लोकशाहीचा चौथा स्तंभ

वृत्तपत्रांचा आपल्या स्वातंत्र्य लढ्यात सिंहाचा वाटा आहे. त्याकाळी जनमत बदलायचे व त्याचे चळवळीत रुपांतर करावयाचे काम वृत्तपत्रांनी चोख बजावले. कारण, तेव्हा विश्वासार्हता हे त्यांचे सगळ्यात मोठे भांडवल होते. खरे, खोटे करतांना पूर्वी ठामपणे सांगितले जायचे की, हे वृत्तपत्रात छापून आले आहे म्हणजे सत्यच असणार. ह्याच बरोबर समाज प्रबोधन हा सुद्धा वृत्तपत्रांचा प्रमुख उद्देश होता. पण आता मात्र उदयोन्मुख पत्रकार मित्र श्रेयस शिंदे याला कोण्या एका भविष्य सांगणा­या व्यक्तीने सांगितले, ‘तुझं पेन कुणाला देऊ नकोस‘, याचा अर्थ कदाचित आपले विचार कुणाच्या अधिपत्याखाली आणून दडपवू नकोस, असाच असेल. मन मोकळं करणं, कुणाचा गुलाम न होता खरं लिहिणं, हीच आजची खरी गरज आहे. केवळ पत्रकार दिनापुरता मर्यादित न राहता हा विषय कायमचा रुजला पाहिजे, तरच बदल घडेल. लोकशाहीच्या चार स्तंभापैकी वृत्तपत्रहा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो.

     वृत्तपत्र सृष्टीची वाटचाल आणि निर्माण झालेले प्रश्न याबाबत कालानुरुप चिंतन व्हायला हवे. कारण गेल्या काही वर्षापासून या चौथ्या स्तंभासमोरच अनेक आव्हाने उभी आहेत. मध्यंतरी न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी आपले गा­हाणे पत्रकार परिषद घेऊन मांडले होते. कोरोना महामारीचा काळ पाहिला तर वृत्तपत्रांची स्थिती काय झाली हे समजून येते. या काळात मोठ्या वृत्तपत्रांच्या आवृत्त्या बंद झाल्या. आजही चौथ्या स्तंभाला अस्तित्वाची लढाई करावी लागत आहे. या काळात अनेक पत्रकारांच्या नोक­याही गेल्या. दरवर्षी मोठ्या प्रमाणात निघणारे दिवाळी अंक निघू शकले नाहीत. जे निघाले त्यांना मोठी कसरत करावी लागली. छोट्या वृत्तपत्रांसाठी किंवा नियतकालिकांसाठी तर कोरोना नंतरची ही वर्ष आव्हानाची जात आहेत. शासनाची धोरणे हा तर वेगळ्या चर्चेचा मुद्दा आहे. उद्योगधंदे बंद पडल्याने जाहिरातींवर मर्यादा आल्या. जाहिरात हाच छोट्या-मोठ्या वृत्तपत्रांचा आधार आहे. परंतु उद्योजकांनाच अस्तित्वाची लढाई करावी लागत असल्याने समाजाचे प्रश्न मांडणा­या वृत्तपत्रांनासुद्धा हा काळ कठीण गेला. आजही आव्हाने संपलेली नाहीत. उलट वाढत आहेत. आज सोशल मिडियामुळे प्रत्येकाला व्यक्त होण्याची संधी मिळू लागली. जणू प्रत्येकजण स्वतःच वार्ताहर, पत्रकार झाला आहे. व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर अशा अनेक माध्यमातून तरुण वर्ग आपली मते मांडू लागला आहे. लाईव्ह न्यूज, ब्रेकींग न्यूज यामुळे वर्तमानपत्रावर गंडांतर येईल की काय? असा प्रश्न जगभरातील विश्लेषकांना भेडसावतो आहे. तरीही वाचक, हितचितकांच्या पाठबळावर आणि एक व्रत म्हणून स्वीकारलेली वृत्तपत्रे, नियतकालिके या सर्वांना पुरून उरली आहेत. देशाच्या-राज्याच्या विकासाचे मुद्दे, विविध क्षेत्रातील प्रश्न, आव्हाने, शासन-प्रशासनाची भूमिका अशा प्रश्नांची मालिका असली तरी प्रत्येक प्रश्न संवेदनक्षम होत असल्याने मुक्तपणे लिखाण करण्यावर मर्यादा पडत आहेत. शासन-प्रशासनावर अंकुश ठेवण्याचे काम वृत्तपत्रांचे आहे. खरेतर पत्रकारिता हा विषय सर्वसामान्यांशी निगडीत असल्याने आपल्या न्याय्य हक्काचे व्यासपीठ म्हणून आजही कित्येकजण वृत्तपत्रांकडे अपेक्षेने पहातात. कारण वर्तमानपत्रात प्रसिद्ध होते ते सत्य असते असे मानणारा आजही एक वर्ग समाजात आहे. लोकशाहीसाठी वृत्तपत्रांचा अंकुश हवाच. लोकशाहीचा चौथा खांब ताठ मानेने उभा राहायला हवा ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

 

 

Leave a Reply

Close Menu