काही दिवसांपूर्वी अमिश त्रिपाठी यांनी लिहिलेली राम व शिव यांच्या आयुष्यावर आधारित पुस्तके वाचनात आली. आपल्या संस्कृतीत आपण या दोघांना देव मानत असलो तरी अमिश यांनी वेगळ्या आणि वास्तववादी दृष्टिकोनातून या आणि त्यांच्याशी संबंधित अनेक व्यक्तिरेखा मांडल्या आहेत. शिवाचे चरित्र असल्यामुळे त्यात गणपती असणे अपरिहार्य होते. सामान्य मनुष्यांपेक्षा दिसण्यात थोडे वेगळेपण असणाऱ्या किंवा ज्यांच्या अवयवात काही विकृती आहे अशा लोकांना नाग असे म्हटले जात होते. असे लेखकाने मानले आहे. गणपती हा अशा लोकांपैकी एक होता असे त्यांना वाटते.
वास्तविक यातील खरे-खोटे जाणून घेण्यापेक्षा गणपतीच्या ठायी असणारी ही सर्व वैशिष्ट्ये म्हणजे माणसाला माणूसपण शिकवणारी प्रतीके आहेत असे मला वाटते. गजानन म्हणजे हत्तीसारखे डोके असणारा गणपती हे ज्ञानाचे प्रतीक आहे. हत्ती हा प्राणी किती हुशार असतो याची कल्पना सिंधुदुर्गवासीयांना वेगळी देण्याची गरज नाही. त्याचे कान सुपासारखे आहेत. सुपात धान्य घेऊन त्यातील कचरा साफ केला जातो. आपणही व्यवहारात अनेक गोष्टी ऐकत असतो. त्यातील चांगल्या-वाईट गोष्टींचा शहानिशा या सुपासारख्या कानांनी करावा असे जणू गणपती आपल्याला सांगत असतो. छोटे डोळे जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे सूक्ष्म नजरेने/बारकाईने बघायला शिकवते. मोठे पोट म्हणजे जीवनात येणाऱ्या सर्व चांगल्या-वाईट गोष्टींना सहजपणे पचवण्याची ताकद देणारे प्रतीक आहे.
गणपतीजन्माची दंतकथाही आपण लहानपणापासून ऐकतो. पार्वतीने आपल्या अंगावरील मळापासून गणपतीची निर्मिती केली अशी ती कथा आहे. वास्तविक “पार्वतीच्या अंगावर इतका मळ होता की एक पूर्ण मनुष्याची निर्मिती व्हावी?“ अशा काही शंकाही आपल्या मनात सहजच येतात. पण थोडा विचार केला की लक्षात येते की मानवाची निर्मिती स्त्रीबीज आणि पुरुषबीज यांच्या संयोगातून होते. जर हा संयोग झाला नाही तर नवीन जीवासाठी केलेली तयारी स्त्रीशरीरातून रजस्त्रावाच्या स्वरूपात बाहेर पडते. तो एक प्रकारचा मळच नाही का? पण गर्भनिर्मिती होते तेव्हा तोच पोषण म्हणून वापरला जातो. कदाचित सर्वसामान्य लोकांना सहज समजाव्या म्हणून या दंतकथा निर्माण झाल्या असाव्यात. यजुर्वेदात तर “न तस्य प्रतिमा अस्ति।“ म्हणजेच त्याची म्हणजे गणपतीची कोणतीही प्रतिमा नाही असे म्हटले आहे. म्हणूनच प्रत्येकाने आपल्या संकल्पनेप्रमाणे गणपती उभा केला.
