‘वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती’ या सदरातील पहिला लेख वाचकांच्या पसंतीस उतरल्यावर अस्मादिकांनी पुढील लेखाच्या कामास सुरुवात केली. वेंगुर्ल्याच्या खाद्यसंस्कृतीसाठी प्रामुख्याने ओळख असलेल्या हॉटेल्समध्ये अग्रणी असलेल्या ’तृप्ती हॉटेल’वर या सदरातील दुसरा लेख लिहीण्याचे निश्चित केले आणि मित्राच्या सहाय्याने निश्चित केलेल्या भेटीच्या वेळी हॉटेलात हजर झालो. नूतनीकरण झालेल्या वेंगुर्ला मार्केटमध्ये पूर्वीच्याच लोकेशनवर हे हॉटेल आपल्या जून्या ओळखीसह चालू आहे.
लहाणपणी वेंगुर्ल्याच्या मच्छी मार्केटमध्ये गेल्यावर त्या चिंचोळ्या गल्लीच्या सुरुवातीलाच नजर पडायची ती तृप्ती हॉटेलवर. हो… लहाणपणी अस्मादिकांना आठाणा-बाराणा-एक रुपया असे पैसे देऊन बाजारात कधीकधी मच्छी मार्केटमध्ये मासे आणायला पाठवले जायचे. मीही आवडीने मासे आणायला जायचो. घरापासून मासे मार्केट अगदी चालत पाच मिनीटांच्या अंतरावर. मच्छी मार्केटमध्ये शिरताना तृप्ती हॉटेलमधील गर्दी आणि तेथील कर्मचाऱ्यांची लगबग लक्ष वेधून घ्यायची. विशेषत: तेथील लाल रंगाचा हलवा. कनवटीला घरुन दिलेल्या मासे खरेदीसाठी लागणाऱ्या पैशांपेक्षा एखादी दमडीसुध्दा जास्त नसायची. (इथे मी ‘दमडी’ हा शब्द प्रयोग जरी केला असला तरी अस्मादिकांच्या बालपणी दमडी हद्दपार झाली होती.) परंतु मे महिन्यात आंब्याचा बाटा विकून अथवा रामेश्वराच्या सप्ताहाला बेल-अगरबत्ती विकून स्वकमाईने मिळविलेल्या पैशात अस्मादिकांनी एक-दोन वेळा तृप्ती मधल्या हलव्याची चव चाखली होती. नंतर नोकरीला लागल्यावर अनेक शहरात भ्रमण करताना नावजलेल्या हलवायांकडे हलवा खाल्ला, पण तृप्तीमध्ये खाल्लेल्या हलव्याची सर काही त्याला आली नाही. त्या हलव्यातला साधेपणा अगदी आजही टिकून आहे.
हॉटेल मालकांच्या तिसऱ्या पिढीकडे सध्या या हॉटलेची धुरा आली असून चौथी पिढी या व्यवसायात हळूहळू लक्ष घालत आहे. 21 जुलै 1969 रोजी म्हणजेच साधारणत: 53 वर्षापूर्वी लक्ष्मण दिपनाईक यांनी मोठ्या जिद्दीने या हॉटेलची मुहूर्तमेढ रोवली होती. दुसऱ्या पिढीच्या सदांनद आणि प्रकाश दिपनाईक यांनी हे हॉटेल अजून प्रगतीपथावर नेले आणि आज तिसरी पिढी संदिप आणि लक्ष्मण या हॉटेलचा नावलौकीक राखून आहेत. हॉटेल सुरु झाले तेव्हा शेवचिवडा, चिरोटी, पेढे, ऊसळ-पाव, बटाटा वडा, कांदा भजी, चिकन-पाव आणि मटन-पाव हे पदार्थ या हॉटेलमध्ये मिळायचे.
हो.. हो.. बरोबर वाचताय तुम्ही, न माझ्याकडून लिहीण्यात काही चूक झाली ना तुमच्या वाचनात. हॉटेल सुरु झाल्यापासून तब्बल वीस वर्षे या हॉटेलात नाष्ट्याला चिकन तसेच मटन-पाव मिळायचा. तोही केवळ वीस पैशात. जुन्या पिढीतील चाकरमानी तृप्ती हॉटेलची आठवण काढताना तिथे खाल्लेल्या चिकन-पाव आणि मटन-पावाच्या आठवणीत रमतात. नंतर काही कारणाने चिकन-पाव आणि मटन-पाव ही डीश बंद झाली. आता या हॉटेलात चिरोटी ही डीश सुध्दा बंद झाली आहे. मात्र सुरुवातीपासून सुरु केलेल्या बाकीच्या सर्व डिश अजूनही मिळतात.
