दृष्टीकोन महिला दिनाचा

            आज स्त्रीयांनी सर्व क्षेत्र व्यापली आहेत. स्त्री तिच्या जीवनात अनेक जबाबदा­या पार पाडत आहे. विविध नात्यांमध्ये वावरताना तिने स्वतःला नेमकं काय हवं आहे याचा मात्र विचार करायला हवा. चाकोरीबाहेरचे काम करताना तिची वाट सोपी होण्यासाठी समविचारी स्त्री-पुरूषांनी मिळून प्रयत्न करायला हवेत. स्वयंसहाय्यता बचत गटाच्या माध्यमातून एकत्र येणा­या महिला आज सर्व प्रकारच्या कार्यक्रमासाठी हक्काच्या प्रेक्षक बनल्या आहेत. बचतगट चळवळ ही नक्कीच स्त्रीच्या कर्तृत्वाला प्रेरणा देणारे बलस्थान आहे. पण हे सर्व घडताना आपल्या समुह शक्तीचा कुणी वापर करुन घेत नाही ना! हे सजगपणे तपासलं पाहिजे.

      कुटुंबात स्त्री पुरुष समानतेच मूल्य जाणीवपूर्वक कृतीतून राबवायला हवं. सामान्यतः आपण कुटुंबात बघितलं तर, आईने घेतलेला एखादा निर्णय बाबा सहज काय मूर्खपणा हाम्हणून केरात काढतात. पण बाबांचा प्रत्येक निर्णय आईसाठी शिरसवांद्यच असतो. थोडक्यात कुटुंबात हे मुल पाहत असतात. शिकलेल्या आईला देखील या घरच्या निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेणारी कुटुंब खूप कमी असतात. हल्ली दोघेही नोकरी करणारे असले तरी स्वयंपाकपाणी, मुलांची आजारपणे, ज्येष्ठांची काळजी ही कामे आईच उचलताना दिसते. जेव्हा एखाद्या आजारपणाने जिला शक्य होत नाही, तर बाई लावून टाकअसं सहज सांगितलं जातं. यातूनही आई जी कामे करते ती कामे कुणीही बाईने करण्याची आहेत हे गृहीत धरलेलं असत. कुठल्याही सार्वजनिक कौटुंबिक कार्यक्रमाची आखणी करताना बायका, मुलांना साध्या, सोप्या जबाबदा­या टाकून त्या कर्तृत्वहीन असतात, बालबुध्दीच्या असतात. हेच अधोरेखित केलं जातं.

      पुरुषी काम आणि बायकी कामं अशी विभागणी बघतच मोठ्या होणा­या मुलांच्या मनात मग हा दुजाभाव रूजत जातो. मुलगा म्हणून त्याचे लहानसहान हट्ट पुरवताना त्याला नकार पचवण्याची सवय लागतच नाही, मी म्हणेन ते झालं पाहिजे हा अहंकार सर्वांच्याच नकळत वाढला आणि जोपासला जातो. समाजावर ज्याचा प्रचंड पगडा आहे त्या चित्रपटांतूनही पुरूष माणजे सामर्थ्य, बल आणि स्त्री म्हणजे नाजुकता आणि सौंदर्य हेच तिचं विश्व. आता  आपल्याला हव्या असलेल्या मुलीने होकार देण्यासाठी हिरोने टवाळखोरी करणे नाचणे, या बेसिक गोष्टीपासून ओढणी खेचण्यापर्यंत काहीही करताना दाखवलं जात आणि तेही बरोबर असल्याच्या थाटात कुठेतरी रुजत असतं. त्यामुळे चित्रपट हा मनोरंजनाचा बाजार आहे आणि त्यातल्या गोष्टी निव्वळ काल्पनिक असतात. ब­याचदा चुकीच्याही असतात. हे पालकांनी त्याच वेळी गप्पा मारताना मुलांपर्यंत पोहचवल पाहिजे. एखाद्या मुलाने केलेली टवाळी किवा अपमान ही सहन करण्या आधी किवा तुला लज्जास्पद वाटण्याची गोष्ट नाही हे मुलींच्या मनावर बिबवण तितकंच महत्त्वाच आहे.

      घराघरातून दुजाभाव करणारी श्रमविभागणी बदलणे, केरवारे, पाणी भरणे, भांडी घासणे, स्वयंपाकात मदत या गोष्टीत मूली इतकीच मुलांची मदत घेणे हे एक महत्त्वाचं पाऊल ठरू शकेल मुला-मुलींना आपल्या सहज स्वभावानुसार वागू देणे. सर्वात महत्त्वाचे एखाद्या हळव्या मुलाला रडताना बायकीम्हणून हिणवणे किवा मोठ्याने हसणा­या, बोलणा­या मुलीला पुरूषीहे लेबल लावणे बंद केले पाहिजे. मी बाईमाणूस काय करणार?‘ अशी वाक्ये बायकांनी आणि बायकांना अक्कल कमीचही वाक्य पुरूषांनी बंद केली पाहिजेत. प्रत्येकाला असे अनेक उपाय दिसत असतील, अगदी साधे वाटणारे पण दीर्घकाळ परिणाम करणारे हे उपाय आपण सहज अंमलात आणू शकतो.

      महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देणा­या सावित्रीबाई फुले, महिलांच्या बाबतीतील अनिष्ट प्रथांविरोधात कृती करणारे राजा राममोहन रॉय, गोपाळ गणेश आगरकर, धोंडो केशव कर्वे या सर्वांनीच तत्कालिन समाजाचा प्रचंड विरोध पत्करला. त्यामुळेच आज काही सकारात्मक बदल दिसत आहेत. एकूणच समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी बदलत्या आव्हानांना स्त्री-पुरुष सर्वांनीच सक्षमपणे तोंड द्यायला हवे आहे. तरच एका सजग समाज म्हणून आपल्या देशाची ओळख राहिल.

Leave a Reply

Close Menu