‘पेटारो चलत ऱ्हवाक होयो’ हे दशावतारी कलाकारांमध्ये रुजलेले भरतवाक्य आपल्या आयुष्याचे ध्येय मानणारे दशावतारी कलेचे थोर संशोधक कै. डॉ. तुळशीदास बेहेरे यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे यंदाही दिनांक 15 मे ला वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावातील ‘वरद’ या त्यांच्या निवासस्थानी डॉ. बेहेरे यांचा स्मरणसोहळा आयोजित करण्यात आला होता. तसेच त्यांच्या परिवाराने दशावतारी नाटकाचे आयोजनही केले होते. डॉ. बेहेरेंनी स्थापन केलेल्या सिद्धिविनायक दशावतारी मंडळातील कलाकारांनी ‘कर्कासुर’ या पुराणातील आख्यानाचे दशावतारी नाटक सादर केले.
याप्रसंगी डॉ. बेहेरे यांच्या कार्याला मानवंदना देण्याकरीता आणि त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरीता गावातील उपसरपंच मा.श्री. सचिन नाईक, श्री. रमाकांत ठोंबरे, श्री. जयवंत तुळसकर, श्री. नारायण कुंभार तसेच तंटामुक्ती अध्यक्ष श्री. मंदार तुळसकर असे मान्यवर उपस्थित होते. तसेच तुळस गावातील प्रसिद्ध उद्योजक श्री. संजय तांडेल, श्री. पराग सावंत आणि श्री. आनंद तांडेल हेही यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात प्रा. रेखा बेहेरे म्हणाल्या, “डॉ. बेहेरे गेल्यानंतर दरवर्षी त्यांच्या वाढदिनी त्यांच्या स्मृतीचे स्मरण म्हणून त्यांनीच देश परदेशात दशावताराचा प्रसार होण्यासाठी स्थापन केलेल्या श्रीसिद्धिविनायक नाट्य मंडळातर्फे दशावतारी नाटक सादर करून आपल्या गुरूंना गुरुवंदना देण्यात येते. बेहेरे यांची संक्षिप्त रंग संहिता, पुराणातील कथानक घेऊन हे मंडळ प्रयोग सादर करते. आमच्या परीने बेहेरे यांचे कार्य पुढे चालत राहावे म्हणून आम्ही मंडळाच्या रूपाने नेहमीच प्रयत्नशील राहू. या प्रसंगी दरवर्षी तुळस गावातील मान्यवर आमच्या कौटुंबिक सोहळ्यात सहभागी होतात आणि आम्हाला प्रोत्साहन देतात त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते.”
सरपंच श्रीमती रश्मी परब म्हणाल्या, ”डॉ. बेहेरे तुळस गावाच्या मातीत लहानाचे मोठे झाले. डॉक्टरेट मिळवली. दशावताराच्या कलेसाठी मोठे योगदान दिले, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.” ग्रामपंचायत सदस्य सुजाता पडवळ म्हणाल्या, “बेहेरेेंचा तुळस गावचे नाव सर्वदूर पसरावे यासाठी प्रयत्न असायचा. तो सफलही झाला असे म्हणायला हरकत नाही. कारण कोकणातल्या एवढ्या प्रसिद्ध लोककलेवर डॉक्टरेट करणारे ते पहिलेच आहेत.”
माजी सरपंच श्री. शंकर घारे म्हणाले, ”बेहेरे हे तुळस गावचे भूषण होते. बेहेरे यांचे हे मौल्यवान कार्य करून तुळस गावाला स्वतःचे वेगळेस्थान प्राप्त करून दिले याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.” त्यांचे कुटुंबीय त्यांच्यानंतर हा वारसा पुढे चालवत आहेत याचेही त्यांनी आवर्जून कौतुक केले.
“यावर्षीच्या गावचे ग्रामदैवत जैतीर उत्सवासाठी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्याकडे आमंत्रण घेऊन गेलो असताना आपण तुळस गावातून आलो असे सांगताच ते म्हणाले ‘तुळस गाव म्हणजे तुळशीदास बेहेरे यांचे गाव का?’ असे त्यांनी विचारले. बेहेरे यांची कीर्ती त्यांच्यानंतर आजही केंद्रातील मंत्री काढतात ही खूप मोठी गोष्ट आहे” असे गावातील मान्यवर विजय रेडकर म्हणाले पुढे म्हणाले की बेहेरे यांच्याकडे संशोधक वृत्ती असल्यामुळे प्रत्येक गोष्टीकडे सखोल अभ्यासातून पाहण्याची त्यांना सवय होती. घोडेमुख येथील बैलांच्या शर्यतीचे समालोचन सहज म्हणून त्यांनी केले तरीसुद्धा ते रंगतदार आणि अभ्यासपूर्ण होते.
“बेहेरे फक्त दशावतारात संशोधन करून थांबले नाहीत तर तळागाळातील दशावतारी कलावंतांचे सर्वेक्षण करून सरकारच्या कलावंतांसाठीच्या पेन्शन योजनेचा लाभ व्हावा यासाठी देखील त्यांनी पुढाकार घेतला. त्यांच्या कार्याचे फलित म्हणजे आज जेष्ठ दशावतारी कलावंतांना पेन्शन योजनेचा लाभ होत आहे.” असे भाजप उपाध्यक्ष श्री. विश्वास सावंत म्हणाले.
बेहेरे यांच्या कन्या तन्मयी म्हणाल्या, ”आज बाबा असते तर त्यांनी त्यांचा सत्तरावा वाढदिवस असाच तुळस गावात साजरा केला असता. त्यांनी स्थापन केलेल्या दशावतारी मंडळाने बाबांनी लिहीलेल्या संहितांचा आधार घेऊन इथे ती कला सादर करणे हा आमचा त्यांचे कार्य पुढे नेण्याच्या अनेक प्रयत्नांमधील एक छोटासा प्रयत्न आहे.
बेहेरे यांची धाकटी कन्या मृण्मयी यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्यानंतर समर्पक वेशभूषा, रंगभूषा, उत्कृष्ट संवादफेक, प्रभावी अभिनय आणि अप्रतिम नृत्य यामुळे बेहेरेंच्या तालमीतील कलाकारांनी सादर केलेला हा नाट्यप्रयोग रसिक प्रेक्षकांना भावला. या कलाकारांचे कौतुक भाजप उपाध्यक्ष श्री. विश्वास सावंत यांच्या हस्ते भेटवस्तू देऊन केले.