तयार करू मनांना, झेलण्या सर्व आव्हानांना

‘भोलानाथ उद्या आहे गणिताचा पेपर, पोटात माझ्या कळ येऊन दुखेल काय रे ढोपर’ हे बडबड गीतातील बोल अल्लड मनाच्या आशादायी भावनांना खूप मजेशीर पद्धतीने रेखाटतात. पण जीवनात येणाऱ्या खऱ्याखुऱ्या आव्हानांना पेलताना ह्याच गीतातील बोलांप्रमाणे आपण सगळेच आपली अक्षमता झाकण्यासाठी अशा पळवाटा शोधत असतो; असे मानसशास्त्र सांगते. झपाट्याने वाढणारी स्पर्धा आणि स्वतःला कौशल्यपूर्ण बनवण्यासाठी सतत लागणारा कस या चित्रामुळे जर का मन कमकुवत झालं असेल तर अशावेळी पटकन सुचणारी आणि सगळ्यात सोपी पळवाट ही शारीरिक आजारपणाची असते. विशेषतः शालेय विद्यार्थी गटात ही पळवाट जास्त प्रकर्षाने आपल्याला दिसून येते.

      आपल्यामधल्या अक्षमतेमुळे एखादी गोष्ट मिळवता आली नाही यापेक्षा कोणत्यातरी शारीरिक व्याधीमुळे किंवा कमजोरीमुळे आपण यश मिळवू शकलो नाही हे स्पष्टीकरण जास्त सुखावणारे असते. आपल्यामधला अहम दुखावू नये याकरता अशा काही गोष्टींचे पांघरूण त्यावर चढवले जाते. स्वतःमधल्या अक्षमतेपेक्षा शारीरिक व्याधींमुळे इतरांकडून मिळणारी सहानुभूती केव्हाही आपला अहम जपणारी असते. यालाच ‘मानसशास्त्रीय संरक्षण यंत्रणा’ म्हटले जाते. थोडक्यात स्वतःचा स्वाभिमान दुखावेल अशा प्रसंगाच्या वेळी भावनिक आवाहन केव्हाही उपयोगी पडते, जे अशा शारीरिक व्याधींच्या स्वरूपात वापरले जाते. कित्येकदा शरीरांतर्गत कोणताही दोष सापडत नसताना केवळ मागे लागलेल्या दुखण्याच्या बाबतीत अशा पद्धतीची देहिक लक्षणे ही याच मानसिकतेतून उद्भवयाला लागतात. यासोबतच भ्रमिष्टपणा निर्माण होण्याची कारणे ही यातीलच असतात. वास्तवामध्ये वाट्याला येणाऱ्या आव्हानांना व्यावहारिक दृष्ट्या सामोरे जाताना  आपल्या कार्यक्षमतेवर येणाऱ्या स्वाभाविक मर्यादा अशावेळी मान्य करणे क्रमप्राप्त असते. खोट्या आणि आभासी क्षमतेची प्रदर्शने करत फिरताना केवळ इतरांकडून नापसंती, अपमान अथवा निंदा नको या कारणामुळे तात्पुरत्या स्वरूपात केल्या गेलेल्या ह्या उपायांचे मानसिकरित्या नकारात्मक असे दूरगामी परिणाम भोगावे लागू शकतात.

      बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे घराघरात होणारा संवाद कमी होत जाताना दिसतो आहे. अशातच पालकांनी आपल्या पाल्याच्या बाबतीत अशा स्वरूपाच्या तक्रारी वाढत असतील तर विशेष जागरूकता दाखवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या अंतिम परीक्षांचे दिवस जवळ आलेले असताना अशा प्रकारची लक्षणे सर्रास दिसून येतात. अभ्यासाचा वाढणारा ताण, अपेक्षा, करिअरच्या बाबतीत कानावर पडणारे संघर्ष या सगळ्याच मुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी पालकांनी आपल्या पाल्यासोबतचा एक मोकळा संवाद चालू ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही तणावामुळे, भीतीमुळे जर का अशी लक्षणे दिसू लागली तर तो तणाव कमी होण्याकरता जी भावनिक मदत आपल्या पाल्याला अपेक्षित आहे ती जरूर पुरवावी.

