मागोवा 2022

        स्वातंत्र्यपूर्व काळात 1922 मध्ये सुरू झालेला साप्ताहिक किरातने यंदा शतक महोत्सवी वर्ष साजरे केले. शतकापूर्वीचा तो काळ प्रचंड वेगळा होता. समाज जागृती आणि प्रबोधन याला प्रचंड अटकाव असताना स्वीकारलेल्या आव्हानांचा होता. शतकानंतर सिंहावलोकन करताना हा सगळा प्रवास आजही संघर्षमय असला, तरी तेवढाच ऊर्जा देणारा आहे. मुंबईसह जगभरातील चाकरमान्यांना आपल्या गावाशी जोडणारा दुवा हे साप्ताहिक किरातचे खास वैशिष्ट्य राहिले आहे.

      अनिष्ठ गोष्टींवर अचुक शरसंधान असलेल्या 100 वर्षात ‘किरात’ने नेहमी स्थानिक बातम्यांना प्राधान्य, विकासात्मक लेख, येथील समस्या- प्रश्‍न तसेच प्रसंगानुरुप राष्ट्रीय विषयावरही प्रबोधनात्मक मांडणी केली आहे.

      गेल्या 100 वर्षांचा हा वसा सभासद, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या सहकार्याने आणि किरातच्या “गुड विल“ वर उभा आहे. काही सोयीसुविधा उपलब्ध नसताना त्या काळात अखडं तेवत राहिलेला हा डोलारा यापुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने लिहित्या हातांनी आणि जाहिरातदार, देणगीदार यांच्या समन्वयाने अविरत सुरू ठेवण्याचा प्रयत्न आहे.

   त्याचाच एक भाग म्हणून यावर्षी किरातचे कामकाज जिथून चालते त्या वास्तुचे नूतनीकरण किरातवर निस्सीम प्रेम करणाऱ्या हितचिंतकांमुळेच शक्य झाले. आमच्यासाठी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी अशा हितचिंतकांकडून मिळणाऱ्या पाठबळामुळे आश्‍वासित करत असतात.

      2022 या वर्षात साप्ताहिक किरातचे शताब्दी विशेष अंक आणि दिवाळी अंकासह 49 अंक प्रकाशित झाले. वेंगुर्ल्यातील लोकजीवन, रोजच्या जीवनात भेटणारी माणसे आणि त्यातून नकळत निर्माण झालेले गहिवर नाते ‘आठवणींच्या हिंदोळ्यातून‘ वाचकांच्या भेटीला आले. अनेकांच्या जीवनात काही माणसे पडद्यामागचे दृश्‍य होत असतात. ते फारसे प्रकाश झोतात नसले तरी त्यांच्या  अस्तित्वाचा फार मोठा परिणाम आयुष्यावर होत असतो. त्यांच्या या आठवणी ‘शब्द सुमनांजली‘ या सदरातून व्यक्त झाल्या आहेत. बदलत्या जीवनशैलीत लहान कुटुंबात मुलांना वाढविताना ‘जडणघडण’ या सदरातून अनुभव मांडणी असल्याने वाचकांना हे लेख आपलेच वाटतात. यावर्षी विशेष मुलांसाठी पुण्यातील प्रिझम फाउंडेशन ही संस्था काम करते. या संस्थेमधील बेन्यू प्रशिक्षण विभागाच्या मुख्याध्यापक विद्या भागवत यांनी लिहिलेल्या विशेष मुलांच्या जिद्दीच्या कहाण्या ‘तुज पंख दिले देवाने‘ या सदरातून वाचकांच्या भेटीला आणल्या. ‘मनाचीये गुंती’ या सदरातून मानसिक आजाराला तोंड देताना नेमकी कोणती काळजी घ्यायला हवी याचे सुंदर लिखाण मीनाक्षी यांनी केले. ‘लोकल टु ग्लोबल‘ अशी ‘किरात‘ मधील लेखांची मांडणी वाचकांना अंतर्मुख करत असल्याच्या प्रतिक्रिया लेखक आणि आमच्यापर्यंत पोहोचविल्या. शिवाय वाचकांची मते, प्रतिक्रियांनाही किरातमध्ये स्थान दिले जाते. समाजातील बदलत्या घडामोडींचा लेखाजोगा ‘प्रासंगिक‘ लिखाणामधून वाचकांना विस्तृतरित्या वाचायला मिळावे यासाठी ‘किरात‘ कायमच प्रयत्नशील असतो आणि यापुढेही राहील. ‘पत्रकार दिन‘, ‘महिला दिन‘, ‘गणपती विशेष‘, ‘दिवाळी अकं‘, ‘जत्रा विशेष’ या अंकांमधून   नवोदित हातांना प्राधान्य देताना त्यांच्या लिखाणातून अनके नाविन्यपूर्ण, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, कला या विषयावरील लेख किरात अंकातून घेता आले.

