लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची शोकांतिका!

लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे पत्रकारिता, की जी सामाजिक सुधारणांचा पाया ठरते. शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामीत्वाचा वारसा सांगणा­या महाराष्ट्राला थोर पत्रकारितेचा वारसा लाभला आहे. त्याचा उगम प्रामुख्याने झाला तो मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रगल्भ लेखणीतून. समाज सुधारला तरच राजकीय स्वातंत्र्याला अर्थ प्राप्त होईल असे त्यांचे मत होते. सार्वजनिक जीवनात विचारमंथन करण्यासाठी पत्रकारितेसारखी मोठी शक्ती नाही, तिचा उपयोग समाज बदलासाठी होऊ शकतो अशी त्यांची वैचारिकता असल्यामुळे त्यांनी तत्कालीन चुकीच्या रूढी परंपरांवर लेखणीच्या माध्यमातून प्रहार केले. धार्मिक व सामाजिक सुधारणांबाबत ते अत्यंत प्रगतीशील व्यवहारवादी होते म्हणूनच त्यांनी त्यांच्या दर्पण पाक्षिकाला समाज परिवर्तनाचे शास्त्र व शस्त्र म्हणून वापरले.

    ६ जानेवारी १८३२ रोजी दर्पणपाक्षिक सुरू करून मराठी वृत्तपत्र युगाची मुहूर्तमेढ रोवली. महाराष्ट्रात त्यांचा वारसा स्वातंत्रोपुर्वोत्तर काळात व स्वातंत्रोत्तर काळातही तेव्हढ्याच जोमाने चालू आहे. फक्त त्याच्या पद्धतीत काळानुरूप सकारात्मक बदल घडलेला दिसून येतो. त्यांचा वारसा दै. मराठाचे आचार्य प्र.के.अत्रे, साप्ताहिक मुकनायक, जनताचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दै. नवशक्तीचे पु.रा.बेहरे, दै. महाराष्ट्र टाइम्सचे गोविंदराव तळवळकर, दै. लोकसत्ताचे विद्याधर गोखले, दै.केसरीचे लो. टिळक, दै.तरुण भारत बेळगांवचे बाबुराव ठाकूर, दै. सामनाचे बाळासाहेब ठाकरे यांसारख्या अनेक दिग्गज संपादक व पत्रकारांनी आपल्या प्रगल्भ लेखणीतून समाजातील अनिष्ट प्रथांवर प्रहार करत आर्थिक, सामाजिक व राजकीय सुधारणांचा पाया मजबूत केला. काही वृत्तपत्रांची भाषा मवाळ तर काहींची जहाल असली तरी सुद्धा त्यांचा उद्धेश मात्र एकच होता तो म्हणजे सामाजिक सुधारणांचा. भारतीय संविधानानुसार लोकशाहीची जपणूक करण्याचा.

    गेल्या पावणेदोनशे वर्षांमध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्यलढ्यासह अनेक क्षेत्रामध्ये बदल घडविण्या -साठी पत्रकारितेने योगदान दिले आहे. आताच्या २१व्या शतकाच्या बदलत्या काळानुसार पत्रकारितेचे स्वरूप, पत्रकार आणि त्यांच्याकडे पाहण्याची समाजाची दृष्टी यामध्ये काही बदल झाला आहे का? याकडे तटस्थपणे पाहण्याची वेळ आली आहे. आचार्य जांभेकरांच्या कालावधीतील व आजची पत्रकारिता यातील उद्देश बदल झालेला दिसून येतो. आज प्रिट व इलेक्ट्राॅनिक मीडिया बहुतांशी राजकीय किवा सामाजिक क्षेत्रात वावरणा­यच्या मालकीचा असलेला दिसून येतो. त्याचे दुरगामी परिणाम सातत्याने पत्रकारितेवर उमट-ताना दिसतात. १९४७पूर्वी स्वातंत्र्यासाठी व स्वातंत्र्यानंतर समाजात काही ठोस बदल व्हावेत व स्वातंत्र्य अबाधित रहावे म्हणून पत्रकारितेचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. इतकेच नव्हे तर आणीबाणीच्या विरोधातही काही पत्रकार उभे ठाकले व त्यानंतर परिस्थिती बदलत गेल्याचे जाणवते. पत्रकारिता ही आपल्या मानवी समुदायाची पायाभूत गरज होती व आहे आणि नेहमीच राहिल. पत्रकारांच्या अभिव्यक्तीतील एक समान धागा म्हणजे त्यांची स्वतंत्र विचारसरणी. सामान्य विचार व्यक्त करण्यासाठी शब्द कलांना व सिद्धातांना वापरण्याची कला म्हणजे पत्रकारिता. पत्रकारिता म्हणजे आत जे आहे ते मोकळे सोडण्याचे साधन व आपले विचार अत्यंत प्रामाणिक व निःपक्षपातीपणे समाजाप्रती पोहचविणे.