      आपण स्वतः पुरेसे कार्यक्षम नसून देखील समाजाकडून आपल्याला सतत आपलेपणा आणि संमती मिळत राहावी या प्रेरणेतून काही वेळेला आपण क्षमता पूर्ण आणि परिपूर्ण असण्याचा खोटा अविर्भाव किंवा ढोंगीपणा साकारतो. यातूनच अशा मानसिक परिस्थिती निर्माण होत जातात आणि त्यातून शारीरिक कारण नसून देखील वेदनांचा भ्रम निर्माण होतो. वास्तवापासून दूर नेणारा भ्रमिष्टपणा, विस्मरण, विनाकारण काही कृती परत परत करण्याची नकळत सक्ती निर्माण होणे अशी काही विक्षिप्त लक्षणं अचानक पणे दिसायला लागतात आणि मग प्रवास सुरू होतो तो मानसिक आजाराचा. त्यामुळे स्वतःला ओळखत स्वतः मधल्या क्षमता आणि कमतरता लक्षात घेत वास्तवामध्ये जगण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन केले पाहिजे. आपलं वास्तविक प्रत्यक्ष जीवन आणि आपल्याला अपेक्षित एक आदर्श जीवन यामध्ये आपण सतत तुलना करत असतो. आपल्या स्वतःच्या ऐपतीनुसार आदर्श पातळी गाठण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. विद्यार्थी दशेत ह्या बाबतीतला पुरेसा समजूतदारपणा नसल्यामुळे अशा परिस्थितीला आरोग्यपूर्ण पद्धतीने हाताळणे अवघड होते. सोयीस्कर रित्या मानसशास्रीय संरक्षण यंत्रणा वापरणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु त्याची व्याप्ती आणि वारंवारता मर्यादित ठेवणे आणि आभासी जगात वावरण्यापेक्षा प्रत्यक्ष वास्तवामध्ये स्वतःला टिकवून ठेवणे महत्त्वाचे ठरते. वयाबरोबर ह्याची जाणीव वाढत जाणे अपेक्षित असते मात्र लहानपणी ह्या गोष्टी हाताळण्यासाठी पालकांच्या मार्गदर्शनाची गरज असते.

      स्वतः जसे आहोत तसे व्यक्त होत वाढीव ढोंगीपणा टाळणे, स्वतःच्या कमतरता मान्य करून त्यांचं क्षमतेमध्ये रूपांतर करण्यासाठी प्रयत्न करणे, जमेल तेवढे वास्तवाबरोबर आपला संपर्क टिकवून ठेवणे, प्रामाणिकपणे आणि विनम्रपणे थोरामोठ्यांचं मार्गदर्शन घेणे असे उपाय आपल्याला फायद्याचे ठरतात.

      जीवनात येणारी आव्हानं काही वेळा नक्कीच आपल्या क्षमतांचा कस लावणारी असू शकतात. पण अशावेळी वेळेचं नियोजन करणे, योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन घेणे, श्रद्धा, उपासना यासोबत अध्यात्मिक शक्तीची साथ मिळवणे असे काही उपाय करता येतात. शिवाय मानसिक आरोग्यासाठी मानसशास्त्र अभ्यासक आहेतच. त्यामुळे आपल्या मनाला कणखर बनवण्याच्या प्रवासात नक्कीच एकटेपणा न वाटता आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होऊ या. समस्या म्हणून न बघता त्याच्याकडे स्वतःला समृद्ध करण्याची संधी म्हणून बघूया.                                         – पियुषा प्रभूतेंडोलकर-सामंत, एम.ए. सायकॉलॉजीस्ट, 7020242216

Leave a Reply

Close Menu