देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे झाली. सध्याच्या या पिढीला त्यांच्या स्वतःच्या स्वातंत्र्याबद्दल अधिक चिंता आहे. आता शाळेमध्ये शिकणारी मुलं स्वतःच्या ‘स्पेस‘ बद्दल अधिक जागरूक आहेत आणि त्यांना थोडक्यात महत्त्वाचे सांगितलेले आवडते. परंतु फार मोठे प्रवचन देण्यास सुरुवात करताच आताची पिढी काढता पाय घेते. त्यामुळे आधी स्वातंत्र्य म्हणजे काय? हा प्रश्न निर्माण होतो. आताच्या मुलांना जबाबदारीची जाणीव नाही असे सर्रास म्हटले जाते. पण हे म्हणणारे पालक तुमच्यामध्ये जबाबदारीची जाणीव कधीपासून निर्माण झाली, तर त्याचे उत्तर देता येत नाही अगदी बारकाईने अभ्यास केला तर आपल्या असे लक्षात येईल की आपण लहान असताना आपल्या पालकांनी आपल्यामध्ये हस्तक्षेप केला नव्हता जसे आपण धडपडतो आहोत तसे धडपडू दिले होते आणि त्याच धडपडीतून आपण सजग बनत गेलो. जबाबदारीची जाणीव होत गेली. मुल हे अनुकरण प्रिय असते. आपले, समाजाचे प्रतिबिंब आपल्या या पिढीत आपल्याला दिसणार आहे. अशावेळी ‘आमच्या वेळी असं होतं..‘ अशी सुरुवात केल्यास त्यात या मुलांना अजिबात स्वारस्य नसते कारण ते त्यांनी अनुभवलेले नसतं. आजकाल स्पून फीडिंग प्रकार अति प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आजकाल मुलांच्या स्वातंत्र्यावरच गदा आलेली दिसून येते. म्हणूनच पालकांनी मुलांचे बोट वेळीच सोडणे म्हणजे स्वातंत्र्य.
अलिकडे शहरांप्रमाणे गावागावातून शाळेमध्ये घेऊन जाण्यासाठी सोसायटीच्या दारापर्यंत बसची सोय असते परंतु हौसिंग सोसायटीच्या दारापर्यंत सोडण्यासाठी पालक येतात, तेव्हा कोणाबरोबर मैत्री करावी-करू नये याचे सल्ले देतात. तिसरी-चौथीपासून मुलांचे बोट टप्प्याटप्प्याने सोडण्याचे नियोजन पालकांनी केले पाहिजे. मुलांनी एकटे खेळायला जाणे, मित्र-मैत्रिणी निवडणे, त्यांच्यामध्ये झालेल्या भांडणाकडे दुर्लक्ष करून त्यांची भांडणे त्यांनाच सोडवण्यास सांगणे, अशाप्रकारे त्यांना स्वातंत्र्याची अनुभूती देणे म्हणजे त्यांच्यावर विश्वास टाकणेच आहे. त्यांच्या अभ्यासामधून एकेक इयत्तेमध्ये लक्ष काढून घेऊन त्यांनाच स्वतःच्या अभ्यासाचे वेळापत्रक तयार करायला सांगणे हा बोट सोडण्याचाच एक प्रकार आहे. त्यांच्यावर लक्ष ठेवताना मुले रोज ठराविक वेळ वाचन करत आहेत की नाही याची खात्री करून घेतल्यानंतर एखाद्या दिवशी त्यांनी गृहपाठ केला नाही तरी त्याचे परिणाम त्यांना भोगू द्यावेत. मुलांचे कोणतेही प्रोजेक्ट पालकांनी करू नयेत.
भाजी मंडईमध्ये कोणती भाजी घ्यावी याचे निर्णय घेण्यापासून मुला-मुलींच्या आवडीप्रमाणे त्यांना त्यांचे करियर पर्याय निवडू देणे म्हणजे स्वातंत्र्य. लग्नानंतर स्वतःच्या संकल्पनेनुसार स्वतःच्या पैशाने घर घेणे-सजवणे म्हणजे स्वातंत्र्य. पुढच्या पिढीने एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये रहावे अशी अपेक्षा असल्यास मुलाच्या लग्नानंतर तत्परतेने सर्व सूत्रे पुढच्या पिढीला सोपवणे, म्हणजे स्वातंत्र्य. घरामध्ये आई वेगवेगळ्या कारणांसाठी वडिलांची परवानगी मागते, असे दृश्य स्वातंत्र्याचा अभाव दर्शवते. एखाद्या प्रश्नावर चर्चा करून तोडगा काढणे आणि घरामध्ये कोणीही परवानगी मागणे यामध्ये मोठा फरक आहे. घरामध्ये वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होतात का, घरामध्ये वेगवेगळी मते मांडली जातात की नाही, याचे निरीक्षण मुले करत असतात. त्यामुळे घरामधील वातावरण कसे आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे.
स्वातंत्र्य म्हणजे आजच्या पिढीला स्वतंत्रपणे विचार करण्यास शिकवणे अपेक्षित आहे. स्वातंत्र्य मिळाल्यावर जबाबदारीचे भान असणे ओघाने आले. स्वातंत्र्य नेहेमीच नियमांच्या बंधनामध्ये राहून पाळले जाते. शाळा-कॉलेजला पोहोचण्यास उशीर होईल म्हणून सिग्नल तोडणे, शाळेचा गृहपाठ न करणे, हे स्वातंत्र्य नव्हे. एक तास वाचन केल्यानंतर अर्धा तास मोबाईल खेळण्यास मागणे,हे स्वातंत्र्य नव्हे. खरे तर आठवी-नववीपर्यंत मुला-मुलीना स्वतंत्र मोबाईल देणे गैर आहे. वयाच्या पाचव्या वर्षी हातात टॅब मिळालेल्या मुलांचे वाचन शून्यावर आलेले आहे याची अनुभूती अनेक पालकांना आली आहे.
एकूणच स्वातंत्र्य ही संकल्पना घरा-घरामध्ये वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींच्या आचरणात दिसावी. कोणतीही व्यक्ती दुस-याला स्वातंत्र्य देत नसते, स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. स्वतंत्र भारतामध्ये प्रत्येक जबाबदार नागरिकाला स्वातंत्र्य आहे पण स्वातंत्र्य नसताना त्याची खरी किंमत कळते. कोणाच्याही प्रभावाखाली न राहता स्वतंत्रपणे विचार आणि कृती करणे म्हणजे स्वातंत्र्य. स्वातंत्र्याचा अभाव म्हणजे धाकदपटशा, बळजबरी, आदेशानुसार पालन, हातात छडी, गप्प बसा संस्कृती. मनाची कवाडे उघडून विविध विचारप्रवाहांचे आवाज जिज्ञासू वृत्तीने ऐकू येण्यासाठी सुसंवादाचे वातावरण प्रत्येक घरामध्ये-शाळेमध्ये निर्माण झाल्यास आजच्या पिढीला स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व उमजेल.