ही आवडते मज मनापासूनी शाळा

        तोत्तोचान ही एक साधारण आठ वर्षांची, चंचल, शिक्षकांच्या दृष्टीने अतिशय खोडकर आणि वाया गेलेली पण निरागस असणारी चिमुरडी असते. एका शाळेतून काढून टाकल्यावर तिची आई खूप शोध घेऊन शिक्षणाची तळमळ असणाऱ्या आणि शिक्षणात मुलांच्या भावविश्‍वाशी जवळीक साधणारे प्रयोग करणाऱ्या श्री. कोबायाशी यांच्या शाळेत तोत्तोचानला घेऊन येते. इथे तरी तिला प्रवेश मिळेल की नाही याची तिला धास्ती असते. आणि शाळेत प्रवेश केल्यावर शाळेची इमारत म्हणजे रेल्वेचे जुने डबे आहेत हे तोत्तोचान बघते आणि ती शाळेच्या प्रेमातच पडते. तिथून पुढचा तिचा प्रवास हा प्रत्यक्ष वाचण्यासारखाच आहे. स्वतः तोत्तोचान म्हणजेच तेत्सुको कुरोयानगी या लेखिकेने आपल्या बालपणीच्या तोमोई शाळेच्या आठवणी सांगितल्या आहेत. यातील मला सर्वात आवडलेली गोष्ट म्हणजे शाळेचे वर्ग म्हणून वापरलेली रेल्वेच्या डब्याची कल्पना!

      मला वाटते प्रत्येक वास्तूला स्वतःचा असा एक चेहरा-स्वभाव असतो. म्हणजे पु. ल. देशपांडे यांनी आपल्या एका पुस्तकात ‘ते चौकोनी कुटुंब’ म्हणून एका कुटुंबाची कहाणी लिहिली आहे. विशिष्ट चौकटीत राहणारे ते कुटुंब! तसेच काहीसे वास्तूच्या बाबतीत आहे असे मला वाटते. एखाद्या वास्तूकडे बघितल्यावर प्रसन्न वाटते, तर एखादी वास्तू आपल्याला अजिबात आवडत नाही. त्याला अनेक कारणे असतील. उदा. तिची रचना, आजूबाजूचा परिसर, स्वच्छता आणि त्यात राहणारी किंवा वावरणारी माणसे असे काहीही घटक असू शकतात. पण ती एखाद्या शाळेची इमारत असेल तर? जिथे आमच्या देशाची भावी पिढी घडणार आहे त्या इमारतीचा विचारही शैक्षणिक पर्यावरणाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने करणे महत्वाचे आहे. तोत्तोचानला रेल्वेचा डबा आवडला तर काही दिवसांपूर्वी आमच्या सिंधुदुर्गातील एका कल्पक शिक्षकाने शाळेच्या इमारतीला लाल परी म्हणजे एस. टी. च्या आकारात रंगवले आहे. शाळेतील मुले तर या बसमध्ये बसायला अतिशय उत्सुक असतात.

      मुलांच्या या सर्व भावविश्‍वाचा विचार करून जेव्हा शाळेच्या इमारती बोलक्या केल्या जातील तेव्हा त्यातून घडणारा विद्यार्थी हा उत्तम शैक्षणिक पर्यावरणाचा घटक आहे असे म्हणता येईल. वास्तविक उत्तम पर्यावरण म्हणजे तरी काय? तर ढोबळमानाने शुद्ध हवा, शुद्ध पाणी, भरपूर सूर्यप्रकाश, भरपूर झाडी आणि स्वच्छता असे म्हणता येईल. तसाच विचार शैक्षणिक पर्यावरणाच्या बाबतीत करायचा झाला तर शाळेमध्ये ज्या सोयीसुविधा असतात त्यांना शैक्षणिक पर्यावरणाच्या मुलभूत सुविधा म्हणता येईल. त्याचा परिणाम निश्‍चितच मुलांच्या व्यक्तिमत्वावर होत असतो. व्यक्तिमत्व म्हणजे माणसाचे दिसणे, त्याची वेशभूषा आणि वर्तन याच्या साहाय्याने दुसऱ्यावर प्रभाव पाडणे. त्यापैकी दिसणे आणि वेशभूषा या बाह्य घटकांनी आधी प्रभाव पडतो. शाळेच्या बाबतीत हेच घटक म्हणजे शाळेची इमारत, त्यातील पायाभूत सुविधा, परिसर आणि स्वच्छता जे शाळेचे व्यक्तिमत्त्व ठरवतात.

      विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये बौद्धिक, शारीरिक, सांस्कृतिक, मानसिक, भावनिक व विविध कौशल्यांचा विकास अपेक्षित आहे. आणि या सर्व विकासात शालेय परिसर महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्यामुळे शाळेत प्रवेश केल्यावर मुलाला प्रसन्न वाटले पाहिजे. शाळेचे प्रवेशद्वार आकर्षक, सभोवती भरपूर सावली असणारी झाडे असणारा आणि त्याबरोबरच मुलांची सुरक्षा योग्य पद्धतीने केली जाईल याची व्यवस्था असणारा परिसर असणे आवश्‍यक आहे. मुलांना विविध प्रकारचे मैदानी खेळ खेळता येतील अशी प्रशस्त क्रीडांगणे आणि साधने असावीत. मधल्या सुट्टीत वर्गाबाहेर फिरण्यासाठी व बसण्यासाठी मोकळी जागा असावी. या जागांचा वापरही मुलांच्या प्रगतीसाठी कौशल्याने करता येतो. उदा. काही आकडे, कोडी यांचा वापर करून रचना करणे. अक्षरांच्या शब्दपट्ट्या, काही शब्द, अंक यांच्या रचना करणे जेणेकरून ती सातत्याने मुलांच्या दृष्टीस पडतील. यामध्ये वयोगट बघून रचना कराव्या लागतील. माती-वाळूचे ढीग, पाण्याचा छोटासा तलाव याच्या माध्यमातून त्यांचा थेट पंचमहाभूतांशी परिचय होईल. विविध प्रकारची, आकाराची आणि रंगांची फुलझाडे आजूबाजूला असावीत. आणि मुख्य म्हणजे त्याची निगराणीही मुलांकडूनच करून घेतली तर मुलांचा कौशल्यविकास होईलच पण त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचे बीजही रोवले जाईल.

      शाळेच्या भिंतीही बोलक्या करता येतील. आकर्षक रंगात त्या रंगवून मुलांच्या मदतीनेच त्यावर वेगवेगळ्या प्रकारची चित्रे, कविता, गोष्टी, गणितातील काही गमतीजमती, कोडी याने सजवता येऊ शकतात. एखादी भिंत अशीही ठेवता येईल जिथे केवळ मुलांना हवे तसे आणि हवे तेव्हा लिहिता किंवा चित्र काढता येईल. विशेषतः बालगटातील मुलांना आपल्या शिक्षकांप्रमाणे फळ्यावर लिहिण्याची हौस असते. त्यांची ही उर्मी अशा भिंती ठेवल्यास भागू शकते.

      वर्गखोल्या हाही एक शैक्षणिक पर्यावरणाचा महत्वाचा घटक आहे. मुले जवळपास चार ते पाच तास त्या खोलीत बसणार असतात. त्यामुळे शुद्ध हवा, उत्तम सूर्यप्रकाश आणि मोठ्या खिडक्या खोलीला असाव्यात. याशिवाय शिक्षकांचे महत्त्वाचे साधन म्हणजे फळा! त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला तो व्यवस्थित दिसेल अशा ठिकाणी असावा. वर्गखोली पण मुलांचा वयोगट लक्षात घेऊन आकर्षक पद्धतीने रंगवलेली व सजवलेली असावी.

      प्रयोगशाळा, संग्रहालय, सभागृह, स्वयंपाकगृह, संगणककक्ष यासारख्या अनेक घटकांचा विचारही मुलांच्या विकासाच्या दृष्टीने केला गेला पाहिजे. ग्रंथालये तर समृद्ध असणे गरजेचेच आहे. मुलांना जबरदस्तीने वाचन करायला लावण्याऐवजी नकळतपणे त्या सवयी त्यांच्यामध्ये कशा रुजवता येतील या दृष्टीने विचार होणे गरजेचे आहे. त्यासाठी सतत पुस्तके त्यांना समोर दिसत राहणे, त्याविषयी थोडक्यात माहिती लिहून समोर ठेवणे, त्याविषयी वर्गात चर्चा करणे अशा प्रयोगातून कदाचित अशी सवय रुजू शकते.

      स्वच्छतागृह हा शाळेतील पर्यावरणाचा आवश्‍यक घटक आहे जो विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित आहे. त्यामुळे स्वछतागृहे ही नेहमीच मुलांच्या वयोगटाचा विचार करून तयार केलेली असावीत आणि त्यांच्यामधून कोणताही जंतुसंसर्ग होणार नाही याची सातत्याने खबरदारी घेतली जावी. मुलांची आणि मुलींची स्वच्छतागृहे स्वतंत्र आणि लांब असावीत.

      अर्थात या सर्व मूलभूत बाबी झाल्या. काही ठिकाणी आर्थिक अडचण तर शहरी भागात जागेची अडचण यामुळे या सर्व सुविधा कशा निर्माण करता येतील? असाही प्रश्‍न काहींच्या मनात उद्भवू शकेल. पण आहे त्या परिस्थितीतून, साधनातून जास्तीतजास्त चांगल्या सुविधा कशा निर्माण करता येतील असा विचार केला तर मार्ग निघू शकतो. त्यासाठी गरज आहे फक्त कल्पकता आणि इच्छाशक्तीची! कारण शाळा म्हणजे समाजाची एक छोटी प्रतिकृती आहे असे म्हटले जाते. त्यामुळे समाज सुदृढ बनवायचा असेल तर शैक्षणिक पर्यावरणही उत्तम निर्माण करण्याची गरज आहे. 

– डॉ. मेधा फणसळकर, 9423019961

Leave a Reply

Close Menu