कोजागिरीला ‘चांदणझुला‘ ठरले संस्मरणीय

प्रसिद्ध लेखिका वृंदा कांबळी यांच्या आयोजनाखाली कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून आनंदयात्री वाङ्मय मंडळाचे ‘चांदणझुला‘ कवी संमेलन साई मंगल कार्यालयात पार पडले. साहित्य कोणतेही असो, कथा-कविता-कादंबरी ते समाजहिताचा विचार करूनच लिहिलेले असावे. त्यात उद्बोधनही असावे. सामाजिक विचारांना कवितेत महत्त्व असावे असे मार्गदर्शन सावंतवाडीतील निवृत्त प्राध्यापक व सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुभाष गोवेकर यांनी केले. उत्तरोत्तर रंगत गेलेले कवी संमेलन रसिकांना खिळवून ठेवणारे संस्मरणीय ठरले.  संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प.अवधूत नाईक यांनी कोणत्याही क्षेत्रातील प्रगतीसाठी गुरूंची आवश्यकता असते असे सांगितले. या संमेलनात अजित राऊळ, विशाल उगवेकर, संकेत येरागी, सत्यम गडेकर, प्रितम ओगले, स्वप्निल वेंगुर्लेकर, राजश्री परब, आदिती मसूरकर, जान्हवी कांबळी, स्नेहल फणसळकर, हेमा सावंत, योगीश कुळकर्णी, स्नेहा नारिगणेकर, सुरेखा देशपांडे, मुक्ता केळकर, आदित्य खानोलकर, सोमा गावडे, प्रदीप केळुसकर, माधव ओगले आदींनी आपापल्या कविता सादर केल्या. कवीसंमेलनात प्रत्येकवेळी दोन कवींना विशेष संधी देण्याच्या आनंदयात्रीच्या निर्णयाप्रमाणे शिरोडा येथील कवी स्वप्निल वेंगुर्लेकर व दाभोली येथील कवयित्री प्रितम ओगले यांनी यावेळी आपल्या विशेष रचना सादर केल्या. स्वप्निल वेंगुर्लेकर यांनी आपल्या विविध विषयावरील सहा कविता आकर्षक अशा निवेदनाच्या सूत्रात गुंफून सुंदर रितीने सादर करून रसिकांची वाहवा मिळवली. तसेच प्रितम ओगले यांनीही आपल्या चार रचना गाऊन व वाचून सादर केल्या.

     संमेलनाच्या प्रारंभी सुभाष गोवेकर, अवधूत नाईक यांचा तसेच प्राचार्य आनंद बांदेकर निवृत्त झाल्याबद्दल, माणगांव येथील स्नेहल फणसळकर यांच्या कथा संग्रहाला कोमसापचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल तर चारूता दळवी यांचा प्रबंधक पदावरून निवृत्त झाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा.सचिन गोवेकर यांनी तर आभार महेश राऊळ यांनी मानले.

 

 

Leave a Reply

Close Menu