पूर्वीच्या हॉटेलच्या बोर्डवर खमंग शेवचिवड्याचा उल्लेख असायचा. शेवचिवडा ही या हॉटेलची ओळख म्हणा ना. तृप्ती हॉटेलचा शेवचिवडा अगदी थेट ‘मातोश्री’ पर्यंत पोहचायचा. एक व्यक्ती गावी आली की हमखास बाळासाहेब ठाकरे यांचेसाठी शेवचिवडा खरेदी करून न्यायची. मुंबईला एका चित्रकाराच्या माध्यमातून मग तो मातोश्रीवर पोहचायचा. बाळासाहेब असेपर्यंत ही परंपरा चालू होती. आपल्या हॉटेलचा चिवडा बाळासाहेबांना आवडायचा हे सांगताना हॉटेलचे मालक आणि कामगार यांचा ऊर अगदी अभिमानाने भरून आला होता. परदेशात आणि मुंबई-पुणे सारख्या शहरात काम-धंद्यासाठी स्थायिक झालेले मूळचे उभादांडा, दाभोली तसेच वेंगुर्ले शहरातील चाकरमानी परतताना वेंगुर्ल्याची आठवण म्हणून पाच-पाच किलो शेवचिवडा या हॉटेल मधून घेऊन जातात.
‘सावंतवाडी, कुडाळसून बंदरार माशे गरवक येणारे चार-चार पाच-पाच हलव्याचे (मासेमारीचा उल्लेख आल्याने इथे हलवा म्हणजे सरंगा असा अर्थ घेण्याची चूक करु नये) तुकडे पार्सल घेवन जातत…’ उघडाबंब, गळ्यात माळ आणि कपाळाला टिळा लावलेला हॉटलेचा कामगार गोपी धर्णे अगदी रंगात येऊन सांगत होता. त्याच्या सोबतचे पण आता हयात नसलेले कामगार बाबाजी कुर्ले, गजानन चोडणकर यांची आठवण काढताना मात्र नकळत त्यांचे डोळे पाणवतात. लॉकडाऊनच्या काळात हॉटेल व्यवसायाला बसलेला फटका, बाजारपेठ नुतनीकरण केल्यावर नवी जागा देताना आकारलेली भरमसाठ किंमत इत्यादी व्यथा ते मांडत होते. मध्यंतरी बाजारपेठेचे नुतनीकरण करताना जमिनदोस्त करण्यात आलेल्या दुकानामध्ये या हॉटेलचा सुध्दा समावेश होता. या काळात सुमारे तीन वर्षे हे हॉटेल सांगळे गल्लीत सुरु होते. मुख्य रस्त्यापासून जरा आडवाटेला असले तरी नेहमीची गिऱ्हाईके काही सुटली नव्हती.
वेंगुर्ले बाजारपेठेत विक्रीसाठी आलेले मच्छी विक्रेते, भाजी विक्रेते, व्यापारी तसेच बाजारहाटीसाठी आलेले खरेदीदार हे या हॉटेलचे नेहमीचे ग्राहक. सणासुदीला बाजार भरतो तेव्हा पहाटे पाच वाजल्यापासूनच हॉटेलात गर्दीला सुरुवात होते. सुकी बटाटा भाजी-पुरी, ऊसळपाव, वडापाव, कांदा भजी, बटाटा भजी, शिरा, शेवचिवडा, बुंदी लाडू, बेसन लाडू आणि हलवा हे पदार्थ आजही येथे मिळतात. त्यांच्या चवीमध्ये दर्जामध्ये कोणतीही तडतोड होत नसल्याने वेंगुर्लेकरांमध्ये हे हॉटेल आजही लोकप्रिय आहे.
नावाप्रमाणेच तृप्त करणारे ‘हॉटेल तृप्ती’ हे वेंगुर्ल्याच्या खाद्यभ्रमंतीत मानाचे स्थान टिकवून आहे.
(सदर लेख कोणत्याही हॉटेल व्यवसायाची जाहीरात करत नसून वेंगुर्ल्याची खाद्यभ्रमंती करुन खवय्ये आणि वेंगुर्ल्यात मिळणारे खाद्यपदार्थ व ती मिळणारी हॉटेल्स, भोजनालये इ. यांच्यात दुवा साधण्यासाठी हा आमचा प्रपंच आहे. खाली दिलेला लेखकांचा संपर्क क्रमांक हा केवळ या लेखावर आपल्याला व्यक्त व्हायचे असेल तर त्यासाठी माध्यम म्हणून उपलब्ध करून दिलेला आहे.)
– संजय गोविंद घोगळे, 8655178247