‘साहित्य’ हा विषय अनेकजण फक्त लेखक, कवी थोडक्यात साहित्यिकांपुरता मर्यादित आहे असे मानतात. पण याच साहित्यातील ओव्या, वासुदेव, भजन, भारुड, लावणी, पोवाडा, नाटक, कथाकथन, कवितांचे सादरीकरण आदी मनोरंजनात्मक उद्देशाने साहित्य या विषयाकडे पाहिले तर याची व्याप्ती आपल्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे लक्षात येईल. म्हणूनच साहित्य संमेलनामध्ये प्रत्येक व्यक्तीने सहभागी झाले पाहिजे. कथा, कविता यातील सूत्र ही आपल्या आजूबाजूच्या घटनांमधूनच आलेली असतात. म्हणजे साहित्य हे समाजमनाचा ’आरसा’ असते.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त भालचंद्र नेमाडे यांच्या मते, ’कोट्यावधी रुपये खर्च करून होणाऱ्या अखिल भारतीय स्तरावरच्या संमेलनापेक्षा तालुका पातळीवरील होणारी संमेलने नवीन लेखकांना व्यासपीठ देतात. वाचक लेखकांचा संवाद वाढवितात. जगात भेडसावणारे स्थानिक प्रश्न प्रकर्षाने मांडले जातात’. याच धर्तीवर साहित्यिक वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून व पुढाकाराने वेंगुर्ला तालुक्यात आनंदयात्री वाङ्मय मंडळ आयोजित त्रैवार्षिक अशी दोन वर्षे मराठी साहित्य संमेलने यशस्वीरित्या संपन्न झाली. यावर्षी मराठी साहित्य संमेलनाचे हे तिसरे वर्ष आहे. 10 व 11 डिसेेंबर रोजी वेंगुर्ल्यातील ग्रामीण भागातील लिहित्या हातांना व्यासपीठ व दिशा मिळावी, तालुक्याचा समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीतून जतन करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, साहित्य विषय उच्च अभिरुची निर्माण करून ती जतन करण्यासाठी वातावरण निर्मिती व्हावी, वाचक, रसिक, लेखक, कवी, साहित्यप्रेमी, अभ्यासक, विद्यार्थी अशा सर्वांनी एकत्र येऊन विचारांची देवाण-घेवाण करावी, नवोदितांना तज्ज्ञ अभ्यासकांचे मार्गदर्शन लाभावे अशा अनेक उद्देशाने वेंगुर्ला तालुका साहित्य संमेलनाचे आयोजन वृंदा कांबळी यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.
सर्वसाधारणपणे जिल्हास्तरावर संमलने होतात. ही संमेलने साहित्यिक चळवळीची मुहूर्त रोवणारी असतात. साहित्याविषयी जनजागृती वाढविणारे असतात. आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे वाचन संस्कृतीची पाळेमुळे बदललेली दिसत आहेत. फेसबुक, व्हाट्सअप, ट्विटर यासारखी अत्याधुनिक माध्यमे खेडापाड्यातही जाऊन पोहोचली आहेत. या माध्यमांमुळे वाचकांचा स्क्रीन टाईम वाढला आहे. पण त्याचबरोबर व्यक्त होणारे ही कितीतरी पटीने वाढले आहेत; हा सोशल मीडियाचा एक फायदा म्हणता येईल. वाचकांची वाचनाची साधने बदलत गेली असल्याचे चित्र आज समाजात आहे.
