कोकणपुत्र ‘दाभोलीचा वसंत’

वाचकहो! या लेखाच्या सुरुवातीलाच आपणास एक गंमत सांगतो. ते वाचून आपण सगळेच हैराण व्हाल.

      उत्तरप्रदेश मधील एखाद्या शेतकऱ्याची मुलगी जर बाळंपणात माहेरी आली तर गर्भसंस्कार होण्यासाठी काय काय वाचते? हे जर मी विचारले तर आपण म्हणाल, रामायण… महाभारत … भागवत.. असे काही वाचत असेल. आपले म्हणणे बरोबरच आहे. आपण म्हणालात तसे ते सगळेच साहित्य वाचतात. पण आता काळ बदलल्याने या ज्या अपेक्षित आया असतात त्या चक्क UPSC परीक्षेत प्रथम आलेल्या प्रसिद्ध व्यक्तिचे चरित्र व अनुभव वाचतात. शास्त्रज्ञाच्या अभ्यासातून असे दिसुन आले की ही जन्माला आलेली मुले जेव्हा इयत्ता तिसरीच्या वर्गात जातात तेव्हा त्यांच्या घरात आलेल्या पाहुण्याने विचारले की, “बाळ!! तु मोठेपणी कोण होणार?“ तर ती मुलगी किंवा मुलगा सरळ “मला आय.ए.एस.ऑफिसर व्हायचे आहे!“ असे बोलुन मोकळे होतात. अभ्यासातून असे दिसून आले की, हीच मुले जेव्हा सातव्या आठव्या इयत्तेत गेल्यावर जो काही कुठल्या विषयावर निबंध लिहितात तशा प्रकारे निबंध इतर राज्यातील शालांत परीक्षेत पास झालेली मुले लिहू शकत नाही. इतकी ती मुले प्रगल्भ असतात.

      आज मी अशाच एका कोकणपुत्राची ओळख करून देणार आहे, ज्या कोकणपुत्राने आपल्या कोकणातल्या सिंधुदुर्गातील शाळेत शिक्षण घेऊन 2022 सालच्या UPSC च्या परीक्षेत भारतामधुन 76 वा क्रमांक व महाराष्ट्रातून 2 रा क्रमांक मिळवला. या कोकणपुत्राचे नाव श्री. वसंत प्रसाद दाभोलकर!

