जिल्ह्यात पर्यावरणपुरक उद्योग आणणार-उदय सामंत                

सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत्या सहा महिन्यात पर्यावरण पूरक उद्योग आणण्याचा माझा मानस आहे. देशाच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून २५ हजार नवीन उद्योजक आणि त्यांच्या माध्यमातून ७५ हजारहून लोकांना रोजगार मिळण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी वेंगुर्ला येथे केली. दरम्यान आडाळी, कासार्डे व वैभववाडी येथील एमआयडीसी पुनर्जीवित करण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत त्या दृष्टीने लवकरच बैठक घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

       श्री.सामंत मंत्रीपद स्वीकारल्यानंतर चतुर्थीच्या निमित्ताने प्रथमच वेंगुर्ल्यात आपल्या निवासस्थानी आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले येणा-या काळात माझ्या मंत्रिपदाचा उपयोग हे जिल्ह्याच्या आणि पर्यायाने कोकणाच्या विकासासाठी करणार आहे. यावेळी कोकणाला ताकदीने मदत करणार आहे. आडाळी-दोडामार्ग येथे उपलब्ध असलेल्या जागेत मोठे उद्योग आणण्याचा मानस आहे. त्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय मोपा एअरपोर्ट होत असल्याने गोव्यातील बरेचसे उद्योजक या ठिकाणी येण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे त्यांची मदत घेतली जाणार आहे. या ठिकाणी त्यांना उद्योग उभारण्यासाठी जमिनी देताना ८० टक्के रोजगार हा स्थानिकांना मिळाला पाहिजे अशी अट घालण्यात येणार आहे आणि त्या माध्यमातून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार मिळेल यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. याची अंमलबजावणी येत्या सहा महिन्यात होणार आहेत असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Close Menu