चतुरस्त्र रंगकर्मी मधुकर तोरडमल स्मृती राज्यव्यापी स्वगत आणि साभिनय नाट्य प्रवेश वाचन ऑनलाईन स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. यातील स्वगत स्पर्धेत वेंगुर्ला येथील साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनी द्वितीय तर वेंगुर्ला हायस्कूलमधील इयत्ता सहावीतील विद्यार्थी कु. चिन्मय शशांक मराठे याने उत्तेजनार्थ क्रमांक पटकाविला.
स्वगत स्पर्धेत प्रथम-मनिषा घोडके (गोरेगांव), तृतीय-विवेक नाईक (ठाणे) तर साभिनय नाट्य प्रवेश वाचन स्पर्धेत गोपाळ जोशी आणि ग्रुप (रत्नागिरी)-प्रथम, दिलीप धोत्रे आणि ग्रुप (पुणे)-द्वितीय, डॉ.नारकर व ग्रुप (रत्नागिरी) आणि मोहन साटम आणि ग्रुप (मुंबई) यांना तृतीय क्रमांक (विभागून), उत्तेजनार्थ-ऋतुराज पाटील (कोल्हापूर) यांना मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून सुभाष भागवत आणि संध्या वेलणकर-ओक यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ 24 जुलै रोजी मुंबई मराठी साहित्य संघाच्या ‘अक्षर साहित्य दालना’मध्ये प्रा.मधुकर तोरडमल उर्फ मामांच्या जयंतीनिमित्त सुप्रसिद्ध जेष्ठ रंगकर्मी बाळ धुरी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी विजेत्या स्पर्धकांनी आपले सादरीकरण केले. तसेच पाचवा ‘चतुरस्त्र पुरस्कार सोहळा’ रत्नागिरीच्या ज्येष्ठ रंगकर्मी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व सुहास भोळे यांना ख्यातनाम अभिनेते बाळ धुरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. रोख 5 हजार, मानपत्र व भेटवस्तू असे त्यांच्या पुरस्काराचे स्वरुप आहे.
आयोजकांच्या विनंतीनुसार सुहास भोळे यांनी प्रा.मधुकर तोरडमल यांच्या ‘काळे बेट लाल बत्ती’ या नाटकातील एक स्वगत रसिकांसमोर सादर केले. यावेळी व्यासपिठावर अभिनेते उपेंद्र दाते, संध्या वेलणकर-ओक, सुभाष भागवत, तसेच मामांच्या कन्या शर्मिला माहुरकर आणि तृप्ती तोरडमल उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे निवेदन विशाख म्हामणकर यांनी केले. पुढील वर्षी प्रा. मधुकर तोरडमल यांच्या ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ या नाटकातील उताऱ्यांवर आधारित स्पर्धा आयोजित करण्यात येईल असे आयोजकांनी जाहीर केले आहे.