या आनंदाचं करायचं तरी काय?

      मुलांसाठी कोरोनाची लस देणं सुरु झालं आणि माझ्या मैत्रिणीशी, जिचा मुलगा साधारणत: चौदा वर्षांचा आहे, फोनवर बोलणं झालं. बोलता बोलता ती सहज म्हणाली, “अग आज लस मिळाली बरं का शाळेत. पण जाताना या सगळ्या मुलांना एवढे प्रश्‍न पडले होते ना. महत्त्वाचा प्रश्‍न म्हणजे, आम्हाला योग्य ती लस देतील ना. तो प्रश्‍न ऐकून मला तुझी आठवण आली.”

      ही घटना परवा परत आठवली. शाळेतल्या एका मैत्रिणीशी फोनवर बोलणं चाललं होतं. कोविडकाळात परत एकदा जुने मित्रमैत्रिणी भेटलेत. ही जरा उशीराने भेटली. बोलता बोलता नेहमीप्रमाणे गाडी आपापल्या नवऱ्यांवर घसरली. तिने मला विचारलं, “स्वभाव कसा आहे ग तुझ्या नवऱ्याचा?“ मी नेहमीप्रमाणे सुरु, “अग जरा तापट आहे पण बाकी खूप छान… माझ्या प्रगतीत त्याचाच मोठा वाटा आहे वगैरे वगैरे.“ त्यावर ती पलिकडून म्हणाली. “बघ हो बाई, या नवऱ्यांचं काही सांगता येत नाही. जसा दाखवतो तसा असेलच असं नाही.“

      “अग, तीस वर्ष झालीयत आमच्या लग्नाला“ मी.

      “होईनात का, कोणाचं काय सांगावं…वगैरे वगैरे“ ती.

      तो फोन झाला आणि मनात विचार सुरु झाला. माझ्या मैत्रिणीचा मुलगा असो वा ही माझी शाळेतली मैत्रिण असो. दोघंही कोणत्याच परिस्थितीत आनंदी राहू शकणार नाहीत. कारण मनात सतत असलेला संशय. ही दोन फक्त प्रातिनिधिक उदाहरणं आहेत. आपल्या आसपास अशा माणसांची संख्या वाढतेय ज्यांच्यामध्ये संशयी वृत्ती आहे किंवा बळावते आहे. पूर्वी शाळा, शिक्षक वगैरे ठोस ठिकाणं होती ज्यांच्यावर लहान मुलांचा डोळे झाकून विश्‍वास असायचा. बार्ईंनी सांगितलेला चुकीचा मुद्दाही खरा मानून मुलं इतरांशी भांडायचीही काहीवेळा. पण पुढे क्लास संस्कृती फोफावली, शाळांना पर्याय, कॉलेजशी टाय अप वगैरे गोष्टी रुजल्या आणि हा विश्‍वास पार डळमळू लागला. तीच पिढी प्रौढ झाली आणि या अविश्‍वासाने भरलेल्या लोकांचा आनंद नाहिसा झाली. सततच्या अविश्‍वासापायी मनात कोणते ना कोणते संशयाचे भूत बाळगून असलेल्या लोकांच्या संख्येत वाढ झाली आणि त्यामुळे ते आपला आणि आसपासच्या लोकांचा आनंद गमावू लागले.

    हे सगळं आनंदाशी येऊन ठेपलं, त्याबरोबर आनंदी देशांमध्ये भारताचा घसरलेला क्रमांक ठळकपणे दिसू लागला. 146 देशांमध्ये आपला क्रमांक 136! अफगाणिस्तान 146 व्या क्रमांकावर असणं अत्यंत नैसर्गिक आहे. तिथली राजकीय, सामाजिक आणि एकंदर सगळीच परिस्थिती तशीच आहे पण आपल्या भारतात तर असं काही नाहीय ना. एक आहे, आपण या सर्वेक्षणावरच बोट दाखवू आणि म्हणू, कोण म्हणतंय हे, खरं असेल कशावरून, कोणीही असं सर्वेक्षण करतं आणि निष्कर्ष काढतं काहीतरी. झूठ आहे हे सारं.

