पत्रकार मंगल कामत यांच्या आत्मचरित्राचे प्रकाशन

बांदा येथील ज्येष्ठ पत्रकार मंगल कामत यांच्या माझा जीवनप्रवास या आत्मचरित्राचे प्रकाशन बांदा येथील नट्ट वाचनालयात नुकतेच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बांदा सरपंच प्रियांका नाईक होत्या.

      डॉ. पाटकर म्हणाले, जीवनात घडलेल्या वाईट घटनेची कोणतीही कटुता न ठेवता त्यांनी केलेला प्रवास कौतुकास्पद आणि इतरांना मार्गदर्शक आहे. पुरुष सत्ता असलेल्या पत्रकार क्षेत्रात स्वतःचा वेगळा ठसा उमटवणाऱ्या मंगल कामत यांचे सामाजिक कार्यही प्रेरणादायी आहे. बांदा पंचक्रोशीत मंगल कामत यांना ओळखणारे बरेचजण भेटतील, पण या आत्मचरित्रामुळे एक नवी ओळख मंगल कामत यांची होईल असा विश्‍वास डॉ. पाटकर यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अन्वर खान म्हणाले, मी मंगल कामत यांना शिक्षणाचे धडे दिले आहे. माझी मंगल विद्यार्थिनी आहे असे म्हणण्यापेक्षा मी तिचा शिक्षक आहे असे म्हणण्यासारखे कार्य आज मंगल कामत यांच्या हातून घडले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही संयम ठेवला की यशश्री प्राप्त होते हे मंगल कामत यांच्याकडे पाहिल्यावर दिसून येते. मंगल कामत यांनी आत्मचरित्र प्रसिद्ध केले ते थोडक्यात आहे. या आत्मचरित्राचा पार्ट 2 यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

      ॲड. निंबाळकर म्हणाले, मंगल कामत यांच्या जीवनातील 2002 मधील 58 दिवस त्यांच्या जीवनाला वेगळी दिशा देणारे होते. मात्र त्यांनी डगमगून न जाता योग्य दिशेने मार्गक्रमण करत आपली ओळख निर्माण केली. त्यांनी आपल्या आत्मचरित्रात उल्लेख केलेल्या गोष्टींचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे कामत यांच्या धीरोदत्त वृत्तीचे कौतुक असल्याचे सांगत त्यांनी शुभेच्छा दिल्या.

      श्री. काळे म्हणाले, दक्षता कमिटीत असलेल्या मंगल कामत यांच्यामुळे अनेक संवेदनशील प्रकरणे हाताळताना आम्हाला सहकार्य व मार्गदर्शन लाभते. त्यांच्यामुळे बरेच संसार उध्वस्त होण्यापासून आम्ही वाचवू शकलो. मंगल कामत यांच्याबद्दल जेवढे ऐकले होते त्याहीपेक्षा त्यांच कार्य अतिशय कौतुकास्पद आहे.

      सरपंच श्रीमती प्रियांका नाईक म्हणाल्या, मंगल कामत यांच्यावर जसे कठीण प्रसंग आले तसे प्रसंग एखाद्या महिलेवर आले असते तर ती कोलमडून गेली असती. मात्र मंगल कामत यांनी प्रत्येक प्रसंगाला धैर्याने तोंड देत आपले कार्य सुरू ठेवले. त्यांची तीच जिद्द व इच्छाशक्ती त्यांना या वळणावर घेऊन आली आहे. त्यांचा हा आदर्श महिलांसाठी प्रेरणादायी आहे.

      मंगल तार्इंच्या बाबतीत प्रेम हे सांगता येत नाही, बोलता येत नाही आणि दाखविताही येत नाही. ते अनुभवावेच लागते. ही प्रेमाची अंतरीची खूण मंगलतार्इंकडे आहे. त्यामुळेच आर्थिकदृष्ट्या त्या कदाचित संपन्न नाहीत. परंतु माणसांच्या गोतावळ्याने त्या नेहमीच प्रफुल्लीत असतात. माझ्या आजीसासुबार्इंना गोव्यात ॲडमीट केले असताना त्यांच्या सोबतीला म्हणून मंगलताई होत्या. त्यांच्या आयुष्यातील ते 58 दिवस शब्दांकित करताना या ऋणानुबंधामुळेच आम्ही संपर्कात आलो. त्यांची आत्तापर्यंतची आत्मविश्‍वासपूर्वक वाटचाल थक्क करणारी आहे. असे मत सीमा मराठे यांनी व्यक्त केले.

      यावेळी माजी शिक्षण व आरोग्य सभापती प्रमोद कामत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्‍वेता कोरगावकर, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, यांनीही मनोगत व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बांदा पत्रकार परिवारातर्फे मंगल कामत यांचा सत्कार बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.

      आत्मचरित्राचे प्रकाशन झाल्यानंतर आपल्या मनोगतात मंगल कामत सर्वांचे आभार मानले. बांदा पत्रकार यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची आठवण सांगताना आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. त्या प्रसंगात आत्महत्या करण्याचा विचारही मनात आला. मात्र घरी आई वाट पाहत आहे हे लक्षात येताच तो विचार काढून टाकला. त्या प्रसंगात माझं कुटुंब माझ्या पाठीशी राहीलं. डॉ. पाटकर, अँड. निंबाळकर यांच्यासारख्या व्यक्तींनी खंबीर साथ दिली. त्यामुळेच मी पुन्हा उभे राहू शकले. बांदा पत्रकार परिवारातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रास्ताविक पत्रकार आशुतोष भांगले, सुत्रसंचालन नितीन नाईक यांनी तर आभार जय भोसले यांनी मानले. यावेळी पत्रकार सचिव देवयानी वरसकर, निलेश मोरजकर, मयूर चराटकर, प्रवीण परब, राकेश परब, अजित दळवी, शैलेश गवस, रामदास जाधव, विश्‍वन नाईक, विराज परब, यशवंत माधव, रोहीत कशाळीकर, भगवान शेलटे, उल्हास परब, जीवबा वीर, अनिता पाटकर, राजाराम परब, शशांक मराठे ग्रामपंचायत सदस्य रुपाली शिरसाट, वाफोली उपसरपंच विनेश गवस आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu