महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेदरम्यान काजू उद्योगाबाबत उपस्थितांना आवश्यक ती माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे या सभेत काजू उद्योगासाठी लागणा-या २७ मशिनरी प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाचा फायदा सिधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर तर काही प्रमाणात सांगली, सोलापूर, नागपूर भागातील उपस्थित उद्योजकांना झाला.
महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा नेमळे येथील हॉटेल आराध्य येथे ५ व ६ मार्च या दोन दिवसांत संपन्न झाली. कार्यक्रमाची सुरुवात कर्नाटक कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष गोपीनाथ कामत यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. यावेळी केसीएमएचे उपाध्यक्ष तुकाराम प्रभू, माजी अध्यक्ष प्रकाश कलबावी, महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश बोवलेकर, उपाध्यक्ष भास्कर कामत, सेक्रेटरी बिपिन वरसकर, खजिनदान सिद्धार्थ झांटये आदी व्यासपिठावर उपस्थित होते.
तुकाराम प्रभू यांनी काजू व काजूची आजची परिस्थिती व पुढील येणा-या हंगामात काजूची परिस्थिती, परदेशातील काजू स्थिती याबाबत मार्गदर्शन केले. प्रकाश कलबावी यांनी भारतातील चालू हंगामातील काजू विक्री व आगामी काळात येणा-या मागणीची विस्तृत माहिती दिली. सुरेश बोवलेकर यांनी नविन उद्योजकांना सामाविष्ट्य करण्याचे आवाहन केले. शासनाकडून फळपिक विकास योजना शेतकरी व उद्योजकांना समजावून सांगण्यासाठी काही दिवसांत मिटींग घेण्यात येणार असल्याचे सांगून सद्यस्थितीत उद्योगाला येणा-या अडचणी निवारण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन श्री.बोवलेकर यांनी दिले.
ओरिसा कॅश्यू असोसिएशनचे अध्यक्ष सावंत यांनी ओरिसामधील काजू उद्योगाची कल्पना दिली. त्यानंतर काजूवरील संशोधक डॉ.गजभिये यांनी महाराष्ट्रात उत्पादित होणा-या काजूच्या झालेल्या परिक्षणाबद्दल माहिती देऊन चालू हंगामात मे महिन्याच्या अखेरपर्यंत काजूचे उत्पादन सर्व ठिकाणी समाधानकारक राहिल असे सांगितले.
६ मार्च रोजी सीए दाभोलकर यांनी बजेटमधील उद्योगाला मिळणा-या योजना व नविन जीएसटी व इन्कम टॅक्सबद्दल माहिती दिली. त्यानंतर महाराष्ट्रातील काजू बीला किफायतशीर दर देण्यासाठी सर्व उद्योजकांबरोबर अध्यक्षांची चर्चा होऊन तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. या दोन दिवसांच्या कार्यक्रमावेळी महाराष्ट्र व गोवा येथील उद्योजक, काजू व्यापारी, छोटे उद्योजक असे एकूण ४५० जण उपस्थित होते. महाराष्ट्र कॅश्यू मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या कमिटीत कोणताही बदल न करता तिच पुढे कार्यरत ठेवण्यात आली.