      पण, असं म्हणून सोडून देण्याएवढे साधं आहे का हे. नक्कीच नाही. कारण जेव्हा संशय आणि अविश्‍वास वाढत जातो तेव्हा निर्माण होतो असहकार. ज्या ज्या समाजात असहकार फोफावतो, तो समाज प्रगती करू शकत नाहीच, बरोबरच असहकारामुळे सामाजिक एकतेचा भंग झाल्याने भेगाळलेला समाज आनंदी असणं अशक्यच. काहीवेळा मला वाटतं, आपल्याकडे संशय-अविश्‍वास-असहकार असा प्रवास नसून असहकार-अविश्‍वास-संशय असा प्रवास झाला असावा का? स्वातंत्र्यप्राप्तीसाठी आपण इंग्रजांशी असहकार आरंभला. त्यातुन स्वातंत्र्य प्राप्त झालं. पण शिक्षणाचा  महत्त्वाचा भाग आहे सहकार आणि सामंजस्य. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर असहकाराचं अध्ययन न झाल्यानं, यानांच सुरुंग लागला आणि  संशय मनामनांत रुजला अगदी कायमच्यासाठी. हसत, खेळत शिक्षण आणि आनंददायी शिक्षण असं घोषवाक्य असलेल्या काळात शिकलेली पिढी प्रौढ झाली आणि आनंदाच्या बाबतीत आपला नंबर पार घसरला, यावर विचार करायला हवाच ना. भविष्यातील शिक्षणपद्धतीचा ढाचा ठरवण्याच्या दृष्टीने तर हे खूपच महत्त्वाचं आहे. मुलांना आनंद मिळावा आणि त्यांच्यावर कोणताही ताणतणाव नको म्हणून अभ्यासक्रम अधिकाधिक सोपा, गुणांची लयलूट, गृहपाठ न देणे किंवा त्यांची सक्ती न करणे, जास्तीत जास्त गोष्टी त्यांच्यासाठी फुकट किंवा आयत्या उपलब्ध करून देणे, त्यांच्या दुर्गुणांचा उच्चार न करणे किंवा त्यावर बोट न ठेवणे असे अनेक निर्णय घेतले जातात. यातून त्यांना तात्पुरता आनंद मिळत असेलही पण दीर्घकालीन आनंदाचं काय? अभ्यास, सराव यांची कमतरता, टीकाकारांना तोंड देण्याची किंवा टीका पचवण्याची क्षमता, दुर्गण आहेत हे मान्य करत त्यावर मात करण्याची शक्ती, काहीतरी मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करून ते मिळवण्याचा आनंद या सगळ्यालाच कायमची कात्री लागते. पुरुषोत्तम करंडक कोणालाही न मिळणे ही खरंतर बातमीची छोटीशी चौकट पण त्याचं मूळ या सगळ्यात असावं असं माझं तरी ठाम मत आहे.

      त्यातच हल्ली एक बातमी वाचली की भारतात शहरी भागातील 30% मुलांनी आणि 17% शाळकरी मुलींनी लैंगिक संबंध असल्याचं एका सर्वेक्षणात नोंदवलं आहे. या दोन्ही गोष्टींचा एकत्रित विचार करून अध्ययन अध्यापनाची उद्दिष्ट्ये, साधने, पद्धती आणि मूल्यमापन यांचा विचार होणं गरजेचं आहे. कोणी म्हणेल, आनंद-लैंगिकता-शिक्षण या कशाचा, कशाला मेळ नाहीय उगाचंच काहीतरी संबंध जोडू नका. पण हा उगाचचा संबंध नाहीच आहे. शिक्षणातला आनंद हरपल्यामुळे होणारे हे सगळे परिणाम आहेत.

