देवाचीये द्वारी उभा क्षणभरी

       कोकणात मंदिर संस्कृती मोठ्या प्रमाणात विखुरलेली आहे. येथील घराघरांत धार्मिकतेचा प्रभाव दिसून येतो. इतर हिदूंचे सण साजरे करण्याबरोबरच येथील मंदिरांमधील उत्सव तेवढ्याच भक्तिभावाने साजरा करण्यात कोकणातील माणसांचा पुढाकार असतो. त्यामुळे येथील वातावरण हे नेहमीच भक्तिमय दिसून येते. दिवाळी संपून गावोगावच्या जत्रांना प्रारंभ झाला आहे. कार्तिक शुद्ध द्वादशी ते महाशिवरात्रीपर्यंत या जत्रांचा हंगाम असणार आहे. त्यामुळे पुढचे काही महिने कोकणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळणार आहे.

     भाविकांची वर्दळ वाढावी, तेथील उत्सवाच्या निमित्ताने गावात एकोपा नांदावा यासाठी अलिकडे मंदिरात वर्षभर काहीनाकाही उत्सव साजरे केले जातात. परंतु, ‘जत्रा‘ हा त्या त्या देवतेचा वार्षिक उत्सव मानला जातो. काही ठिकाणी नाटक संपल्यानंतर पहाटेच्यावेळी दहीहंडी फोडत असल्याने याला ‘दहीकाला‘ असेही म्हटले जाते. वार्षिक कुलधर्म कुळाचार पूर्ण करण्यासाठी स्थानिक भाविकांसोबत अगदी चाकरमानीही वेळातवेळ काढून येतात. नोकरी, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने सर्वांना येणे शक्य नसले तरी कुटुंबातील एखादी व्यक्ती जत्रेला आवर्जून हजेरी लावतेच. जत्रौत्सवाच्यानिमित्ताने मंदिर परिसरात नारळ, केळी, खेळणी, फुगे, हॉटेल्स आदींची दुकाने मांडली जात असल्याने रोजगाराची संधीही उपलब्ध होते. बेरोजगार तरूण असा व्यवसाय करताना दिसतात. जत्रा या थंडीच्या दिवसातच सुरू होतात. त्यामुळे कडाक्याच्या थंडीत गरमागरम भजी आणि चहाचा आस्वाद घेण्याची एक वेगळीच मज्जा असते. त्यातल्या त्यात चुलीवर भाजलेली भजी असेल तर त्याची चवच न्यारी. अलिकडे जत्रांमध्ये चायनीज पदार्थांची रेलचेल दिसत असली तरीही ग्रामीण भागात तेथील स्थानिक लोक अजूनही जत्रेला कांदा भजीचे दुकान मांडतातच. पूर्वी जत्रेमध्ये फुग्यांची दुकाने असायची. मात्र, अलिकडे फुगे खरेदी करणा­या पिढीची आवड बदलल्याने ठराविक जत्रांनाच फुगे दिसतात.

जत्रेतला स्पेशल मेनू ‘‘खाजा‘‘

    जत्रेत गॅलरीपद्धतीने एकावर एक ठेवलेली मिठाई मोठमोठ्या विद्युत प्रकाश झोतात लक्ष वेधून घेतात. यात साखरेची गाठली, देवळे, कोंबडी, लाडू आणि खाजे यांचा समावेश असतो.  जास्त विक्री होणारी मिठाई म्हणजे ‘खाजे.‘ जत्रेच्या हंगामात घरोघरी खाजे असतेच. गुळ, तिळ, आले यापासून बनविलेले रूचकर खाजे खाण्याची मज्जा वेगळीच. जत्रेला आलेले चाकरमानी हे खाजे मुंबईत नेऊन आपल्या गावचा मेवा इतरांनाही देतात.

          फनीगेम्समधून विविध वस्तू

     देवदर्शन, खाद्यपदार्थ यासोबतच जत्रेमधील रिगा टाकून विविध वस्तू आणि थंडपेयाच्या बाटल्या काढणे अशा फनीगेम्सचाही आनंद लुटणारे भाविक पहायला मिळातात. आयताकृती मोठ्या फळीवर पांढरे कापड घालून त्यावर माचिस बॉक्स, बिस्कीट पुडा, साबण यासारखे वस्तू काहीशा अंतराने मांडण्यात येतात. यावर रिगा टाकल्या जातात. कुठलीही वस्तू रिगमध्ये पूर्ण बसली की, ती वस्तू त्या रिग टाकणा-­या व्यक्तीला मिळते.             

दशावतारी नाटक अविभाज्य घटक

     अलिकडे दशावतारी नाटके जवळ जवळ वर्षातील ८ ते ९ महिने सुरू असतात. परंतु, जत्रांमध्ये सादर होणा­-या दशावतारी नाटकांनी आपले वेगळे वैशिष्ट्य ठेवले आहे. जत्रांच्या हंगामामध्ये ‘आडदशावतार‘ हा अर्धा ते एक तासाचा भाग सादर केला जातो. यातील शंकासूराची एंट्री लक्षवेधी असते. यानंतर नाटकाचा मुख्य भाग संपन्न होतो. नाटक संपल्यानंतर काही ठिकाणी राधाकृष्णाचा खेळ करून दहीहंडी फोडली जाते.

     पूवीप्रमाणे दिवसभर मंदिराकडे राहून जत्रौत्सव साजरा करण्याचे प्रमाण अलिकडे कमी होत चालले आहे. वाढत्या धावपळीच्या जीवनात दैनंदिन कामे महत्त्वाची बनत आहेत. तरीही कोकणातील माणूस वेळात वेळ काढून ‘देवाचीये द्वारी उभा क्षणभरी‘ दिसून येतोच.

           – प्रथमेश गुरव (वेंगुर्ला) ९०२१०७२६२४

Leave a Reply

Close Menu