रिस्टार्ट अँड रिचार्ज

भारतातील प्रत्येक घरात कुणी ना कुणी बडा सरकारी अधिकारी व्हायचं स्वप्न पाहिलेलं असतं… मग ते घर श्रीमंत असो, मध्यमवर्गातील असो किंवा अगदी तळागाळातील असो. आपल्याकडे सरकारी नोकरी म्हणजे आयुष्य ‘सेटल्ड’ झालं असं समजण्याचा जो एक प्रघात आहे तो बहुतांशी खरा सुद्धा आहे. बऱ्याच ठिकाणी सरकारी पातळीवर यंत्रणा ही ‘भ्रष्ट’ कार्यपद्धतीने चालते हे आपल्या देशातील ‘निर्लज्ज गुपित’ आहे जे की सर्र्वांना ठाऊक आहे. कधी एखाद्या सरकारी कारकूनाकडे इन्कम टॅक्सची धाड पडते तेव्हा, त्याने नोकरी मिळाल्याच्या अल्पावधीत जमवलेली कोट्यवधीची संपत्ती बघून आपले डोळे पांढरे होतात. सगळेच भ्रष्ट असतात असं नाही पण इमानदार अधिकाऱ्यांची यादी फार लवकर संपते ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

      जे या कठोर परिश्रम करून या परीक्षा देऊन यशस्वी होतात, ते मोठे अधिकारी बनल्यावर उराशी जे स्वप्न घेऊन मिडियासमोर जी आदर्श उत्तरे देत असतात ते खरोखरच या भ्रष्ट यंत्रणेला उलथवून टाकतात का? का यशस्वी झाल्यानंतर आपल्या निरागस क्रांतीच्या स्वप्नांना तिलांजली देतात? आणि तेही याच यंत्रणेचा भाग होऊन जातात? दुर्दैवाने बहुतांशी लोकांचा या भ्रष्ट यंत्रणेचा भाग होऊन जाणे हे खेदजनक आहे. पण दुर्दैवाने ती वस्तुस्थिती आहे.

   “ये एक जमी जमाई व्यवस्था है”. ही व्यवस्था न सुधारणे हे आपल्या देशाचे एक मोठं सार्वजनिक दुःख आहे, ज्याची झळ प्रत्येकाला अप्रत्यक्षपणे बसत असते. सर्वसाधारणपणे आपण सिनेमा बघत असताना त्यातील चुका शोधत असतो. “छ्या, असं थोडीच घडतं खऱ्या आयुष्यात? इतकं भाबडे कोणी असतं का आत्ताच्या जमान्यात? छे! काहीही दाखवतात.” 12 वी फेल हा सिनेमा पाहत असताना, सुरुवातीला माझ्या डोक्यात असेच येत होते आणि समरस होता येत नव्हते. पण मग पडद्यावर समोर घडणाऱ्या कथानकाने वेग पकडला.

            काही अपेक्षित आणि काही अनपेक्षित वळणांनी पटकथा पुढे जाऊ लागली. त्यातील मुख्य पात्राचे, म्हणजे मनोज शर्माचे निरागस हास्य, त्याची जिद्द, कष्ट घ्यायची तयारी, त्याचा सच्चेपणा मनाला भिडत गेला. इतर पात्रांच्या बोलण्यातून, देहबोलीतून त्यांच्या संघर्षाच्या कथा उलगडू लागल्या. गुंतणे अटळ होऊन गेले. आणि मग एका बेसावध क्षणी सगळे मुखवटे गळून पडले… आणि डोळ्यात पाणी आलंच. चंबळच्या खोऱ्यातल्या एक चिमुकल्या खेडेगावात शिकणारा मनोज शर्मा हा साधासुधा तरुण. बापाने गावातील भ्रष्टाचार उघडकीस आणला म्हणून त्याच्या नोकरीवर गदा आलेली. मोठा मुलगा मनोज बारावी पास होऊन कुठे तरी चपराशी वगैरेची नोकरी मिळवेल म्हणून कुटुंबीय त्याच्याकडे नजर लावून बसले आहेत. पण नेमके परीक्षेच्या वेळी एक पोलिस निरीक्षक येऊन केंद्रावरील कॉपी थांबवतो आणि कॉपीवर सर्वथा अवलंबून असलेल्या सर्वांची आणि मनोजचीही वाट लागते. आणि तो बारावी फेल होतो. भ्रष्ट आमदार, सुस्त व्यवस्था ह्यामुळे त्याचे कमाईचे इतर प्रयत्न देखील सपशेल फेल जातात. चहाच्या टपरीवर चहा पिणारा एक यशस्वी ठरलेला विद्यार्थी म्हणतो.. “कुठून कुठून मेंढरांसारखे येतात परीक्षेच्या कोचिंग साठी.. आणि त्यांना मिळत तर काहीच नाही.” यावर गौरी सर उसळून म्हणतो.. ”हो मेंढरंच खरी. पण या हजारो मेंढरांमधला एखादा कोणी पुढे जातो, तेव्हा त्याची सरशी ही त्या उरलेल्या मेंढरांची पण सरशी असते.” एकदम मनाला भिडलं. आदर्शवादी मूल्यांची आपण वरवर टिंगल केली तरी असं खरंच व्हावं असं आपल्याला वाटत असते. सत्याचा विजय खऱ्या आयुष्यात नाही झाला, तरी निदान पडद्यावर व्हावा अशी मनोमन इच्छा असतेच की आपली! शेवटच्या मुलाखतीमध्ये मुलाखत घेणारे विचारतात, तू बारावी फेल झाला होतास. तुला असं वाटते, की IIT, IIM झालेल्या लोकांपेक्षा तू जास्त हुशार आहेस? तेव्हा मनोज म्हणतो.. “नाही मुळीच नाही. पण त्यांच्यापेक्षा मी जास्त योग्य आहे. कारण जे मी पाहिलेले, अनुभवलेले आहे ते त्यांच्या पुस्तकी ज्ञानापेक्षा कितीतरी पटीने सरस आहे.”

