मु. पो. कुबलचाळ, ता. वेंगुर्ला

मध्यरात्री अचानक भिंतीवरील घड्याळ भिंतीवरुन खाली पडण्याचा आवाज आणि माझा घाबरुन ओरडल्याचा आवाज ऐकून घरातील सर्व माणसे जागी झाली. मला काही लागलं नाही याची खात्री करत, घडाळ्याच्या काचा एकत्र करून सर्व साफसफाई झाल्याची खात्री झाल्यानंतर अस्मादिकांसह सर्वजण पुन्हा निद्रेच्या अधीन झालो. नक्की वर्ष आठवत नाही, परंतु या घटनेला आता पस्तीस चाळीस वर्षे झालीत. वेंगुर्ल्याच्या खर्डेकर रोडवर असलेल्या कुबलचाळीत मी लहानाचा मोठा झालो. चाळीतल्या या घरात मधल्या खोलीत भिंतीजवळ माझी झोपण्याची जागा. वयाबरोबर उंचीही वाढत गेली, त्यामुळे झोपल्यावर माझे डोके दोन खोल्यांमधल्या दरवाजाच्या उंबरठ्याच्या मध्यभागापर्यंत पोहचू लागले होते. वर उल्लेख केलेल्या घटनेत काचा फुटल्याची घटना आणि मी किंचाळल्याच्या घटनेचा घटनाक्रम झोपेत कुणाच्या लक्ष्ाात आला नव्हता. खरंतर घड्याळ खाली पडण्याच्या काही सेकंद अगोदर मला काहीतरी डोक्यावर पडतंय याची जाणीव झाली होती, मी किंचाळत डोके बाजूला केले आणि मी बाजूला व्हायच्या अगोदर माझे डोके ज्याठिकाणी होत त्याच ठिकाणी हे घड्याळ पडले. अर्थात जरी माझ्या कपाळावर हे घड्याळ पडले असते तरी प्राणघातक असे काही घडले नसते, परंतु इजा नक्की झाली असती. त्याकाळी घड्याळासाठी वापरल्या जाणाऱ्या काचा या जड असत. सांगण्यामागचा उद्देश हाच की चाळीतली खोली असो वा घर त्या वास्तूमध्ये एक जीवंतपणा असतो, जो घरातील माणसांची काळजी घेत असतो.

      कुबलचाळ तशीही वेंगुर्ल्यातील एक दुर्लक्षित वास्तू. ‘वेंगुर्ल्यात नक्की तुम्ही खय रवतात?’ या प्रश्‍नावर मी ‘कुबलचाळ’ असे उत्तर दिल्यावर प्रश्‍नकर्त्याच्या चेहऱ्यावर अजून एक मोठे प्रश्‍न चिन्ह उभे रहायचे. बऱ्याच जणांना आसपासच्या बऱ्याच खाणाखुणा सांगून सुध्दा त्यांच्या ही चाळ लक्षात यायची नाही. मुंबईला नोकरीनिमित्त स्थलांतरित होण्यापूर्वी पर्यंत जन्मापासून मी या चाळीत लहानाचा मोठा झालो. खर्डेकर रोडवर खर्डेकर कॉलेजपासून बाजाराच्या दिशेन जाताना रहाटाच्या विहीरीजवळील मारुती मंदिराच्या जरा पुढे गेल्यावर एक छोटीसी पाणंद (गल्ली) आहे. या गल्लीच्या एका बाजूला आनंद मेडिकल स्टोअर तर दुसऱ्या बाजूला खारलँण्ड ऑफिस (खारलॅण्ड ऑफिस पूर्वी इथे स्टेट बँक ऑफ इंडिया होती असे जूने लोक सांगतात) होते. आज आनंद मेडिकल स्टोअर आणि खारलॅण्ड ऑफिस हे दोन्ही नाहीत. त्या गल्लीचा मार्गही किंचीतसा बदलला आहे परंतु चाळ अजूनही (खरतर अजूनतरी) इथे आहे.

