आमचे पबीकाका

शिर्षक वाचताना मराठी निबंध असावा बहुदा असंच वाटेल आपल्याला. पण हो, म्हणावा तर निबंध म्हणावं तर व्यक्त होणं. तेही आपल्या सर्वांच्याच पबीकाकांद्दल. पबीकाका म्हण्णजे श्री. प्रभाकर नागेश नाईक. या 10 जानेवारी रोजी पबीकाका वयाची 75 री पूर्ण करीत आहेत. यानिमित्त हा छोटासा लेखन प्रपंच.

      या वयातही स्वतःला पूर्णवेळ कार्यमग्न ठेवणाऱ्या पबीकाकांना आमचे अँग्रीयंगमॅनच म्हणता येईल. हिच कार्यासक्ती कदाचित त्यांच्याकडे असणाऱ्या उर्जाशक्तीचे मूळ असावे. नाहीतर दुपार असो किंवा संध्याकाळी आपल्या बागेतील नारळ, काजू, सुपाऱ्या वेचत आपल्या पिलांप्रमाणे बागेची देखभाल करीत त्याची छोटी-मोठी उस्तवारी करणे, काकांचे हे सारं, त्यातून मिळणारे उत्पन्न वित्त/पैसा केवळ याकरिता तर खचितच नाही. कौटुंबिक असो वा सामाजिक कार्य असूदे, स्वतःला व्यग्र ठेवण्याचा मौलिक गुण खरोखरीच अनुकरणीय आहे.

      कौटुंबिक विषयी बोलायचे झाल्यास पबीकाका हा आम्हा सर्वच भावंडांचा (आते, चुलत) जिव्हाळ्याचा विषय. आम्ही शालेय जीवनात असतेवेळी आमच्या छोट्या-मोठ्या यशासाठी पाठीवर कौतुकाची थाप आणि हातात बक्षिसी असे ती काकांचीच. आणि फक्त आम्हीच नव्हे तर कित्येक शाळकरी मुलांना त्यांच्या यशासाठी बक्षिसी मिळाली असेल. कित्येकांना काकांनी नोकरी-व्यवसाय मिळवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. काकांचा कौतुकाचा मापदंड नेहमी पुस्तकी (शालेय) यश एवढाच मर्यादित न रहाता एखाद्या कलेचे, कौशल्याचे, एखाद्या खेळातील प्राविण्याचे अथवा चांगल्या वागणुकीचे असेल, नेहमी काकांच्या कौतुकाला पात्र ठरे. अशा आमच्या लाडक्या काकांना राज्य शासनानेही आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे.

      कौटुंबिक बाबतीत सांगायचं झालं तर आमच्यापैकी जवळपास प्रत्येकाला काकांशी आपलं सुखदुःख अथवा मनाचं हितगुज करण्यास अथवा मन मोकळं करण्यास कधी संकोच किंवा भीड वाटली नाही. आता आम्ही हल्ली वयानुसार काकांना कशाला सांगून त्रास द्यायचा असे आम्हालाच वाटते.

      थोडं मागे जाऊन बोलायचं म्हटलं तर म्हणजे आमच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळाच म्हणूया. आपल्या ईश्‍वरतुल्य आई-वडिलांची (आमचे आजी-आजोबा) काकांनी अगदी उत्तम सेवा केलेली आम्ही जवळून पाहिली आहे. बालपणीची एक आठवण म्हणून सांगावीशी वाटते. कधीतरी आम्ही वेतोऱ्यात रात्री मुक्कामास असू. कंदिलाच्या प्रकाशात आणि काजव्याने चमचमणाऱ्या झाडांच्या सोबतीने पबीकाका गोंदवलेकर महाराजांची (दैनंदिन प्रवचने) नित्यनेमाने सुस्पष्ट आवाजात आजी-आजोबांना वाचून दाखवायचे. कधी कधी आमचे भाईकाका तेथे असत. फान छान वाटे.

      पबीकाका वयाने सर्वात वडिलधारे नसताही कुटूंबात सर्वांनाच त्यांचा आधार वाटतो हे मात्र नक्की. आमच्या बाबांच्या काही आजारपणातही ते आमच्यासाठी होते. ‘प्रतिभावहिनी काळजी नको हा, मी आसय‘ हे काकांचे वाक्य आमच्या आईच्या धीराचे एक कारण असे. अशा एक ना अनेक गोष्टी असतील. त्यामुळेच पबीकाकांबद्दल आमच्या आईच्याही मनात एक अढळ असे आदराचे स्थान असे.

      शैक्षणिक संस्थेसाठी तळमळीने काम करणाऱ्या अनेक सामाजिक कार्यात स्वतःला झोकून देऊन काम करणाऱ्या पबीकाकांना समर्थ साथ दिली ती त्यांच्या पत्नीने म्हणजे आमच्या काकीने. (सौ. शोभा काकी). शाळा आणि इतर कामे यामुळे तब्येतीसह काकांचे वेळापत्रक सांभाळणे हे निश्‍चितच कठीण होते. आपली दुबार असणारी प्राथमिक शाळेची नोकरी, मुले, त्यांचा अभ्यास, आजारपणे, घरातील वडीलधारे हे तिने उत्तम सांभाळले. घराचे पूर्र्वंपार असलेले सणवारही यथाशक्ती सांभाळले. याबाबतीत आमची मोठी काकी (कै. सुशीला काकी), आमची आई (कै. प्रतिभा) आणि आमची सर्वांची लाडकी लता आते जेव्हा जमेल तेव्हा आवर्जून असे. या सर्वांचाच सक्रीय सहभाग असे. एक सुंदर प्रसन्न वातावरण असे ते. ज्याने आजही आमचं जगणं समृद्ध केलंय असे म्हणता येईल.

      तशी आम्ही सर्व भावंडे (चुलत, आते) पबीकाकांचे लाडकेच. परंतु वडिलांची जशी कन्येवर जशी जास्तच माया असते तद्वत आम्हा पंचकन्यांवर (कल्पना, सीमा, दिपा, देवता, भारती) काकांची थोडी जास्तच माया.

      आम्ही लेकी-सुनांना, त्यांच्या नातवंडांना जसे काका प्रिय आहेत तसेच त्यांच्या सर्व जावईलोकांनाही (श्री. प्रकाश, श्री. संतोष, श्री. कश्‍यप, श्री. संदिप, श्री. किरण) पबीकाकांबद्दल आदरयुक्त प्रेम आहे.

      आज काकांना 75 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस आपण सर्वजण दिमाखात साजरा करणार आहोत. या मंगल समयी आपण असे म्हणूया की काकांच्या सर्व इच्छा-आकांक्षा फलद्रूप होवोत आणि त्यांना निरामय, निरोगी शतकी आयुष्य लाभो.

॥श्री गुरुदेव दत्त॥

– माधवी किरण पिंगुळकर

पूर्वाश्रमीची- भारती गुरुनाथ नाईक

9403762124

Leave a Reply

Close Menu