      वसंत मुळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ल्यातील दाभोली गावचा असून इथेच जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून प्राथमिक म्हणजे इयत्ता सातवी पर्यंत शिक्षण झाले. यानंतर त्याचे पुढील शिक्षण सेमी इग्रंजीतून इयत्ता आठवी ते दहावीचे वेंगुर्ल्यात वेंगुर्ला हायस्कूल मधून घेतले. त्यानंतरचे कुडाळच्या कुडाळ हायस्कूल मधुन 11 वी ते 12 वी चे शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर वसंतने जे.ई. ची परीक्षा चांगले मार्क्स मिळवून यशस्वीरिता उत्तीर्ण झाल्यानंतर सेंट्रल गव्हर्न्मेंट तर्फे ट्युशन TFWS म्हणजे Tuition Fee Waiver ची स्कॉलरशिप मिळाली म्हणून रत्नागिरीतील फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेता आली. वसंताचे बाबा महाराष्ट्र परिवहन संस्थेत क्लार्क होते व ते 2020 साली निवृत्त झाले. तसेच वसंताची आई गृहिणी आहे. जेव्हा इंजिनिअरिंग कॉलेजचे शेवटचे वर्ष होते, तेव्हा कॅम्पस मुलाखती सुरू होणार होत्या. त्यासाठी वसंतने छान पैकी तयारी केली होती. तसेच इंटरनेटवरील Linkedin संकेतस्थळावर जाऊन तिथे नोकरीसाठी अर्ज केले होते. वसंत दाभोलकरने पदवी शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये केले असले तरी कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षात कॅम्पसमध्ये तो काही आय.टी. कंपनीमध्ये सिलेक्ट झाला होता. पण एक म्हणतात ना ऋणानुबंध तसेच कॉलेजमध्ये शेवटच्या वर्षाला असताना वंसतने मनोमन विचार केला की, माझे संपुर्ण शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले व सरकारी शैक्षणिक खात्याकडून सगळ्याच सोयी सुविधा मी घेतल्या आहेत. त्यामुळेच आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो. त्यासाठी आपण या सरकारी यंत्रणेचा एक भाग बनले पाहिजे. पण वसंतला तेव्हा एक भीती होती की असे सरकारी अधिकारी बनणे म्हणजे त्यासाठी भरपूर अभ्यास करावा लागेल. विशेष म्हणजे वसंत दाभोलकरने शालेय व कॉलेजच्या काळात इतका कधी अभ्यास केला नसला तरी लहानपणापासून खूप साऱ्या स्पर्धा परीक्षेत वसंतने भाग घेतला होता. पण UPSC साठी दिवसभरात एकच ठिकाणी सातत्यपूर्ण दहा बारा तास अभ्यास करावा लागतो अशा ऐकीव गोष्टींमुळेच वसंताला थोडीफार भीती वाटत होती. पण इजिंनिअर कॉलेजच्या शेवटच्या वर्षात निर्णय घेऊन ठरविले की कसेही करुन UPSC आपल्याला करायचे आहे व हे आपल्याला जमलेच पाहिजे. असे ठरविल्यावर वसंताने जसे जगात सगळीकडेच लॉकडाऊन सुरू झाले तेव्हा पुर्ण क्षमतेने UPSC चा अभ्यास करण्यास सुरुवात केली. आणि याच निवांत काळात वसंतचा छानपैकी अभ्यास झाला.

      संपूर्ण वेळ वसंताने सेल्फ स्टडीला सुरुवात केली. सुरुवातीलाच त्यालाही जरा कठीणच वाटले. आपल्याला हे कसे जमणार? घरच्यांची साथ व घरातील सकारात्मक वातावरण तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य परिसर व कधीतरी सतत अभ्यास करून कंटाळा आला तर समुद्र किनाऱ्यावर किंवा एखाद्या दिवशी प्रभातफेरी साठी छान जंगलात फेरी मारून यायचे असे केल्याने वसंताचे अभ्यासात मन रमत गेले व खुप छानपैकी अभ्यास होत गेल्याने परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी फार सोपे झाले.

      वसंत म्हणतो की, “आपल्या कोकणातील मुलांमध्ये म्हणजे जी मुले मराठी माध्यमातून किंवा सामान्य मध्यमवर्गीय किंवा आर्थिक परिस्थिती जेमतेम असते अशा परिवारातुन आलेली असतात त्यांना आपल्याला UPSC जमेल का? हे फार कठीण असते. आपल्याकडे पैसे नाहीत तर आपल्याला जमेल काय? असा एक न्यूनगंड असतो. तर असे काही टेन्शन घ्यायचे कारण नसते. आपल्याला हे नक्कीच जमेल.“  असे वसंता खात्रीपूर्वक सांगतो. पुढे तो खास कोकणातील मुलांना म्हणतो. “तुमचे कुठलेही बॅकराऊण्ड असुदे, तुम्ही कुठल्याही माध्यमातून शिक्षण घेतलेले असाल. तरी तुम्ही इतरांपेक्षा मागे आहोत असे मुळीच वाटुन घेण्याची गरज नसते. तुम्ही खुप भाग्यवान आहात की कोकणातील सिंधुदुर्गसारख्या जिल्ह्यात चांगले गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. याच भागातील आपण असल्यामुळेच आपण स्वतःला भाग्यवान समजले पाहिजे. या भागातील शिक्षक चांगल्या पैकी स्वतःच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. असे करताना ते फक्त शिक्षण न देता मूल्यशिक्षण देतात तसेच चांगले संस्कार देतात. याचा UPSC च्या प्रवासात मला स्वतःला फार फायदा झाला. म्हणजे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असाल तर तुम्ही कोचिंग क्लास लावलाच पाहिजे असे काही नाही. जर तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य असेल तर ते चांगले ठरू शकते. त्यामुळे तुमची पुर्व तयारी काहीशी लवकर कमी वेळात होऊ शकते. पण क्लास लावला नाही तरी आता इटंरनेटवर इतके सारे स्रोत उपलब्ध आहेत, तसेच भरपुर नोट्स व युट्यूबवर अनेक विडिओ उपलब्ध आहेत ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःचा सेल्फ स्टडी करू शकता.“