      अंतिम लक्ष्य गाठू न शकलेल्या; म्हणजे मुलाखतीची फेरी गाठणाऱ्या अन्य उमेदवारांना खासगी क्षेत्रात योग्य संधी मिळण्याची व्यवस्था अस्तित्वात आहे का याची कल्पना नाही. परंतु तशी व्यवस्था असायला हवी हे मात्र खरे असे चित्रपट बघितल्यावर जाणवते.

      हार नहीं मानुंगा… Restart… हा मुलमंत्र जपत 12th Fail चित्रपटाची सुरुवात होते. हा चित्रपट सुरू होतो तो व्यवस्थेच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या माणसाच्या गोष्टीनं. नायकाचे वडीलच भ्रष्ट्राचाराचे बळी ठरलेत आणि त्या विरोधात आवाज उठवताहेत. तसेच चंबळच्या खोऱ्यातल्या एका गावात आणि कॉलेजमध्ये मात्र वर्षानुवर्ष विद्यार्थी कॉपी करून पास होताहेत. कारण धनदांडग्या आमदाराचं कॉलेज नीट चालायला हवं. या असत्याच्या पार्श्‍वभूमीवर एका गरीब, सामान्य मुलाच्या जीवनाचा प्रवास सुरू होतो. समाजातल्या दुर्बल गटातला नायक, जगण्याचा संघर्ष करताना त्यांच्यावर होणाऱ्या अनेक प्रकारच्या अन्यायाचं सहज पण प्रभावी चित्रण बघता बघता आपण नकळतपणे आपल्या नायकाच्या बाजूने होतो. अठरा विश्‍व दारिद्य्र, शिक्षणाचा अभाव, नाडलेल्याला अजून नाडणारी व्यवस्था, स्वार्थी माणसांचा कोडगेपणा यावर भाष्य करत चित्रपट पुढे सरकत राहतो. भारतातल्या वर्षानुवर्ष काळ्या रंगाने माखलेल्या व्यवस्था बदलायला जेव्हा एक माणूस पुढे येतो तेव्हा त्या व्यवस्थेला हादरे नक्कीच बसतात आणि आज अशा झोपेच सोंग घेतलेल्या व्यवस्थेला हादरे देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांची भारताला गरज आहे. सत्याचा हा प्रवास अतिशय उत्कटपणे पडद्यावर मांडण्यात विधु विनोद चोप्रा यशस्वी झाले आहेत. असे अनेक मनोजकुमार शर्मा आपणही घडवू शकतो, नव्हे त्यांच्यावर लहानपणापासून योग्य संस्कार करून ते आपल्याला घडवायला हवेत असा संदेश हा चित्रपट देतो. प्रत्येक गावात शहरात एक जरी मनोजकुमार शर्मा निर्माण करण्यात आपण यशस्वी ठरलो तर भारतातील भ्रष्ट व्यवस्था बदलायला वेळ लागणार नाही. विक्रांत मेस्सी हा एक सामान्य दिसणारा, पण असामान्य रित्या व्यक्त होणारा चेहरा नायक म्हणून निवडून अर्ध काम फत्ते झालं आहे. या चित्रपटात तो ही भूमिका अक्षरशः जगला आहे. उत्कृष्ट बांधलेली पटकथा, अतिशय वास्तववादी चित्रण, उत्कृष्ट दिग्दर्शन आणि कलाकारांचा सहजसुंदर वावर, ही या चित्रपटाची बलस्थानं आहेत.

      आपल्या देशाची शिक्षण व्यवस्था त्यावरही “12th Fail” सिनेमा प्रभावीपणे भाष्य करतो मुळात हा सिनेमा 1997 ची गोष्ट सांगतो पण आजही 2024 सालात अगदी तीच परिस्थिती आहे. किती सरकार आले-गेले, बदलेले पण ही परिस्थिती काही बदलली गेली नाहीय. आजही “आहे रे” वर्ग आणि “नाही रे” वर्गातील दरी प्रचंड प्रमाणात वाढलीये. तळागाळातील लोकांच्या हातात आपल्या यंत्रणेने मोबाईल पोहचवला आहे पण, त्यांच्या उत्कर्षासाठी लागणारी संसाधन अजूनही पोहचू शकला नाही.

      स्पर्धा परीक्षांना बसणारी मुले लक्षावधी असतात. त्यापैकी केवळ काही शे मुले अंतिम लक्ष्य पार करू शकतात. बाकीच्यांचे काय? मला वाटते त्याचे उत्तर अखेरच्या मुलाखतीत दिले आहे. आपला नायक मुलाखतीसाठीची उत्तरे पढवून घेतलेला नाही. खरे तेच बोलणारा आहे. त्यामुळे पोलिस अधिकारी बनण्यासाठी माझी निवड झाली नाही तरी मी देशाला उपयोगी पडेल असेच काही करेन; अगदी शिक्षक बनेन, असे हा सांगतो. हा संदेश अतिशय महत्त्वाचा आहे. चित्रपटात दाखवलेली शिक्षणाची आजही सुमार असलेली व्यवस्था चंबळमध्ये कशाला; सर्व देशात आढळेल. शिक्षकांचा दर्जा सुधारण्याऐवजी मुलांना घाऊकपणे वरच्या वर्गात ढकलण्याची अफलातून व्यवस्था उभी करण्यात आपण यशस्वी ठरलेलो आहोत. गंमत म्हणजे याची खंत कोणालाच नाही. तुम्ही अथक परिश्रम घेणे पुरेसे नसते; तर ते श्रम योग्य दिशेने घेतलेले असायला हवेत, हा आणखी संदेशदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. या चित्रपटात एका डीएसपीकडून प्रेरणा घेतलेला चंबळमधील अतिसामान्य मुलगा आयपीएस अधिकारी बनलेला दाखवला आहे. आनंदाच्या भरात एक कनिष्ठ अधिकारी आपला वरिष्ठ बनून आलेल्या अधिकाऱ्याला ‘शाबाश सर’ म्हणून मिठी मारताना पाहणे हे खरोखर विलक्षण आहे.

      चंबळ खोऱ्यातल्या लहानशा गावांतून ग्वालियर व नंतर दिल्ली पर्यंत पोहचत संघर्षाच्या तळपत्या अग्नीतुन तावून सुलाखुन निघालेला मनोज कुमार शर्मा शेकडो, करोडो भेड-बकरियों जैसों की जीत बन जाता है. UPSC व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या हजारो, लाखो, करोडो विद्यार्थी वर्गाची मेहनत, परिश्रम, त्याग, स्पर्धा, दडपण, भिती, नैराश्‍य, अपेक्षा, मानसिक घुसमट ह्या सगळ्याचं भावनांचं मिश्रण ह्या चित्रपटांत आहे. स्वतःचं ध्येय साध्य करण्यासाठी कोणतेही कष्ट, मेहनत, कोई भी नेक काम करण्याची तयारी बघतांना आपण सहज आपलाही संघर्ष कुठेतरी मनांत पडताळून बघतो. मनोज कुमार शर्माचा प्रवास हसवतो, रडवतो, अंर्तमुख करवतो. राजकीय, सामाजिक परिस्थितीचं वास्तव दर्शवितो. चित्रपटांतले काही प्रसंग सहज, टचकन डोळ्यांत पाणी आणतात. जसे, “मैं मेरी पेन्शन नहीं दूंगी” म्हणणारी मनोज कुमारची दादी नातवाला आयुष्यभराची पुंजी सहजच एका क्षणांत समर्पित करते. “अगली बार आऐगा तो वर्दी पहनकर आना, तेरे दादाजी बहुत खुश होंगे” असं म्हणत मनोज कुमारला घट्ट मिठी मारणारी दादी नकळत आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देते. ग्वालियरला जातांना बसमधून उतरण्याच्या वेळी आपली बॅग चोरीला गेली समजल्यावर सैरभैर होणारा मनोज कुमार अजुनही नजरेआड होत नाही. त्याची घुसमट डोक्यांत वैचारिक वादळ उठवते. आपल्या प्रेयसीच्या घरी मसुरीला जाऊन हताशपणे माघारी फिरणारा मनोज कुमार लक्षांत राहतो. श्रद्धाच्या घरी फोन केल्यानंतर तिच्या आईशी बोलतांना श्रद्धाला फोन करायला सांगा म्हणत फोन जवळ तासन्‌ तास तिथेच फोनची वाट पाहत बसलेला मनोज कुमार असो किंवा श्रद्धाने I Love You म्हटल्यानंतर “जाओ कर दो दुनिया उलट-पुलट” असं सांगितल्याबरोबर ध्येयाने बेभान होणारा मनोज कुमार प्रेमाचं नवं गणित उलगडुन दाखवतो. फायनल परीक्षेचा रिझल्ट लागल्या नंतर तिथेच श्रद्धा, गौरी भैय्या आणि बाकी मित्रांसोबत फोटोतला मनोज कुमार “वाह! क्या बात है. तुने कर के दिखाया” असं म्हणायला मजबुर करतो. “हारा वहीं जो लडा नहीं” ये लाईन तो दिल छुं जाती है. फायनल  interview ला जाण्यापुर्वी मनोज कुमार शर्मा आणि श्रद्धा हे दोघं मनोज कुमारच्या मित्राला   Thank you म्हणायला जातात त्यावेळी, श्रद्धा मनोजच्या मित्राला म्हणते… “यार झुठी बातें तु कितनी सच तरिके से बोलता है टिव्ही पर रिपोर्टर क्युं नहीं बन जाता?” हे एक वाक्य आजच्या मिडीयाचं वास्तवदर्शी चित्र दर्शवणारं आहे.

      या चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू म्हणजे ONE MAN SHOW – विक्रांतचा परफॉर्मन्स. विक्रांतने अभिनयाच्या बाबतीत जोरदार षटकार लगावत सिनेमा वेगळ्या उंचीवर नेला आहे. मिळालेल्या संधीचं अक्षरशः सोनं केलं आहे. त्याने पडद्यावर साकारलेला मनोज हा अक्षरशः कधी कधी अंगावर काटा उभा करतो तर कधी आपले डोळे पाणावतो.

      घर, परिवार, दोस्ती, यारी, प्यार, संस्कार, संघर्ष, परिश्रम, भ्रष्टाचार, सुख-दुख, हँसी, तनहाई ह्या व अश्‍या सर्वच भावनांचं उत्तम सादरीकरण ह्या चित्रपटांत उत्तमरित्या केलेलं आहे. विक्रांत मेस्सी बरोबरच मेधा शंकर, अनंत जोशी, सुरज कुमार व अन्य सर्वच कलाकारांनी आपआपल्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे. मुलगा तिसऱ्यांदा अपयशी होऊन घरी आलेला असताना आपण मजेत आहोत, असं सांगण्याचा प्रयत्न करणारी त्याची आई झालेली अभिनेत्री गीता अग्रवाल, हा प्रसंग तिच्या उत्कट अभिनयाने जिवंत झालाय. चित्रपट कुठेच रेंगाळत नाही. एका मागुन एक घडणारे प्रसंग आपल्याला खिळवून ठेवतात.

      विधु विनोद चोप्राची चित्रपट कारकीर्द फार मोठी आहे. त्याला दिग्दर्शक-लेखक-निर्माता म्हणून जे काही यश मिळाले असेल, त्यातला ‘12th Fail’ हा त्याचा आजपर्यंतचा सर्वोत्कृष्ट चित्रपट आहे. ‘12th Fail’ ही सर्वांगसुंदरच नव्हे; तर प्रेरणादायी कलाकृती आहे. अगदी काही सेकंदांसाठी पडद्यावर असलेले पात्रदेखील येथे उत्तम अभिनय करते.

It’s THE film of the year. The best by distance. And it’s the film that will live on.

कोई भी लक्ष्य, इंसान के संघर्ष से बड़ा नहीं,

हारा वही, जो लड़ा नहीं.

– यशवंत मराठे, मो. 9820044630

Leave a Reply

Close Menu