नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन

मी अनेक वर्षे कुडाळ वेंगुर्ला प्रवास करते आहे. प्रवासात थोड्याच वेळासाठीही भेटणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर मी गप्पा करते. अर्थातच बोलता बोलता मी साहित्य या विषयापाशी येते. प्रत्येकवेळी माझ्या मनावर चिंतेचा ओरखडा उमटत राहातो. त्या त्या वेळीच या मुलांसाठी आपण काहीतरी केलेच पाहिजे असा विचार रूजतो. त्या विचाराचे मूर्तरूप होताना नवांकूर बालकुमार साहित्य संमेलन आकार घेत आहे.

      मुलांना मातृभाषेचे प्रेम, मातृभाषेचे महत्व सांगितलेच पाहिजे. कोणत्याही मानवी वंशाचे आचार विचार, त्यांनी निर्माण केलेल्या कला व शास्त्रे, त्यांची आधिभौतिक व आध्यात्मिक  प्रश्‍नांकडे पहाण्याची दृष्टी, त्यांची जीवनमूल्ये इत्यादी अनेक घटक संस्कृती या शब्दात अंतर्भूत असतात. हा संस्कृतीचा व पूर्वजांचा वारसा मातृभाषेतूनच आपणास प्राप्त होतो. म्हणूनच मायबोलीचे रक्षण म्हणजेच स्वरक्षण होय. संस्कृती रक्षण, सामाजिक ऐक्य यासाठी मातृभाषेचे कार्य महत्वाचे आहे. हे मुलांना सांगितले पाहिजे.

      वाङ्मय म्हणजे काय? तर सुंदर विचार, सुंदर भावना यांचा कलात्मक व सौंदर्यपूर्णरितीने केलेला सुंदर अविष्कार म्हणजे साहित्य होय. बाह्य स्थूल इंद्रीयग्राह्य सौंदर्याच्या पलिकडे सूक्ष्म मानसिक सौंदर्याचे दर्शन लेखक घडवतो. जीवनाचा शाश्‍वत अर्थ व सत्य शोधण्याचा त्याचा प्रयत्न असतो. म्हणूनच साहित्याची आवड विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली पाहिजे. उगवत्या पिढीच्या उमलत्या बुद्धीला हे सर्व दिले पाहिजे.

      विद्यार्थ्यांवर अभ्यासाचा खूप ताण असतो. अभ्यास  करून भरपूर गुण मिळवून चांगली नोकरी मिळवणे अशा शिड्या चढताना एखाद्या शिडीवर थोडावेळ थांबून मुक्तपणे कथा व कवितांच्या जगात मुलांनी फिरून आले पाहिजे. अनेक प्रकारच्या अनुभवांच्या फुलांमधला आनंदाचा मध चाखला पाहिजे. विद्यार्थ्यानी अवांतर वाचनात कथा, कादंबऱ्या, चरित्रे, आत्मचरित्रे अशा पुस्तकांचे वाचन केले पाहिजे. पुस्तकांच्या वाचनातून त्यांच्या विचारांना दिशा मिळते. एखादी समस्या सोडविण्यासाठी लागणारी कौशल्ये समजून येतात व ते आव्हानाना सामोरे जाण्यास सक्षम बनतात. गप्पा, चर्चा, लेखन, सादरीकरण अशा विविध मार्गानी त्यांनी साहित्याचा आस्वाद घेतला पाहिजे.

      साहित्यातील विविध भावभावनांच्या परिपोषातून व वैचारिक वाङ्मयाच्या विचारधारेतून विद्यार्थ्यांच्या मनःपिंडाचे पोषण होत असते. मुलांना साहित्याची अभिरूची निर्माण झाली पाहिजे.

      आनंदयात्री वाङ्मय मंडळाने प्रथमच बालकुमार साहित्य संमेलनाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. ज्ञानाची, मनोरंजनाची, विचारांची, भावनांची, प्रेरणांची विविधरंगी फुले मुलांवर उधळली जाणार आहेत. यासाठी संमेलनाचे अध्यक्ष हे अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष लेखक मदन हजेरी व लेखक आपल्या भेटीला या उपक्रमांतर्गत मार्गदर्शनासाठी पुणे येथील लेखक प्रकाश पारिख हे उपस्थित राहाणार आहेत. हा आमचा उपक्रम मुलांना नक्कीच आवडेल याचा विश्‍वास आहे. मनोरंजनातून ज्ञान या सूत्रानुसार कार्यक्रमांची आखणी केलेली आहे. कवितेच्या गावा या कार्यक्रमात मुलांनाच सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे. मुले यात चांगली रमतील याचा विश्‍वास वाटतो आहे.

-सौ. वृंदा कांबळी, 9421262030

Leave a Reply

Close Menu