मग हाच गणपती ‘ओ माय फ्रेंड गणेशा’ म्हणून बच्चे कंपनीचा जवळचा मित्र बनला. तर ‘गणराज रंगी नाचतो, पायी घागऱ्या करिती रुणझुण’ असे म्हणत कलाकार त्याला आपले दैवत मानतात. कोकणातील दशावतार तर गणपतीशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गणपतीचा आशीर्वाद हवाच! वेदव्यासाना महाभारत लिहिण्यासाठी लेखनिक म्हणून गणेशानेच साहाय्य केले. महाभारत हे सर्वसामान्य लोकांच्या प्रवृत्तीचे दर्शन आहे. ते समोर आणण्याचे कामच जणू गणपतीने केले आहे. वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज आणि धुम्रवर्ण अशा आठ अवतारात तो पुराणात वर्णन केला जातो. प्रत्येक अवतार हा असूराला नष्ट करण्यासाठीच निर्माण झाला. असूर म्हणजेच दुष्ट प्रवृत्ती! तिचा नाश करणाऱ्या अवतारांचे प्रतीक म्हणजे ही गणेशाची वेगवेगळी रूपे आहेत. संस्कृत भाषेत तर वेगवेगळ्या स्तोत्र-सुभाषितांतून तो आपल्याला भेटत जातो. ‘वक्रतुंड महाकाय सुर्यकोटी समप्रभ….’ मध्ये गणेशाची स्तुती केली आहे. तर हे गणेशाचे कुटुंब म्हणजे एखाद्या सामान्य कुटुंबासारखे वर्णन करताना एखादा सुभाषितकार म्हणतो-
स्वयं पंचाननः, पुत्रौ गजाननषडानन्नौ। दिगम्बरः कथं जीवेदन्नपूर्णा न चेद्गृहे ॥
कवी म्हणतो “गजानन म्हणजे हत्तीचे मुख असणारा गणपती, षडानन म्हणजे सहा मुख असणारा कार्तिकेय आणि पाच मुखे असणारा शंकर ज्या घरात आहे त्या घरातील पार्वती अन्नपूर्णा नसेल तरच नवल!” त्यामुळेच सर्वाना हवाहवासा वाटणारा हा गणपती भाद्रपदात दहा दिवसांत घराघरातून आपले लाड करून घेतो. लाल रंगाची फुले, त्याने नेसलेले पितांबर, दुर्वा, हिरव्या रंगातील वेगवेगळ्या छटा दाखवणाऱ्या पत्री, कापसाची शुभ्र वस्त्रे यांनी सजलेले रंगीबेरंगी मखर म्हणजे जणू काही भाद्रपदातील निसर्गात दिसणारी सृष्टी घरात अवतरल्यासारखी वाटू लागते. करंजी, मोदक, खीर अशा पदार्थांनी सर्वांच्याच जीभेचे चोचले पुरवले जातात. सर्व हेवेदावे विसरून कुटुंबातील सर्वच लोक एकत्र येऊन हा उत्सव उत्साहाने साजरा करतात. म्हणूनच हा उत्सव म्हणजे कला, संस्कृती, परंपरा आणि संघटना यांचे प्रतीक आहे असे म्हणतात. त्यामुळेच लोकमान्य टिळकांनी लोकांच्या मनात स्वातंत्र्याचा जागर होण्यासाठी या उत्सवाला सार्वजनिक रूप दिले.
संस्कृत साहित्यात आणखी एक सुभाषितकार गणपतीची स्तुती करताना म्हणतो की ज्याची निर्मिती आईच्या मळापासून झाली आहे, वडिलांमुळे ज्याने मानवी मस्तक गमावले आहे, ज्याचे वाहन उंदीर आहे असा तो गणेश एकदंत आणि लंबोदर आहे. तरीही क्रियासिद्धी सत्त्वे भवति महतां नोपकरणे। म्हणजेच कोणतेही कार्य सफल होण्यासाठी उपकरण किंवा साधन महत्त्वाचे नाही तर आत्मविश्वास आणि पराक्रम सार्थ ठरतो. छोट्या छोट्या गोष्टींनी निराश होऊन टोकाचे निर्णय घेणाऱ्या आमच्या पिढीने हे लक्षात घेतले पाहिजे. आज आम्हाला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात काहीतरी चांगले परिवर्तन अपेक्षित आहे. म्हणूनच आपल्या हाती नसणाऱ्या साधनांचा विचार न करता स्वतःच्या सक्रिय सहभागाने चांगले काहीतरी निर्माण करण्याचा प्रयत्न करु या. आज भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली असताना या गणपती उत्सवात हाच संदेश सर्वाना प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते. – डॉ. मेधा फणसळकर, 942301996