      वसंतने लॉकडाऊन मध्ये सपुर्ण जग थांबले असताना इंटरनेटचा वापर करून UPSC साठी सेल्फ स्टडीज केला. म्हणुनच आज इथे पोहचला आहे. यासाठी त्याला त्याच्या अनेक शिक्षकांनी मार्गदर्शन केले असे तो नम्रपणे सांगतो. पुढे तो म्हणतो.

      “जर आपण एखाद्या वाटेवरुन एकटे जात असाल तर ती वाट एकाकी किंवा खडतर होऊन जाते. पण याच वाटेवर चालताना तुमच्याबरोबर तुमचे आप्त, शिक्षक व मित्रमंडळी असतील तर त्यांच्याबरोबर संवाद करत चाललात तर ती वाट आपण सहजपणे पार करू शकता.“

      वसंतास या परीक्षेसाठी दिल्लीतील व महाराष्ट्रातील काही शिक्षकांचे न विसरण्यासारखे सहकार्य मिळाले हे सांगताना वसंत दाभोलकर म्हणाला, “दिल्लीतील व महाराष्ट्रातील खुप सारे शिक्षक कमीत कमी पैशात तुम्हाला सहकार्य करण्यास तत्पर असतात.“

      वसंत पुन्हा पुन्हा एकाच गोष्टीवर जोर देत सांगतो ते म्हणजे “तुम्ही जिथे राहता तिथेच सेल्फ स्टडी करू शकता व यासाठी क्लासला दिल्लीत किंवा पुण्यात मध्ये गेला नाहीत तरी चालू शकते.“

      वसंताचे मी पुढचे विचार ऐकून फारच प्रभावित झालो. तो म्हणतो,

      “तुम्ही खुप सारी मुले UPSC मध्ये सिलेक्ट झालेली पाहिलात तर तिथे आय.आय.टी., आय.ए.एम्‌., इथली सुध्दा मुले आहेत. आणखीन एक चांगली गोष्ट आहे ती म्हणजे आपल्याकडे अनेक हुशार विद्यार्थी येत आहेत. त्यात सामान्य परिवारातील विद्यार्थी आहेत ज्याचे आईवडील शेती करतात किंवा एखाद्याचे वडिल रिक्षा चालवतात असे देखील आहेत. आणि या सर्वांची आपल्याला गरज आहे. कारण आपण जेव्हा देश चालवतो तेव्हा ते चालविण्यासाठी सगळेच हुशार किंवा चांगली प्रभावी पार्श्‍वभुमी असलेली माणसे असली पाहिजेत असे काही नाही. देश चालवायला इथे सगळ्याच प्रकारचा अनुभव घेतलेल्या माणसांची गरज आहे.“

      वाचकहो या अस्सल कोकण पुत्राची एक गम्मत सागतो ती म्हणजे, वसंत लहाणपणी दशावतार नाटकात काम करायचा. त्याचा फायदा UPSCची मुलाखत घेतात तेव्हा झाला. जशी रंगमंचावर भुमिका वटवतात तशीच त्याने एखादा सरकारी अधिकारी असल्या सारखाच त्या पॅनेल समोर आत्मविश्‍वासाने बोलला हे विशेष. त्याच्या भावी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा!

– रत्नाकर सावित्री दिगंबर येनजी, 9819955541

Leave a Reply

Close Menu