जीवनात पाण्याला अनन्य साधारण महत्त्व आहे. जीवन जगण्यासाठी पाणी आवश्यक आहे. पिण्यापासून ते स्वच्छतेपर्यंत पाण्याचा वापर हा केला जातोच. काही ठिकाणी पाण्याचा अनावश्यक वापर केला जातो. ज्यावेळी पाणी टंचाई येते त्यावेळी पाण्याची खरी किंमत समजते. पाणी टंचाईचे हे चित्र गेली बरेच वर्षे वेंगुर्ला शहरात दिसत होते. ऐन पर्यटनाच्या हंगामातच पाण्याचा साठा कमी झाल्याने पर्यटकांमध्ये नाराजीचे सूर उमटत होते. याचा परिणाम मुख्यत्वे करुन हॉटेल व्यावसायीकांमध्ये जाणवत होता. परंतु, वेंगुर्ला शहर हे पाणी टंचाई मुक्त करण्याच्या घेतलेल्या ध्यासातून अखेर शहर पाणी टंचाई मुक्त झाले आहे. गतवर्षी पेक्षा यावर्षी पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात वेंगुर्ला नगरपरिषदेला यश आले आहे.
अशी केली पाणी टंचाईवर मात
दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा का होत नाही किंवा पाणीटंचाई का होते? यासाठी एप्रिल 2017मध्ये ‘पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट‘ किरातमधून प्रसिद्ध केला होता. पाणी पुरवठा विभाग कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे यांनी त्यावेळी पाणी साठवणूक क्षमता आणि पाणी वितरण व्यवस्था यामध्ये निदर्शनास आलेल्या त्रुटींवर मात केली. नगरपरिषदेने सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने 2018 पासून टँकरमुक्त वेंगुर्ल्याचे चित्र दिसू लागले.
पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी सुमारे 40 वर्षांपूर्वीच्या जुन्या पाईपलाईन बदण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाईपलाईनवरचे वॉल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे 2017 पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून 1 लाख लिटर पाण्याची टाकी व चंद्रभागा विहिर आदी कामे मंजूर करुन ती पूर्णत्वासही नेली. अग्निशामक केंद्राजवळ 2 लाख लिटर पाण्याची टाकी व विहिर, गाडीअड्डा येथील 50 हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नविन विंधन विहिर बांधण्यात आली. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविल्याने वाढविली. आनंदवाडी येथे पाण्याची टाकी बांधण्यात आली. त्याचबरोबर शहराच्या मुख्य ओहोळावर 5 बंधारे बांधल्याने आजूबाजूच्या विहिरींच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. तसेच या सर्व उपयांबरोबरच शहर कायमचे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी निशाण तलाव धरणाची उंची अडीच मिटरने वाढविण्यात आली. या सर्व कामांमुळे वेंगुर्ला शहर आज पाणी टंचाई मुक्त झाले आहे. वेंगुर्ला नगरपरिषद सद्यस्थितीत रोज 10 लाख लिटर पाणी पुरवठा करीत आहे. लोकसहभागातून गेले 5 वर्षे शहरातील ओहोळांवर बंधारे घातले जात आहेत.
पाऊस वेळेत न पडल्यास पाणी टंचाई
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार 31 मे पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत राहील. परंतु, पुढे पाऊस वेळेत न पडल्यास पाणी टंचाई भासण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पाऊस लांबणीवर गेल्यास पाणी कपात होऊ शकते.
या भागात बसू शकते पाणी टंचाईची झळ
शहरातील दाभोसवाडा व राजवाडा हे भाग डोंगराळ परिसरात आहेत. त्यामुळे पाण्याचा दाब कमी झाल्यास येथे पाणी पोहचत नाही. दरम्यान, पाऊस नियोजित वेळेनुसार उशिरा पडल्यास सर्वात प्रथम पाणी टंचाईची झळ ही या भागाला बसणार आहे.
नारायण तलावाचे काम होणे आवश्यक
नारायण तलाव हा शहराला पाणी पुरवठ्याचा आणखी एक स्त्रोत आहे. हा नारायण तलाव दाभोसवाडा व राजवाडा परिसराला लागूनच आहे. त्यामुळे नारायण तलाव सुस्थितीत झाल्यास भविष्यात शहराला भरपूर प्रमाणात पाणी उपलब्ध होईल. त्यामुळे या तलावाचे काम लवकरात लवकर हाती घ्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. -प्रथमेश गुरव, 9021070624