“अयोध्या” एक विलक्षण नाट्यानुभव 

 केदार देसाई लिखित दिग्दर्शित “अयोध्या“…भारत वर्षातील अलौकिक धर्मयुद्ध ह्या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग ‘याची देही याचि डोळा’ पहाण्याची संधी वेंगुर्लेवासीयांना लाभली.
                  केदार देसाई नाव उच्चारले की, रंगमंचावर नवनवीन संकल्पना पाहायला मिळणार याची खात्री रसिक प्रेक्षकांना असतेच असते. कारण ते नाटक म्हणून नाटक नसते तर त्यात कला आणि साहित्यातील नवरसांचा समजून उमजून केलेला आविष्कार आपल्याला पाहायला मिळतो. हा अनुभव बाकी शून्य, बत्ताशी सारख्या नाटकातून आणि त्यांनी केलेल्या अनेक एकांकिकामधूनही आपल्याला आलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मान. रवींद्र चव्हाण यांनी ‘जिथे राम भक्त तिथे अयोध्या प्रयोग’ असा विश्‍वास या अप्रतिम निर्मिती बाबत व्यक्त केला आहे. त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष केंद्रित झालेल्या राम मंदिर या विषयावर सिंधूसंकल्प प्रतिष्ठान व सागर एन्टरटेन्मेंटचे सर्वेसर्वा प्रणय तेली व केदार देसाई भव्य महानाट्य साकारू पाहताहेत तर ते कसे असेल? याची उत्सुकता लागून राहिली होती. या निर्मितीसाठी साईकला मंचाचे अध्यक्ष भूषण तेजम ह्यांनी त्याला समर्थ साथ दिली. रंगमंचावरील सादर करणाऱ्या कलाकारांच्या अभिनया सोबतच केदार देसाई यांचा मुलगा ईशान देसाई याने आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करीत ग्राफिक्सच्या (थ्रीडी/सिजीआय) माध्यमातून मागील स्क्रीनवर नाट्य संहितेतील तपशीलातील बारकावे आणि त्या त्या प्रसंगातील छायाचित्रे यांची सांगड उत्तम साधली आहे. सोबत  दीपक कदम यांच्या आवाजात रेकॉर्डिंग केलेले मुख्य कथानक तर प्रसंगानुरुप रंगमंचावर सादर होणाऱ्या पात्रांच्या ध्वनीमुद्रित आवाजात सादर होणारा नाट्यानुभव हाही एक विलक्षण अनुभव आहे. इतकं समर्पित होऊन प्रत्येकजण राममय झाले होते. ही  वातावरण निर्मिती गदिमांच्या अजरामर गीतरामायणातील गीताने प्रारंभ व शेवट करून एक प्रकारे देसाई यांनी गदिमांना आदरांजली वाहिली आहे. थेट संवादाऐवजी ध्वनिमुद्रित केलेल्या संहितेवर कलाकारांनी चपखल भूमिका करून अयोध्या संहितेला मोठ्या उंचीवर नेले आहे.
            लंकेत रावणाचा पराभव केल्यानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येत परतल्यापासून, बाबराचे आक्रमण, अयोध्येतील रामजन्मभूमीची मोडतोड, बाबरी मशिदीची उभारणी, रामजन्मभूमी आंदोलन, रथयात्रा, त्यावरुन झालेले राजकारण, न्यायालयीन दावे प्रतिदावे, कोठारी बंधूंचे बलिदान आणि रामलल्लाची प्रतिष्ठापना असा प्रदीर्घ पट या नृत्यनाट्याच्या माध्यमातून मांडला आहे.
            तेजस पिंगुळकरने साकारलेला राम आणि संतोषा प्रभू नाईक हिने साकारलेली सीता रंगमंचावर येताच मन प्रसन्न करतात. कलाकाराच्या निवडीमध्ये कुठेही शंका ठेवायला जागा नाही. इतकी चोख भूमिका यातील कलाकारांनी सार्थ केली आहे. केदार देसाई यांनी साकारलेला नायर नावाचा सनदी अधिकारी व पत्रकार हेमंत शर्मा, भूषण बाक्रेचा लक्ष्मण आणि शरद कोठारी, मंदार कुंटेचा विनय कटियार, तृप्ती राऊळची उमा भारती, सावन जळवीचा हनुमान आणि मुघल, निलेश गुरव यांनी साकारलेला बाबर, पी ए आणि व्ही.पी. सिंग, प्रसाद खडपकर यांचा मुघल सेनापती मीर बांकी आणि पोलीस, प्रसाद कुंटे यांचा पुजारी श्‍यामानंद आणि लालकृष्ण अडवाणी, शिवप्रसाद राणे यांचा लालू प्रसाद यादव व कीर्तनकार आणि सुलेखा डूबळे यांनी साकारलेली म्हातारी ही पात्रेही मनात घर करून राहतात. कारसेवक त्यांचा लढा, त्यांच्यावर झालेला  हल्ला हे प्रसंग प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतात.
          भूषण बाक्रे, अदिती दळवी, तृप्ती राऊळ, सिद्धांत नेरूरकर, योगेश शर्मा, हर्षदा गवस, तन्वी जळवी, सिद्धीका भोगटे, प्रीती नेमळेकर, सूरज शिंदे, समीर माळकर, विराज परब या सर्वांनी केदार देसाई यांनी लिहिलेल्या गाण्यावर समायोचीत नृत्याविष्कार सादर करीत राममय वातावरण निर्मिती साधली आहे. या गीतांना वालावलचे प्रसिद्ध संगीतकार देवाक काळजी फेम विजय गवंडे व मुंबई येथील मंदार खरे यांनी संगीतबद्ध केले आहे. तर गीतलेखनातील अग्रगण्य नाव, सिंधुदुर्गातील अजून एक रत्न गुरू ठाकूर यांच्या गीताचा समावेश देखील या अयोध्या महानाट्यमध्ये केलेला आहे.
            रंगमंच व्यवस्था सुशांत नेरूरकर, प्रकाशयोजना शाम चव्हाण आणि साईराज नाईक, ध्वनी संयोजक अभिजीत परब व मयूर शिरसाट यांच्या कुशलतेचा अनुभव प्रत्यक्ष नाटक सादर होत असताना पदोपदी प्रेक्षक घेत राहतो.
            या महानाट्याच्या आराखड्यासाठी श्रीकृष्ण जोशी (रत्नागिरी), अजित चव्हाण, मितेश चिंदरकर आदी अनेक व्यक्ती पडद्यामागील कलाकारांनी सहकार्य केले आहे.
        प्रफुल्लित अयोध्या, धगधगती अयोध्या आणि बहुप्रतिक्षीत राम मंदिर निर्मिती पर्यंतचा उत्कंठावर्धक पाचशे वर्षाचा इतिहास अवघ्या दोन तासाच्या कालावधीत नाट्य रुपांतर रंगमंचावर सादर होताना प्रेक्षक विलक्षण अनुभवाचा साक्षीदार होतो. हा अनुभव प्रत्येकाने घ्यायलाच हवा.
अयोध्या टीमला यशस्वी वाटचलीसाठी सस्नेह शुभेच्छा!!
– सीमा शशांक मराठे,
 वेंगुर्ला. 9689902367

Leave a Reply

Close Menu