      माझी भावंड आजही या चाळीत वास्तव्यास आहेत. मी रहात असलेल्या इमारतीच्या गॅलेरीतून मी बरेचदा चाळ निरखत बसलेला असतो. प्रचंड दारिद्य्रात घालवलेल्या या चाळीचे ‘वैभव’ आजही डोळ्यासमोर उभे राहते. आनंद मेडिकल स्टोअरच्या शेजारी गल्लीच्या तोंडाशी गटारावर एक मजबूत लोखंडी पत्रा होता.  बाजूला एक चिऱ्यांचा खांब होता, या खांबावर ‘श्रीकृष्ण नगरी’ की ‘राधाकृष्ण नगरी’ असे कायतरी नाव कोरलेली एक पाटी होती. चाळीची ही ओळख त्याकाळीही फारशी कुणाला नव्हती, त्यामुळे माझ्याही स्मरणातून हे नाव गेले असावे. पाणंद अगदीच अरुंद होती, त्यामुळे सायकल सोडली तर कुठलेच वाहन त्या गल्लीतून चाळीपर्यंत पोहचणे शक्य नव्हते (खारलॅण्ड ऑफिस जमिनदोस्त झाल्याने गल्ली आता थोडी रुंदावली आहे). या पाणंदीतून जाताना खारलॅण्ड ऑफिसमधून टाईपरायटरची किटकिट मात्र सदैव ऐकू यायची. पाणंद संपल्यावर एकूण सात खोल्यांची लांबरुद अशी चाळ दिमाखात उभी आहे. इथे सात खोल्यांची म्हणजे सात घरांची चाळ असे मला म्हणायचे आहे, कारण एका घरात चार खोल्या आणि एक पडवी आहे. मुंबईतल्या चाळी आणि कुबलचाळ यात जमिन अस्मानाचा नसला तरी बराच फरक आहे.

      सात खोल्यांमध्ये सहा वेगवगळ्या धर्माची-जातीची कुटुंब वस्तीला होतीत. एक खोली बरेचवेळा रिकामी असायची. त्यात कधी कधी बदलीवर वेंगुर्ल्यात आलेले शासकीय अधिकारी वस्तीला असायचे. सर्व खोल्यांना जोडणारा प्रत्येक खोलीमध्ये एक दरवाजा असायचा मात्र तो कधीच उघडला गेला नाही. मुंबईत जुन्याकाळी अनुभवायला येणारी चाळसंस्कृती या चाळीत मात्र काही अनुभवायला आली नसली तरी प्रत्येक कुटुंब आपआपल्या धुंदीतच असायचे. माझ्या खोलीशेजारी डाव्या बाजूला राहणारे दाभोलकर सर यांची गायनकला मला आकाशवाणी सोबत नेहमीच घरात बसून अनुभवायला मिळायची. तर उजव्या खोलीत राहणारे पोस्टमास्तर केळकर, यांचा आयुर्वेदात दांडगा अभ्यास होता. वेंगुर्ल्यात फार कमी लोकांना यांच्या आयुर्वेदातील ज्ञानाबद्दल त्याकाळी माहित होते. मात्र त्यांच्याकडे अगदी लांबून लांबून लोक औषधोपचारासाठी यायचीत, यात कॅन्सर या आजारावर उपचार घेणारे रुग्णही असायचे. चाळीच्या सुरुवातीच्या खोलीत वास्तव्यास असणारे फर्नांडीस मास्तर, खरतर ते शिक्षकेतर कर्मचारी होते मात्र त्यांना फर्नांडिस मास्तर म्हणूनच ओळखले जायचे. ही तिन्ही कुटुंबे वेगवेगळ्या कारणांसाठी चाळ सोडून दुसरीकडे वास्तव्यास गेले. त्यापैकी आता काहीजण हयातही नाहीत असे कळते. बाजारात चप्पलांचे दुकान असलेला गोपी सिंधी, त्याचे आडनाव वेगळेच काहीतरी होते मात्र त्यांना आडनावाने कुणीच ओळखत नसे. बऱ्याच वर्षापूर्वी तो आपला व्यवसाय आणि ही खोली आपल्या मेहुण्याला देऊन दुसऱ्या शहरात उदरनिर्वाहासाठी गेला. आज या चाळीत फक्त तीन कुटुंबे आहेत. परिस्थितीमुळे त्यांना स्वत:चे घर घेणे जमले नसेल, मात्र गेली पन्नास-पंचावन्न वर्षापूर्वीपासूनची त्यांची नाळ या चाळीशी अजूनही जोडली गेली आहे.

      चाळीला वर्षभर मुबलक पाणी पुरवठा करणाऱ्या दोन विहीरी, यातील एक पुढल्या दाराला तर एक मागल्या दाराला. चाळीच्या समोरील विहीर भली मोठी होती (हो होतीच म्हणावे लागेल कारण आता तिथे ती विहीर नाही). मे महिन्यात सुध्दा पुरुषभर उंचीचे पाणी असायचे या विहीरीला. चाळीतून विहीरीवर जायला तीन वाटा होत्या. दोन पायवाटा तयार झाल्या होत्या तर एक चिऱ्यांच्या दगडांची बांधलेली पायऱ्यांची अधिकृत वाट. विहीरीचे बांधकामही मजबूत, विहिरीच्या शेजारी माडाच्या झाडाखाली दोन फातरी (कपडे धुण्यासाठी दगड), सकाळपासून दुपार पर्यंत कपडे धुण्यासाठी व्यस्त असायच्या. विहिरीच्या आसपास पेरु, आंबा, चिंच, कोकम, फणस, हसोळी अशी विविध झाडे होती. लहानपणी या झाडांनी कधी आम्हाला फलाहार कमी पडू दिला नाही. आज मात्र या सर्वांचे अस्तित्व संपुष्टात आले आहे. चाळीच्या दारात असलेला नागचाफा आजही बहरतो. चाळीच्या उंचीपेक्षा दोन पुरुष जास्त उंच असलेले हे झाड आजही लांबून आपले लक्ष वेधून घेते. झाडाच्या बाजूने बांधलेला चिऱ्यांचा पार लहाणपणी खेळून दमल्यावर विश्रांती घेण्यासाठी आमचे सावलीचे ठिकाण होते.

