स्वातंत्रोत्तर ७५ वर्षात काय साधलं व काय गमावलं?

१५ ऑगस्ट २०२२ स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष. हे देशात साजरे करताना रावापासून रंकापर्यंत सर्वजण आनंदाने व देशभक्तीने न्हाऊन जात आहेत. यावर्षी तर देशाच्या पंतप्रधानांनी हर घर तिरंगाफडकविण्याचे आदेश पारित केले आहेत. त्यानुसार देशातील प्रशासकीय यंत्रणेने हे अभियान उत्स्फूर्तपणे राबविले आहे. भारत माता की जयअसे नारे देत स्वातंत्र्यदिनी तरी आपण भारतीय म्हणून किमान एकत्र येत असतो. भारतीय परंपरेचा व संस्कृतीचा हा वारसा गेली ७५वर्षे अव्याहतपणे चालू आहे. व भविष्यातही सूर्य, चंद्र असे पर्यंत तो चालू राहिलं ह्या बद्दल तिळमात्र शंका नाही. त्या दिवशी आपण परकीय गुलामगिरीतून मुक्त होत, सार्वभौम समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही स्विकारल्याचा सार्थ अभिमान व गर्व प्रत्येक भारतीयांच्या नसानसात दिसून येतो.

      गेली ७५ वर्षे ज्ञान, विज्ञानाच्या जोरावर कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, शिक्षण, आरोग्य, संशोधन, संरक्षण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात उंच भरारी घेतली आहे. सामाजिक व धार्मिक सलोखाही जोपासण्याचा काही अंशी प्रयत्न होताना दिसत आहे. भारतीय राज्य घट-नेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली स्वतंत्र्य, समता, बंधुता ह्या त्रिसूत्रीवर आधारित धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी घटना स्वीकारून गेल्या ७५ वर्षांत मुक्तपणे स्वातंत्र्य अनुभवत आहोत.

   देशाचा इतिहास काळानुरूप अधिकाधिक प्राचिन होत जातो. ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी झगडण्याचा जसा काळ होता तसाच आजच्या एकविसाव्या शतकात राष्ट्रवाद, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन, गतिशील संविधानिक चळवळी, सामाजिक व मानसिक स्थित्यंतरे इ. बाबतीत सक्षम मनोबल निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. हे सगळं जरी एका बाजूने खरं असलं तरी सुद्धा देशाच्या गेल्या ७५ वर्षांचा लेखाजोगा करण्याची आज अनिवार्यता निर्माण झाली आहे. आपण भौतिकदृष्ट्या संपन्न होत असताना आपण आपली समाज व्यवस्था निकोप करू शकलो आहोत का? धर्मनिरपेक्षतेचा पुरस्कार करताना आपापल्या धर्मांचे उदात्तीकरण करणे अनिवार्य का होत आहे? आपणास पुरोगामित्वाचा वारसा लाभलेला असतानाही आपल्या ऐक्यभावनेचे बंध दिवसेंदिवस तकलादू का बनत आहेत? देशातील महापुरुषांना गटातटातील फ्रेममध्ये बंद करून आपण निश्चित काय साधू इच्छितो? या सर्वामध्ये मानवता सोयीस्करपणे विस्मृतीत जात केवळ माझा देश व माझं व्हिजनयावर वांझ चर्चा ऐकायला मिळतं आहेत.

   स्वातंत्र्योत्तर काळात सर्वांगीण प्रगती साधत असताना देशात पुरेशा रोजगाराच्या संधी उपलब्ध न झाल्याने सुशिक्षित बेकारीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते. कृषी क्षेत्रात प्रगती साधतानाही शेतक-यांच्या आत्महत्याही वाढीस लागत आहेत. शैक्षणिक व आरोग्य विषयी प्रगती साधत असताना अजूनही देशातील बहुसंख्य मागास भागात शिक्षण, आरोग्य, दळणवळण ह्या बाबतीत अजूनही चिंताजनक परिस्थिती आहे. त्यामुळे कुपोषणाच्या बळीची संख्या वाढीस लागताना दिसत आहे. सांस्कृतिक, साहित्यिक चळवळीतील निकोपपणा लुब्ध होत गटातटांचे प्राबल्य वाढीस लागताना दिसून येत आहे.

   ७५ वर्षांत सृजनतेचा, नवनिर्माणाचा शोध घेत असताना एकात्मकतेची धून वाजवताना आपण खरोखरच सामाजिक सलोख्याचे प्रदेश निर्माण करू शकलो आहोत का? केवळ विविध अस्मितांच्या पोकळ गप्पा मारताना नैतिकता जपणेही आज हेतू पुरस्कर अमान्य केले जात आहे. विविध क्षेत्रात मुल्यात्मक बदल अपेक्षित असताना समाज व्यक्ती सापेक्षतेकडे झुकताना दिसत आहे. विचारांच्या व तत्वज्ञानाच्या नव्या संहिता निर्माण होत एकमेकांविषयी द्वेषभावना वाढीस लागत आहे. वैचारिकता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य यावर बंधने येत त्यांचा मूळ हेतूच नाहीसा होताना दिसत आहे. समाजातील दलित, शोषित भय, असुरक्षितता, हिसा, अत्याचार, बलात्कार, भ्रष्टाचार इ. बाबी समाजरचनेतून वजा होत नसतील तर उद्याच्या नव्या समाज रचनेची निर्मिती, नवीन मूल्ये कोणत्या आधारावर रुजवायची ह्याचा विचार होणे गरजेचे आहे. ह्या सर्व वास्तवाची जाण ठेऊन आगामी काळात प्रत्येकाने वर्तन केल्यास देशात सामाजिक व आर्थिक क्रांती होण्यास निश्चित वेळ लागणार नाही. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षांत प्रत्येक भारतीयाने भारत माझा देश आहे, आम्ही सर्व बांधव आहोत!ही भावना जपून वर्तन केल्यास देशाचा भविष्यकाल निश्चित उज्ज्वल ठरेलं

-संजय तांबे, फोंडाघाट, ९४२०२६१८८८

 

 

 

Leave a Reply

Close Menu