      ‘किरात‘ ने सामाजिक भान राखताना जनजागृतीसाठी अनेक विषय हाताळले. स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय लोकशाही व्यवस्थेची स्थिती आणि गती समजून घ्यावी या उद्देशाने किरात ट्रस्टने आयोजित केलेल्या “मतदार म्हणून लोकप्रतिनिधींकडून माझ्या अपेक्षा“ या खुल्या राज्यस्तरीय निबंध स्पर्धेला यावर्षी भरघोस प्रतिसाद मिळाला. भारतीय लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट होण्याच्या दृष्टीने आणि मतदारांमध्ये त्यांच्या अधिकार हक्कांविषयी जाणिव जागृती होणे यासाठी अशा प्रकारच्या चर्चा वारंवार होत राहणे अत्यावश्‍यकच आहे. साप्ताहिक किरातला या प्रक्रियेत सहभागी होता आले याचा आनंद अधिक आहे. www.kiratonline.in या वेबसाईटमुळे लॉकडाऊन काळात ‘किरात‘ वाचकांपर्यंत स्थानिक वर्तमान पोहचविण्यासाठी बराच उपयोग झाला. तसेच व्हॉटस्‌ॲपच्या माध्यमातूनही ‘किरातचा पीडीएफ‘ अंक आज सर्वदूर पोहचत आहे. किरातच्या ‘यू ट्यूब’ च्या माध्यमातून शताब्दी कार्यक्रम तसेच आठवड्यातून प्रकाशित होणाऱ्या साप्ताहिक मधील बातम्यांचा संक्षिप्त आढावा, मन संवाद- गुज अंतरीचे या मालिकेतून अनेकांच्या मुलाखती मधून प्रिंट मीडिया सोबत काळाशी जुळवून घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न किरात करत आहे.

      किरात शताब्दी अंकांमधून सिंधुदुर्गातील पर्यटन कृषी, चित्रपट, नाट्य, साहित्य, आरोग्य, ग्रामीण जीवन, क्रीडा चळवळ, पर्यटन संवर्धन या विषयांवर भविष्यकालीन वेध घेणारे लेख तसेच वेंगुर्ला तसेच किरात परिवाराशी संलग्न असलेल्या आठवणी जागवणाऱ्या लेखांचा समावेश केला आहे.

