सावंतवाडी-सालईवाडा येथे साहस प्रतिष्ठान सिंधुदुर्ग संचलित दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र,सावंतवाडी या केंद्राचा वर्धापनदिन दिव्यांग विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनाने संपन्न झाला. उद्घाटन ज्येष्ठ नागरिक संघ सहसचिव सुधीर धुमे यांनी केले. २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक संघ सावंतवाडी व साहस प्रतिष्ठान सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच दिव्यांग कन्या प्राजक्ता माळकर हिच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्र आपण सारे मिळून सांभाळूया. दिव्यांग केंद्र निरंतर सुरू राहण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. या मानव कल्याणाच्या कार्यात सर्वांनी सहभागी होऊन खारीचा वाटा उचलावा, असे आवाहन साहस संस्थेच्या संस्थापक, अध्यक्षा रुपाली पाटील यांनी केले. प्रस्तावना दिव्यांग विकास केंद्राचे सचिव न्हानू देसाई यांनी केली. प्रमुख पाहुणे ज्येष्ठ नागरिक संघ सल्लागार अण्णा देसाई, खजिनदार अरुण मेस्त्री, अॅड.बापू गव्हाणकर, मूकबधिर संस्थेचे सुशांत कुडाळकर, विश्वस्त दिपक पाटील, दिव्यांग विकास व प्रशिक्षण केंद्राचे सचिव न्हानू देसाई, खजिनदार प्रविण सूर्यवंशी, द्रोपदी राऊळ, रूपाली मुद्राळे, शिक्षिका विदिशा सावंत, प्रियांका कडगावकर, दिव्यांग विद्यार्थी, बंधू-भगिनी तसेच दिव्यांग मुलांचे पालक, मान्यवर हितचिंतक उपस्थित होते. सूत्रसंचालन विदिशा सावंत यांनी तर प्रविण सूर्यवंशी यांनी आभार मानले.