      शिक्षणाला कॉर्पोरेट स्वरुप आलं, त्यातली नैसर्गिकता हरवली आणि ते बेगडी बनलं हे आपण गेली 25 वर्ष तरी ऐकतोय. त्याचीच ही फलश्रुती आहे. ह्या एवढ्या मुलांना शिकवा, हा एवढा निकाल द्या आणि हे एवढं पॅकेज मिळवा असं सोपं गणित आहे खाजगी शाळांचं, असं सहज म्हणतात लोक बोलताबोलता (ते खरंच तसं आहे का हा संशोधनाचाच विषय आहे.) म्हणजे शिक्षण जरी विद्यार्थीकेंद्रित बनलं असं आम्ही कितीही ओरडलो तरी ते निकालकेंद्रितच आहे आणि कागदावरच्या गुणांना फारसं महत्त्व देऊ नका, सद्गुणांना द्या असं कितीही  सांगितलं जात असलं तरी शालेय शिक्षणाचं उद्दिष्ट हे कागदावरचे गुणच आहे हे निर्विवाद सत्य आहे.

      या गुणांची सर्वांनाच भुरळ पडलीय. त्यामुळे किती नि काय वेगवेगळ्या गोष्टी घडतात जशा की शाळेत न जाता मुलं फक्त क्लासला जातात, त्या क्लासचा शाळेशी टाय-अप असतो. त्यामुळे शाळांमध्ये कला, क्रीडा, हस्तकला, संगीत, व्यक्तिमत्व विकास असे जे विषय शिकणं अभिप्रेत आहे ते डावलून फक्त गुणांसाठी महत्त्वाचे असणारे विषय शिकत मुलाचं शालेय शिक्षण पूर्ण होतं आणि इथूनच आनंदाच्या ओहोटीला सुरुवात होते. वर नमूद केलेले किंवा त्यासारखे इतर विषय हे ताणतणाव व्यवस्थापनात मोठं योगदान देतात, फक्त गृहपाठाने तणाव येत नाहीच. या सर्वांना फाटा दिल्याने मुलं सतत तणावाखाली असतात आणि तणाव हा आनंदातील मोठा अडथळा असतो हे नव्याने सांगायची गरज नाही.

      सततची स्पर्धा, कुटुंबव्यवस्थेचा ऱ्हास वगैरे सतत बोलले जाणारे मुद्दे बाजूला ठेवून स्पर्शांबाबत बोलणं महत्त्वाचं वाटतं. कुटुंबात जरी माणसांची कमी असेल आणि ते कुटुंब समाजाभिमुख असेल तर मुलांना शिशुअवस्थेपासून वेगवेगळे स्पर्श माहितीचे होतात, ओळखता येतात. पण आजकाल आम्ही आमच्या कुटुंबापुरते मर्यादित जगतो, विशेष कुणी आमच्याकडे येत नाही. शाळा आणि क्लासेस वगळता आमची मुलं कुठे जात नाहीत अशा जगण्याची फॅशन आली आहे. शाळेत शिक्षकांनी हातही लावायचा नाही मुलांना. पुरुष शिक्षक तर good touch and bad touch याला घाबरूनच असतात. या सर्व गोष्टींमुळे मुलांना स्पर्श मिळतच नाहीत अनुभवायला. प्रत्येक व्यक्तीला जन्मत:च स्पर्शाची तहान असते. मुलांची ती तहान दबली जाते. त्यातून मग पौंगडावस्थेत लैंगिक स्पर्शासाठी जास्त उत्सुकता निर्माण होते. शहरी भागात हे स्पर्शाच्या तहानेचं दमन जास्त होत असल्याने कदाचित वर बातमीत उल्लेख  केलेली स्थिती प्रकर्षाने समोर येते. म्हणून ही स्थिती निमशहरी किंवा ग्रामीण भागात नसेलच असं नाही. सांघिक मैदानी खेळ हे वेगवेगळ्या स्पर्शासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरत असतात. एका संघातील खेळाडूंमध्ये असणारे वेगवेगळे स्पर्श, प्रतिस्पर्ध्यामधील स्पर्श, मार्गदर्शकांचे स्पर्श, ज्येष्ठांचे आशीर्वादाचे स्पर्श असे अनेक स्पर्श यात येतात जे आपोआपच मुलांची स्पर्शांची गरज पूर्ण करतात.