      वेंगुर्ल्यात अशा अनेक वास्तू आहेत, खरतर त्या वेंगुर्ल्याची शान आहेत. मात्र हळुहळू वेंगुर्ले शहराचे काँक्रिटीकरण होत चालले आहे. या जुन्या वास्तूची शोभा नव्या बिल्डींगला येत नाही हे मात्र खरे आहे. जुनं क्रॉफर्ड मार्केट म्हणून परिचित असलेल्या मार्केटची नव्या दिमाखदार वेंगुर्ला मार्केटला ती सर नाही असे कित्येक वेंगुर्लाप्रेमी खाजगीत बोलताना आढळतील. अत्याधुनिक सुविधा असलेले वेंगुर्ल्याचे नवीन मासळी मार्केट आणि जुने मासळी मार्केट यात तुलना करायला गेली तर जुन्या मासळी मार्केटच्या आठवणीने जुनी पिढी हळहळते. वेंगुर्ले शहराची आन बान शान असलेल्या कित्येक जुन्या वास्तू जसे नटराज चित्रमंदिर (नानाचा थेटर), कोटणीस हाऊस, गोहिन मेमोरिअल हॉल अशी कित्येक उदाहरणे देता येतील. काही ठिकाणी या वास्तू पाडून नवीन इमारती उभ्या राहिल्यात तर काही ठिकाणी तशी प्रक्रिया चालू आहे. सेंट लुक्स हॉस्पिटल, डच वखारीची तर दुरावस्था झालीय.

      अलिकडेच मी अझरबैजानला पर्यटनासाठी गेलो होतो. तेथील बाकू या आधुनिक शहराला भेट देण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. नवीन शहरासोबत त्यांनी जुन्या शहराला जसेच्या तसे सांभाळून ठेवले आहे आणि पर्यटकांचे ते प्रमुख आकर्षण आहे. अनेक देशात अगदी मुंबईतील काही भागात इमारती या हेरिटेज वास्तू म्हणून घोषित केल्या आहेत. यामुळे या इमारती विकसित करताना, त्यांचे जुने सौंदर्य अबाधित राहते. वेंगुर्ल्यात आंबा, काजू बागायती उत्पन्नाबरोबर उत्पन्नाचे मुख्य स््राोत म्हणून पर्यटन व्यवसायाकडे बघता येतील. समुद्र किनारे तर बऱ्याच ठिकाणी आहेत, त्यामुळे वेंगुर्ल्याची स्वच्छता आणि जुन्या इमारतीचे सौंदर्य अबाधित ठेवल्यास त्याचे वेगळेपण पर्यटकांना अजून आकर्षित करू शकते. सध्यातरी वेंगुर्ल्यात काँक्रिटच्या इमारती या नगण्य आहेत. परंतु हळूहळू सर्वच जुन्या वास्तू पाडून त्याठिकाणी काँक्रिटच्या इमारती उभ्या राहिल्या तर वेंगुर्ल्याचे वेगळेपण धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

      कुबलचाळ सुध्दा विकसित होणार असल्याची आणि तशी जोरदार हालचाली चालू असल्याचे कानावर येत आहे. विकासासाठी आसपासचे नैसर्गिक सौंदर्याने अगोदरच चाळीचे सौंदर्य हरवून गेले आहे. चाळीत राहणाऱ्या दारिद्य्रात खितपत असलेल्या आपल्या लेकरांना वाऱ्यावर सोडून काही दिवसात ही चाळ विकासाच्या आहारी जाणार आहे. तिची हतबलता तिच्यात असलेला माझ्या सारख्या अनेक आश्रितांनी अनुभवलेला जीवंतपणा आता दम सोडणार आहे.

      चाळ म्हणजे दारिद्य्र आणि तिची तिच्या लेकरांसह फरपट हा मोठ्या शहरातील अनुभव आता वेंगुर्ल्यात सुध्दा येणार का?

– संजय गोविंद घोगळे, 8655178247

Leave a Reply

Close Menu