सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे प्रदीर्घ काळापासून होत असलेल्या दुर्लक्षामुळे राज्यातील सरकारी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांपासून औषधांपर्र्यंत सर्व गोष्टींची कमतरता दिसून येते. राज्यात शासकीय, वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात डॉक्टरांची 30 टक्के पदे रिक्त आहेत. हे गेल्या 15 वर्र्षांपासूनचे चित्र आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाकडून मागणी करुनही सामान्य प्रशासन, अर्थ विभाग लक्ष देत नाहीत. पदोन्नती सेवेसाठी पात्र असूनही पदे भरली जात नाहीत. त्याचा परिणाम सहाजिकच रुग्ण सेवेवर होतो. आता तर विविध आजारांवर योग्य त्या औषधोपचाराने येणाऱ्या रूग्णाला शारिरीक व्याधीतून मुक्त करून त्याचे मानिसक स्वास्थ्य चांगले ठेवणारे कंत्राटी डॉक्टरच समस्यांच्या गर्तेत अडकले आहेत. रूग्णांचे मानसिक स्वास्थ्य स्थिर ठेवत असताना आता मात्र, डॉक्टरांनाच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. सुमारे 38 जिल्ह्यांतील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर पगाराविनाच सेवा बजावत आहेत. गेले 4-5 महिने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे 80 डॉक्टरांचे पगारच झाले नसल्याचे समोर आले आहे. एकीकडे डॉक्टरांचे पगार झालेले नाहीत तर दुसरीकडे आरोग्य केंद्रात पुरेशा सुविधा उपलब्ध नाहीत. काही ठिकाणी तर औषधांचा साठाही अपुरा आहे. 11 महिनाच्या करारतत्वावर सेवा बजावणाऱ्या डॉक्टरनाही 4-4 महिने पगारच झालेला नाही.
2019 पासून शासकीय रूग्णालय आणि आरोग्य केंद्रामध्ये भरती केली होती. परंतु, त्यात काहीच वाढ झाली नाही. साथीच्या आजारांच्यावेळी रूग्णालयात रूग्णांची संख्या ही वाढतीच असते. परिणामी, भरतीअभावी ड्युटीवर असणाऱ्या डॉक्टरांवर कामाचा ताण वाढता असतो. कोरोना काळात याचा अनुभव प्रत्येकाने घेतला आहे. अशावेळी एकाचवेळी किती रूग्णांवर आणि किती वेळ उपचार करायचे अशीही परिस्थिती डॉक्टरांसमोर निर्माण होते. सध्या तर कामाचे तास वाढत आहेत. त्यामुळे डॉक्टरांनाच नैराश्याला सामोरे जावे लागत आहे. तर दुसरीकडे स्टाफही कमी असल्याने त्याठिकाणीही ड्युटीवरील डॉक्टरांना लक्ष द्यावे लागते आहे. शासकीय रूग्णालयात रूग्णांना मोफत औषधे दिली जातात. त्यामुळे सर्वसामान्यांपासून गोरगरिब रूग्णही याठिकाणी उपचारासाठी येतात. परंतु, रूग्णालयातील औषधसाठा मुबलक नसल्याने डॉक्टरांसमोर पेचप्रसंग निर्माण होतो. एवढ्या सर्व समस्यांना कामाच्या ठिकाणी तोंड देत असतानाच कंत्राटी डॉक्टरांचे पगार वेळेवर होत नसल्याची समस्या निर्माण झाली आहे. याचा परिणाम अर्थातच डॉक्टरांच्या कुटुंबावरही होताना दिसतो आहे. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक गणिते बिघडत आहेत. डॉक्टर भाड्याने रहात असतील तर घरभाडे, मुलांचे शिक्षण, जीवनावश्यक वस्तू घेताना रोजचे जीवन कसे घालवायचे असे गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर येत आहेत. कंत्राटी डॉक्टर असल्याने एका गावात स्थिर होत असतानाच दुसरीकडे बदली झाल्यास पुन्हा डॉक्टरांची ससेहोलपट होताना दिसते. एवढी सर्व धावपळ करून सुद्धा वर्षानुवर्षे डॉक्टर ‘कंत्राटी‘च राहत आहेत.
कोरोना सारख्या गंभीर संकटकाळात याच सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आणि येथील कर्मचाऱ्यांनी चांगली सेवा बजावून कित्येक रुग्णांचे प्राण वाचविले होते. त्यावेळी त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून पुष्पवृष्टी करणे त्यांच्या कार्याला सलामी देणे असे इव्हेंट साजरे केले गेले. परंतु ते देत असलेल्या सेवेबद्दल त्यांना मिळणारे वेतन वेळेत देणे या मूलभूत कर्तव्याचाच विसर यंत्रणेला पडलेला दिसतो. त्यामुळे आमच्याही समस्यांकडे नेतेमंडळी, अधिकारी यांनी लक्ष द्यावे, आमच्या समस्या समजून घेऊन त्यावर योग्य ती उपाययोजना करावी अशी मागणी कंत्राटी डॉक्टरांकडून होत आहे.
सिंधुदुर्गातील जवळपास प्रत्येक आरोग्य केंद्रावर एक ते दोन कंत्राटी डॉक्टर कार्यरत आहेत. वेंगुर्ला तालुक्यातील आडेली, तुळस, रेडी, परुळे या चार आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी एक बीएएमएस कंत्राटी वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. हे सर्व वैद्यकीय अधिकारी सेवा देऊन ही तांत्रिक कारणामुळे पगाराविना कार्यरत आहेत. – प्रथमेश गुरव, 9021070624