सामाजिक कार्यकर्ता लेखक म्हणून समोर येतो, तेव्हा त्यांच्याकडून मन रिझवणारे साहित्य, कथा, कादंबरीची अपेक्षा फोल ठरते. समाजातील जळजळीत सत्य त्यांच्या लेखनातून येत असते. कारण ते त्यांनी तळागाळातील भटकंतीतून प्रत्यक्ष अनुभवलेले असते. स्त्री पुरुष संबंधांवर सीमित अशा विषयांवर आधारित साहित्य लिहिण्यापेक्षा आपल्या आजूबाजूला नानाविध समस्या तसेच सुखद क्षण देणारे विषयही त्यामुळे प्रकाशझोतात येतात. यांचीही दखल या संमेलनामध्ये घेतली जावी ही भूमिका मराठी साहित्य संमेलने भरविताना असावी, असा सर्वसामान्य निकष आहे. आजच्या चंगळवादी व एवढ्या-तेवढ्या कारणांवरून नैराश्याच्या गर्तेत जाणाऱ्या तरुणाईला अशी साहित्य संमेलने संजीवनी ठरतील अशी आशा वाटते. तरुणाईला साहित्याकडे वळविण्यासाठी वास्तवतेचे भान आणणारी साहित्यकृती निर्माण करणे हे आजच्या साहित्यिकांसमोर तितकेच मोठे आव्हान आहे आणि हे आव्हान पेलण्यासाठी युवकांबरोबरच नवोदित लेखकांना प्रोत्साहित करण्यासाठी समाजातील सर्व स्तरावरील लोकांनी या साहित्य संमेलन चळवळीला हातभार लावला पाहिजे. आज काल्पनिक लिहिण्यापेक्षा जे वास्तव आहे ते प्रखरपणे सडेतोड भूमिका घेत मांडणाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे. मूलभूत प्रश्नांना बगल देणाऱ्या आपल्या राजकीय पुढाऱ्यांनाही आपल्या लेखणी द्वारेच त्याची जाणीव करून दिली पाहिजे. प्रतिभावंतांसमोर आज हे मोठे आव्हान आहे. त्यासाठी बॅ. नाथ पै यांनी अशाच एका साहित्य संमेलनात सांगितल्याप्रमाणे साहित्यिकांनी केवळ हस्तीदंती मनोऱ्यात न रहाता त्यातून बाहेर पडलं पाहिजे. स्वप्नाळू दुनियेत न रमता जे सत्य आहे ते प्रखरपणे मांडत राहिले पाहिजे. त्यादृष्टीने समाजमनाचा आरसा म्हणून काम करताना समाजातील संवेदनशीलता कशी वाढीला लागेल यासाठी काम करणे आवश्यक आहे. वर्तमान हा इतिहास जमा होताना तो एकांगी होऊ नये, त्याच्या सर्वसमावेशक असा विचार साहित्यिकांनी आपल्या लेखनातून मांडायला हवा. याची काळजी घेतली पाहिजे, अन्यथा इतिहासाची अनेक पाने अशीच काळाच्या पडद्याआड जातील. हे होऊ नये यासाठी सजगतेने निर्भयपणे आपले मत लिहीताना लेखन कौशल्यातील स्ट्रॅटजीचा वापर करायला हवा. यासारख्या विषयांची चर्चा, परिसंवाद तालुकास्तरीय साहित्य संमेलनातून होणे ही काळाची गरज आहे.
शासनाने महाबळेश्वर जवळील भिलार येथे पुस्तकांचे गाव वसविले आहे. शासन दरबारी ’वाचाल तर वाचाल’ ही उक्ती सार्थ करण्यासाठी हा केलेला छोटासा प्रयत्न. गावातील एकजुटीमुळे हे करणे शासनाला शक्य झाले. वाचन संस्कृती टिकविणे आगामी पिढीला समाजाचा प्रगतशीर आयुष्याचा मूलमंत्र वाचन चळवळीत आहे, याची जाणीव करून देणे यासाठी गाव पातळीवर असे छोटे छोटे प्रयत्न युवकांना दिशा देणारे ठरत असतात. वेंगुर्ला तालुकास्तरीय साहित्य संमेलनाची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रथा आनंदयात्री वाङ्मय मंडळाने सुरू केली आहे. त्यासाठी सातेरी प्रासादिक संघ, वेंगुर्ला, बॅ. खर्डेकर महाविद्यालय, वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस, किरात ट्रस्ट वेंगुर्ला आणि माझा वेंगुर्ला या सहयोगी संस्था एकत्रितपणे कार्यरत आहेत. वाङ्मयीन अभिरुची वृद्धिंगत करणारी वातावरण निर्मिती या संमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. या संमेलनात अभ्यासपूर्ण अशा विविध अभिनव कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. नाणी संग्रहाचे प्रदर्शन, चित्र प्रदर्शन, पुस्तकांचे स्टॉल्स या गोष्टी तसेच वारकरी भजन, लेझीम पथक, एनसीसी-आर्मी विद्यार्थ्यांचे पथक, चित्ररथ, फुलांच्या माळांनी सजलेली ग्रंथाची पालखी, पारंपरिक वेशातील साहित्यप्रेमींची दिंडी सोबत साहित्यविषयक वचने, काव्यपंक्ती यांचे फलक हे सर्व मोठ्या संमेलनाची आठवण करून देणाऱ्या असतील. तालुक्यातील रसिकांचा उत्स्फूर्त व उत्साहपूर्ण सहभाग पहिल्या दोन्ही साहित्य संमेलनाप्रमाणे याही वर्षी असेल यात शंका नाही. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे ग्रामीण साहित्य संमेलनाची उपयुक्तता पुन्हा एकदा अधोरेखीत केली जाईल. तेव्हा येताय ना… – सीमा मराठे, 9689902367