पालकांसमोरची नवी आव्हाने

न बोले मना राघवे वीण काही, जनी वावगे बोलता सुख नाही।

      मानसशास्त्र या विषया सोबत काम करताना साधारणपणे कोविड नंतरच्या काळापासून पालक आणि पाल्य या नात्यांमध्ये निर्माण होणारा तणाव ही वारंवार जाणवणारी समस्या वाटते आहे. समाज माध्यमांचा अविवेकी वापर विद्यार्थ्यांकडून वाढला असल्यामुळे काही अंशी आपल्या मुलांचा अनियंत्रित राग हाताळताना पालकांची मोठीच कसरत होताना दिसते आहे. कोविड काळात लादली गेलेली निष्क्रियता हा चिडचिड वाढण्याचा एक धागा असू शकतो. परंतु पुनश्‍च क्रियाशील होण्यासाठी लागणारी वैचारिक मदत जर का विद्यार्थी वयात मुलांना देता आली तर आपल्याला त्याच्यातून योग्य तो बदल साधता येईल. 

      ही पिढी खरंतर खूप जास्त क्षमता असलेली आहे आणि त्याच काळात त्यांना हे करू नको, ते करू नको अशी बंधने घातल्यावर साहजिकच गोंधळलेल्या परिस्थितीमुळे आपल्याला जे हवं तेच  हट्टाने करण्याची प्रवृत्ती वाढीस लागू शकते. उदाहरणार्थ आपण जर हा प्रयोग स्वतःवरच करून बघितला तर आपल्याला याची प्रचिती मिळेल – एखाद्या वेळेस आपण जर का खुर्चीत बसून टेबलवर हात ठेवलेले असतील आणि अशी सूचना मिळाली की टेबलवर हात ठेवू नका, साहजिकच आपण एकतर खुर्चीच्या हातांवर किंवा स्वतःच्या मांडीवर हात ठेवू, त्यानंतर जर का सूचना आली की खुर्ची किंवा स्वतःच्या मांडीवर कुठेही हात ठेवू नका तर आपण कदाचित अधांतरी हात ठेवू पण तेव्हाही जर का सूचना आली की अधांतरी पण हात ठेवू नका तर मात्र आपण पुरते गोंधळात पडू. अशाच पद्धतीने मनाचीही अवस्था होत असते. एखादी गोष्ट करू नका अशी सूचना आपण अधिकारवाणीने देत असू तर नेमकं काय करावं याचाही स्पष्ट पर्याय जर का आपण सुचवू शकलो तर समोरच्याचा गोंधळ न होता ती व्यक्ती स्वतःला अपेक्षित ठिकाणी गुंतवून घेऊ शकेल. हीच बाब पालकांनी जर का आपल्या मुलांच्या बाबतीत विचारात घेतली तर अजून सोयीचे होईल. अर्थात पाल्याच्या अविवेकी वागणुकीची पातळी आवाक्यामध्ये असेल तरच हा उपाय लागू होईल. (काही समस्या मानसिक दृष्ट्या तीव्र असतात आणि मानसोपचारतज्ज्ञ यांच्या देखरेखीखाली सोडवाव्या लागतात.) 

      आपल्या मुलांना असं करू नये असं सांगितल्यानंतर पालकांनी याची खात्री करणे फार गरजेचे आहे की, विद्यार्थ्यांना आपण त्याच क्षणी पर्यायी मार्ग सुचवलेला असेल. हात इथे ठेवू नका, तिथे ठेवू नका या सूचनेमध्ये जर का हात डोक्यावर ठेवून बसा असे स्पष्ट सांगितले गेले असते तर कदाचित समोरच्या व्यक्तीचा गोंधळ तेवढासा उडाला नसता. आत्ता साधारणपणे किशोरवयाच्या दरम्यान असलेली मुलं प्रयोगशील मानसिकतेची आहेत. त्यांची हे जग जाणून घेण्याची भूक खूप जास्त वाढलेली आहे. समाज माध्यमांमधून केवळ बघून किंवा ऐकून मिळणारी माहिती ही त्यांची जग जाणून घेण्याची भूक पूर्णपणे भागवणारी नसल्यामुळे त्यांच्यामध्ये सतत असमाधानाची राहिलेली पोकळी कशावर ना कशावर त्यांना अवलंबून आणि अडकवून ठेवते आहे. यापेक्षा जर का प्रत्यक्ष त्यांना एखादी गोष्ट योग्य पद्धतीने हाताळण्याची मुभा मिळाल्यास निष्क्रियपणे केवळ बघ्याची भूमिका न निभावता कर्ता म्हणून मुलांना समाधान मिळवण्याकडे प्रवास करता येऊ शकेल. जर आपल्याला त्यांना निष्क्रियतेमधून बाहेर काढायचं असेल तर त्यांच्या हातांना काम देणे गरजेचे आहे, त्यांच्या बुद्धीला काम देणं गरजेचं आहे. केवळ गेम खेळू नकोस असं सांगून होणार नाही, तर तेवढ्याच गुंतवणुकीला साजेसा एखादा वेगळा पर्याय आपल्याला मुलांसमोर जर का देता आला तर आणि तरच मुलांना हवी असलेली बौद्धिक, भावनिक आणि कृतिशील गुंतवणूक मिळेल.

      समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या मनाच्या श्‍लोकांमध्ये देखील काय करू नये याच्यासोबत काय करावे याची देखील स्पष्ट मांडणी आहे. त्याचप्रमाणे जर का युवावर्गाशी संवाद साधताना नेमकेपणाने गोष्टी त्यांच्यासमोर स्पष्ट करता आल्या तर त्यांच्या भरकटलेल्या मनाला स्थिरावण्यासाठी प्रेरणादायी स्थान निर्माण होऊ शकेल. मराठी मध्ये ‘विषाची परीक्षा घेऊ नये’ अशी एक म्हण आहे. मध्यंतरीचा काळ हा साधारणपणे पापभीरू प्रवृत्तीचा होता, त्यामुळे एखादी गोष्ट करू नये सांगितल्यानंतर कोणाची ती गोष्ट करण्याची हिंमत कदाचित होत नसेल. पण आत्ताचा काळ हा स्वयंपूर्ण झाल्याच्या भावनेतून ‘कर्ता करवीता मीच’ या मनोवृत्तीमध्ये गेलेला दिसून येतो. त्यामुळे कुणा दुसऱ्याचा अनुभव हा स्वतःच्या शहाणपणासाठी वापरण्याची प्रवृत्ती कमी होताना दिसते आहे. एखादी गोष्ट केल्यानंतर समोरच्या व्यक्तीचे झालेले नुकसान पाहून जर का मला तसा अनुभव नको असेल तर मी गोष्टी योग्य पद्धतीने हाताळेन, पण करताना तेच करेन, हा स्वभाव वाढीस लागला आहे. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही समीकरणे आता तेवढीशी प्रभावी राहिलेली दिसत नाहीत. त्यामुळे पालकांना आपल्या पाल्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगताना याही गोष्टींचा विचार करावा लागेल. कोणतीही गोष्ट समोरच्याचं कसं नुकसान झालंय हे दाखवून टाळावी हे शिकवण्यापेक्षा वेगळं आणि योग्य काहीतरी केल्यामुळे दुसऱ्याचा कोणाचातरी किती फायदा झाला आहे ह्या उदाहरणांनी काय करावं याच्यासाठी आपल्या मुलाला नेमकं मार्गदर्शन करण्याचे दिवस आलेले आहेत.

      स्वावलंबन, स्वयंपूर्णता अशा काही गोष्टी रुजवण्याच्या नादात मानवी मन आता बोथट झाल्यासारखं काम करू लागलं आहे. परिणामांची जाणीव आणि जबाबदारी घेण्याच्या बौद्धिक क्षमतेचे नसून सुद्धा निर्णय घेण्याची प्रवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागलेली दिसते आहे. अशावेळी काय टाळावं हे सांगण्यासोबतच काय मिळवावं यासाठीही पर्याय समोर ठेवल्यास निर्णय घेताना अविचार होणार नाही याची काळजी घेता येईल.

      अध्यात्मिक हा शब्द एखाद्या वयोगटाशी किंवा समाज घटकाशी न जोडता स्वतःला स्वतःच्या जवळ नेऊन बसवणारी उपासना जर का अंगीकारता आली तर निर्णय क्षमता वाढवण्यासाठी देखील त्याचा उपयोग करता येऊ शकेल. केवळ दैवाधीन होण्याची भीती बाळगून नामस्मरण आणि उपासनेपासून स्वतःला जाणून बुजून लांब ठेवणाऱ्या प्रवृत्तीमुळे काय टाळावं आणि काय मिळवावं यातच पिढी गोंधळून गेली आहे. मानवी मनाला जाग्यावर आणण्यासाठी भारतीय वेद- उपनिषदांनी दिलेल्या तत्त्वज्ञानानुसार आणि मॉडर्न शब्दांमध्ये मांडलेल्या सायकॉलॉजीनुसार जर का आपण स्वतःला कुठेतरी नतमस्तक करू शकलो आणि श्रद्धा ठेवू शकलो तर अनावश्‍यक भीती आणि अविचार टाळून जे मिळवायचं आहे त्याचा विचार वाढीस लागतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या याच रचनेमुळे व्यक्ती कृतिशील होते. बालपणीच प्रार्थना, उपासना आणि श्रद्धेची गोडी निर्माण करता आली तर आपलं बाळ आपल्या हाताबाहेर जाणार नाही याची तरतूद करता येईल आणि समर्थ रामदास स्वामींनी दिलेल्या वचनांची अनुभूती घेता येईल.                                                – पियुषा सामंत, 7020242216

Leave a Reply

Close Menu