हे थांबवा….

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव निर्माण झाल्याच्या दोन घटना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडल्या. विशेष म्हणजे त्यातील एक घटना चक्क वेंगुर्ल्यात घडली आणि पोस्ट टाकणारी व्यक्ती किशोरवयीन तरुणी आहे, हे आणखीनच आश्‍चर्यकारक.

      आमचं वेंगुर्ला असं जातीय किंवा धार्मिक दुहीचं नाहीच मुळी. खर्डेकर कॉलेजच्या नाठाळ पोरांचा दिवस पापू शेखच्या चिकन सेंटरमध्ये जायचा. ‘नंदनवन’मधून दोन पेग मारुन बाहेर पडलेला शौकीन किंवा ‘गजाली’तून भरपेट जेवून आलेला खवय्या जाफरला “एकसो बीस तीनसौ“ ची ऑर्डर द्यायचा. गाडी खराब झाली की ती जुबेरच्याच गॅरेजमध्ये जायची. ईदला बिर्याणीचा डबा अल्ताफकडून यायचा. दिवाळीचा फराळ सचिनकडून सलीमला गेला नाही, असं कधीही घडलं नाही आणि अल्ली गणपती बघायला आला नाही, असंही कधी घडलं नाही. अशा सलोख्याच्या गप्पा आजवर अनेकांनी केलेल्या व अनुभवल्या आहेत. कोपऱ्यावरचा मुनीर हिंदू आहे की मुस्लीम, हे फक्त त्याचं आडनाव ऐकल्यावर कळतं. दर्ग्याकडच्या छोटूचा वडा खाल्ल्याशिवाय वेंगुर्ल्याची संध्याकाळ होतच नाही आणि होणारही नाही. बाजारातून निघताना एखादी वस्तू राहिली तर दाभोली नाक्यावरच्या बाबा मुसलमानाकडेच घेतली जाते. तोटकेकरांच्या ‘क्वालिटी‘ला खेटून ‘हिमालय‘उभे राहते. औषधं ‘रघुवीर‘कडे घेतली जातात तशीच ‘दोस्ती‘कडेही घेतली जातात.

      12 वर्षांपूर्वी दाभोली नाक्यावर राजकीय राडा झाला होता. वेंगुर्ल्याच्या लोकांनी त्यात बेदम मार खाल्ला. वाट मिळेल त्या दिशेने लोक पळत होते. त्यातल्या अनेकांना तीन पिंपळाकडच्या गल्लीतील मुस्लीम बांधवांनी त्या रात्री आसरा दिला होता. काळाच्या ओघात तो राडा लोक विसरूनही गेले. पण ते बंध अजूनही विसरलेले नाहीत.

      वेंगुर्ला हे असं एकजीव आहे. एकमेकांशिवाय एकमेकांचं पान हलणारच नाही इतकं हे नातं घट्ट आहे.

      एक दिवसाच्या सोहळ्याने ते विसविशीत का होतं?‘सर धड से अलग होगा‘ इतकं लिहिण्याइतपत विखार कुठून येतो? ही मुलं काय वाचतात? कुठल्या साईट्स बघतात? युट्युबवर काय पाहतात? कुणाला फॉलो करतात? ते पालकांनी बघायलाच हवं.

      अर्थात हे जसं एका बाजूनं घडायला हवं, तसंच ते दुसऱ्या बाजूनेही घडायला हवं. आपला जल्लोष हा दुसऱ्याच्या भावना दुखावणारा असू नये, याचं भानही राखायला हवं.

      या पोस्ट प्रकरणानंतर लोकांचा उद्रेक झाला. तोडफोड झाली. पण, त्यात नुकसान कुणाचं झालं?? तर, हातावर पोट असणाऱ्याचं. ते भरुन निघेलही, पण निर्माण झालेल्या दरीचं काय करायचं??

      ती दरी सांधणं ही प्रत्येक जबाबदार वेंगुर्लेवासियाची जबाबदारी आहे. सर्वांनी त्यासाठी पुढे यायला हवं. पुढाकार घ्यायला हवा. एकमेकांशी बोलायला हवं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर काय टाकायचं, काय टाकायचं नाही, काय पहायचं, काय पहायचं नाही याचे धडे प्रत्येकाने गिरवायला हवेत.

      भावना एका क्षणाची असते. पोस्ट दोन ओळीची असते. व्हीडिओ दोन मिनिटांचा असतो. स्टेटस चोवीस तासांचा असतो. पण त्यातून शेकडो वर्षांचे संबंध, शहराची संस्कृती एका मिनिटांत नष्ट होण्याची शक्यता असते. त्याचं भान बाळगलेलं बरं.                                          – सीमा मराठे, 9689902367

Leave a Reply

Close Menu