      14 मे रोजी झालेला किरात स्नेहमेळावा वाचक हितचिंतकांकडून मिळालेल्या उस्फूर्त प्रतिसादामुळे यादगार झाला. शंभर वर्षांचा हा प्रवास अनुभवणाऱ्या बुजुर्ग व्यक्तींनी ही या स्नेह मेळाव्याला आवर्जून उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे स्वरूप व भव्यता सांभाळताना उपस्थित किरात परिवाराशी आम्ही केवळ शब्द सुमनाने स्वागत करू शकलो; वैयक्तिक भेटीगाठी अथवा समक्ष भेटून दखल घेता आली नाही. वृत्त निवेदक शिबानी जोशी यांनी आपल्या ओघवत्या शैलीत कार्यक्रमात आपुलकीचे नाते निर्माण केले. नीरजा माडकर, केतकी आपटे या उदयोन्मुख नृत्यांगनांनी आपल्या नृत्याविष्काराने कार्यक्रमाचा एक माहौल तयार केला. गणपत म्हसगे व त्यांच्या सहकार्यांनी कळसुत्री बाहुल्यांच्या माध्यमातून तर भाव अंतरीचे हळवे फेम मयूर गवळी आणि दशावतारातील पहिली महिला पखवाज वादक भाविका खानोलकर यांच्या साथीने रामेश्‍वर दशावतार नाट्य मंडळाचा चिंतामणी नाट्य प्रयोग उत्तरोत्तर रंगत गेला. अनंत वासुदेव मराठे यांनी स्थापन केलेल्या केशव मराठे व श्रीधर मराठे यांनी संवर्धन व विस्तार केलेल्या या वटवृक्षाच्या छायेत ती आपुलकीची माया या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला अनुभवता आली. ख्यातनाम गीतकार, कवी, व्यंगचित्रकार असे अष्टपैलू कलाकार गुरु ठाकूर यांची मुलाखत आणि प्रतीक गायकवाड यांचे ‘आवाज चांदण्यांचे’ ही संगीत मैफिल या भरगच्च कार्यक्रमांनी किरात स्नेहमेळावा संस्मरणीय ठरला.

      किरात दिवाळी अकं 2022 या अंकात सलग तिसऱ्या वर्षी पुणे येथील ज्येष्ठ साहित्यिक अरुण सावळेकर यांनी आयोजित केलेल्या खुल्या कथा लेखन स्पर्धेमुळे अनेक लिहित्या हातांना चालना मिळाली. या अंकासाठी दरवर्षीप्रमाणे लेखक, कवी, जाहिरातदार, वाचकांच्या सहकार्याने दर्जेदार साहित्यिक परंपरा अखंडित ठेवण्यास आम्हाला मदत झाली.

      नविन वर्षात ‘किरात‘नव्या संकल्पनांसोबत जुन्या-नव्या सदरांसह आपल्या भेटीला येईल. वाढत्या महागाईचा फटका प्रिटींग व्यवसायालाही बसत आहे. तरी शताब्दी वर्ष 2022 पासून साप्ताहिक ‘किरात‘ ची वार्षिक वर्गणी दिवाळी अंकासहीत रुपये 350 एवढी करण्यात आली. मात्र, ज्या सभासदांची 2021 पर्यंत वर्गणी येणे बाकी आहे त्यांनी 300 रुपयांप्रमाणे वर्गणी जमा करावी. तसेच साधारण 7 ते 8 वर्षांची वर्गणी न भरलेल्या वर्गणीदारांना स्मरणपत्रे पाठविली आहेत. त्यातील काहींनी वर्गणी भरली आहे. परंतु, पत्रास कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अशा वर्गणीदारांचे अंक आम्ही नाईलाजाने बंद करीत आहोत. तरी सभासदांनी मागील वर्गणी बँकेत भरून किंवा मनिऑर्डर करून सहकार्य करावे. अनेक सभासदांचे संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी संपर्क साधता येत नाही. त्यासाठी सर्वांनीच आपले संपर्क क्रमांक ‘किरात‘ कार्यालय 02366-299517 अथवा 9689902367 या वॉटस्‌अप नंबरवर कळवावेत. जेणेकरुन ‘किरात‘ मार्फत होणाऱ्या उपक्रमांची माहिती वेळोवेळी प्रिंट, यू ट्यूब सोबत फोन माध्यमातूनही मिळू शकेल. शतकोत्तर सेवा देताना ‘किरात‘ ला सहकार्य करणाऱ्या ज्ञात-अज्ञात सर्वांचे मनःपूर्वक आभार! ‘किरात‘ परिवारातर्फे नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!

Leave a Reply

Close Menu