     गेल्या काही वर्षांत राज्यात पत्रकारांवरील हल्ले वाढत जाताना दिसतात. हे निश्चितच लोकशाहीला बाधक आहेत. हे सुसंस्कृत महाराष्ट्राला निश्चितच शोभनीय नाही. मुकनायकया पाक्षिकाच्या नावात डॉ. आंबेडकरांना आपण त्यांचे नायकआहोत हे सांगायचे नव्हते तर मूक जनतेला नायक बनविण्याचा प्रयत्न होता. विचार करण्याची व बोलण्याची संधी प्रत्येकाला असायला हवी. धर्म आणि समाजाचा प्रश्न येतो तेव्हा शास्त्रीय विचार मागे पडतो. समाजातील दोन चेह­यांच्या माणसांमुळे समाजाची प्रगती खुंटत चालली आहे. एका जातीची अवनीती होते तेव्हा त्याचा चटका इतर जातींना बसल्याशिवाय रहात नाही हा डॉ. आंबेडकरांचा दुरगामी विचार होता.

   सशक्त लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजेच वृत्तपत्रे व प्रसारमाध्यमे. त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व अस्तित्वाची चिंता हा देशापुढील ज्वलंत प्रश्न बनत चालला आहे. विसंगत निर्णय आणि वाटचालीवरील लक्ष ठेऊन त्याविरुद्ध सरकारला इशारा देऊन जनजागृती करत राजसत्तेच्या विरोधात वृत्त प्रसारित करणे हे प्रसार माध्यमांचे स्वातंत्र्य व अधिकार आहेत. पत्रकारिता ही सजग पहारेकरी असतात म्हणून त्यांच्या कामामध्ये कोणताही राजकीय व अन्य हस्तक्षेप न करता त्यांना स्वातंत्र्य बहाल करणे व मुक्तपणे काम करू देणे हिच खरी लोकशाही आहे.

     पण आजच्या घडीस काही अविवेकी मानसिकतेकडून गल्लीपासून दिल्लीपर्यंत पत्रकारांना त्रास देण्याचे प्रकार घडत आहेत हे निश्चितच लोकशाहीला घातक आहेत. स्वातंत्र्योत्तर काळात हे लोकशाहीचे उडवले जाणारे धिंडवडे आहेत. एका नाण्याला दोन बाजू असतात त्याप्रमाणे पत्रकारितेतही काही डावे उजवे निश्चितच आहेत. परंतु त्यामुळे एकंदरीत पत्रकारितेला बदनाम करणे निश्चितच गैर आहे. जे पत्रकार चुकीच्या मार्गांचा अवलंब करतात त्याविरुद्ध समाजाने निश्चितच आवाज उठविण्याची गरज आहे. कारण पत्रकारिता ही निकोप असणे गरजेचे आहे. त्यात संयम असणे गरजेचे आहे. एखाद्या वृत्ताची योग्य खतरजमा करून व पूराव्यानिशी जर वृत्तांकन केले तर समाजाकडून असे प्रसंग उद्धभवणार नाहीत याची खबरदारी पत्रकारांनी घेणे गरजेचे आहे. आपण केलेल्या वृतांकामुळे समाजात नकारात्मक संदेश न जाता तो सकारात्मक कसा जाईल याची दक्षता पत्रकारांनी घेणे आवश्यक आहे. कारण आपल्या राज्यघटनेने जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य प्रत्येकाला दिले आहे त्याचा गैरवापर न करता त्याचा सदुपयोग करून सामाजिक स्थैर्य निर्माण करण्याचे काम प्रसार माध्यमांनी करणे गरजेचे आहे. आज घडीस काही प्रसार माध्यमातून ज्या घटना वारंवार दाखवल्या जातात त्याचे दुरगामी परिणाम समाजमनावर होताना दिसतात. हे होऊ नये याची काळजी प्रसारमाध्यमांनी घेणे गरजेचे आहे.                                                               संजय तांबे, कणकवली ९४२०२६१८८८

Leave a Reply

Close Menu