      हे सगळं वाचताना कुणी म्हणेल की एकंदर परिस्थिती खरंच एवढी बिकट आहे का? अजून खूप बिकट नाहीय पण बिकट बनू नये यासाठी सजगतेने प्रयत्न करावी अशी नक्कीच आहे. काय करता येईल यासाठी असा विचार करताना, पहिल्यांदा शाळेवरचा विद्यार्थी आणि पालकांचा विश्‍वास वाढणं हा महत्त्वाचा मुद्दा ध्यानात येतो. एकंदरच शिक्षण या विषयाशी जे जे कोणी संबंधित आहेत त्यांनी त्यांनी याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ नक्कीच आहे. मूलभूत शिक्षणावर भर देणं जास्त महत्त्वाचं आहे. कधीतरी वेगळ्या संदर्भात बोलताना माझे एक मित्र म्हणाले होते की पोहोणं शिकवणं म्हणजे सगळ्यांना पाण्यावर तरंगायला शिकवणं मग त्यात कोणी उंचावरून उडी मारून पोहतो, कुणी पाठीवर पोहतो, कुणी खूप खोल जातो, कुणी समुद्रात जातो तर कुणी महासागर पार करतो. एकदा मुलभूत शिक्षण पक्कं झालं की प्रत्येक व्यक्ती आपला विकास करत पुढल्या टप्प्याचा आनंद घेते. तसंच आहे लेखन, वाचन, गणन या मूलभूत कौशल्यांबरोबर नृत्य, नाटय, शिल्प, कला, क्रीडा यातील मूलभूत गोष्टीही मुलांना शिकवल्या गेल्या आणि त्या शिकवण्यावर वेळ फुकट जातो, याचा उपयोग काय, याने पोट भरणारे काय असे आक्षेप न घेता एकंदर समाजाने विश्‍वास दाखवला तर त्याच गोष्टी आपल्या बाळांचं पुढचं आयुष्य आनंदी आणि संस्कारी करू शकतील.

      या मूलभूत शिक्षणासाठी मी माझंच उदाहरण देईन. मला स्वत:ला कोणत्याही कलेत फारशी गती नाही पण शाळेत सर्व कलांना थोडाथोडा का असेना स्पर्श केल्याने जेव्हा अगदी नकारात्मकता येते तेव्हा आपोआपच कुसुमाग्रजांचं शाळेत शिकलेलं, सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना हे गीत ओठांवर येतं आणि निराशा झटकली जाते. बी.एड्. ला तर सगळ्या कलांची उजळणी घेतलीच होती करून. त्यामुळे बी.एड्. करून बाहेर पडल्यावर आत्मविश्‍वासातली वाढ लक्षात येण्याएवढी होती, स्वत:च्याच. साधे शालेय कवायतीचे हात सकाळी उठून केले तरी शाळेतील सांघिक कवायतीची आठवण, मित्रमैत्रिणींची आठवण असं बरंच काही मनात येतं आणि दिवसाची सुरुवात आनंदाची होते.

      आनंद हा आयतेपणात नसतो, आनंद हा कुणी पुरवू शकत नाही तर आनंद हा कमवावा लागतो आणि तो कमावण्यासाठी कष्ट आवश्‍यकच असतात. अभय बंगानी म्हटल्याप्रमाणे जे शालेय अभ्यास करतात त्यांचं भविष्य सुखाचं असतं त्याच चालीवर जे लहानपणी थोडेसे कष्ट घेतात त्यांना मोठेपणी साध्यप्रती पोहोचल्याचा आनंद मिळतोच, अन्यथा शालेय आयुष्य सुखासीनतेत घालवलेल्यांना तरुणपणात कदाचित कपाळावर हात मारून घेत म्हणावं लागेल, या आनंदाचं आता करायचं तरी काय?

-मेघना जोशी, 9422967825

Leave a Reply

Close Menu