्या साहित्याचे किती लाभदायक परिणाम जीवनावर होतात हे मी अगदी जवळून पहात होतो. हृदय हेलावून टाकणारे संस्कार! हे सर्व त्या ‘श्‍यामच्या आई’ पुस्तकाच्या जन्मस्थळांवर नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात मी अनुभवित होतो.

      आठ दिवसानी तेथील संस्कार शिबिर संपवून सर्वांच्या भिजक्या डोळ्यांनी निरोप घेऊन आम्ही परतलो. एका पुस्तकाचा जन्म ज्या खोलीत झाला त्या खोलीचे एका आईच्या मायेचा पाझर जेथे फुटला त्या पवित्र स्थळाचे दर्शन घेऊन आणि नवीन विचार घेऊन आम्ही निघालो. काय त्या एका पुस्तकाची महती! मला त्या क्षणी आचार्य अत्रे यांचे विचार आठवले. जगामध्ये आजपर्यंत अनेक कवींनी आणि लेखकांनी आई संबंधी लिहीलेले असेल. कविता केल्या असतील, गोष्टी लिहील्या असतील, पण मराठी भाषेत साने गुरूजींनी श्‍यामची आई मध्ये मातृप्रेमाचे जे महान स्तोत्र रचून ठेवलेले आहे असे अतीव माधुर्याने आणि मांगल्याने ओथंबलेले महाकाव्य दुसऱ्या कोणत्याही वाङ्मयात असेल असे मला मुळीच वाटत नाही.

      अशा ह्या गंगोत्रीच्या उगमस्थानाचे दर्शन स्वर्गीय प्रकाशभाई मोहाडीकरांच्या प्रेमामुळे आम्हा कार्यकत्यांना घडवले. ज्यावेळी मी पूज्य साने गुरूजींचे ‘श्‍यामची आई’ हे पुस्तक हातात घेतो, त्या त्या वेळी माझ्या नजरेसमोर ती नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहाची कोठी दिसू लागते आणि त्या महापुरुषांच्या जन्मस्थळांतून उमटलेले ध्वनी, मंत्रघोषाप्रमाणे माझ्या कानात आणि मनात रूंजी घालू लागतात.

      “आई माझा गुरू! आई माझा कल्पतरू! सौख्याचा सागरू! आई माझी!! प्रितीचे सागर! आई माझी ! प्रितीचे सागर! अमृताची धार! मांगल्याचे सार! आई माझी!

– श्री. सुरेश शामराव ठाकूर, आचरे-मालवण मोबा. 9421263665

Leave a Reply

Close Menu