सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांना 2005 पूर्वीच्या दराने पेन्शन लागू करावी या मागणीसाठी वेंगुर्ले तालुक्यातील विविध आस्थापनावरील सुमारे 95 टक्के राज्य कर्मचारी संपावर गेल्याने येथील सर्वच शासकीय, निमशासकीय कार्यालयात शुकशुकाट होता. प्रत्येक कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.
वेंगुर्ले तहसिल कार्यालयातील एकुण 44 कर्मचाऱ्यापैकी 35 संपावर, 4 रजेवर तर 5 हजर होते. वेंगुर्ले न. प. तील एकुण 44 कर्मचाऱ्यापैकी दोन आस्थापनेवरील कर्मचारी व मुख्याधिकारी वगळता इतर 41 कर्मचारी संपावर होते. वेंगुर्ले पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील एकुण 328 कर्मचाऱ्यांपैकी 305 संपावर होते. तालुक्यातील 133 पैकी 14 शाळा सुरु होत्या. पंचायत समितीच्या इतर विभागातीलही बहुतांश कर्मचारी संपावर गेले आहेत.
संपाची कल्पना नसल्याने कामासाठी ग्रामीण भागातून आलेल्या अनेक लोकांना काम न होताच परत जावे लागले. वेंगुर्लेतील दहावीच्या परीक्षेवर या संपाचा परिणाम झाला नसल्याचे वेंगुर्ले पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी सांगितले.