सिधुदुर्गात भूगर्भातील पाणीपातळी खालावली

सिधुदुर्ग जिल्ह्यात ४२ शासकीय निरीक्षण विहिरी आहेत. यापैकी दोडामार्ग, सावंतवाडी, देवगड या ३ तालुक्यात प्रत्येकी ७ विहिरी आहेत. कणकवलीत ६, मालवणला ५, कुडाळ व वेंगुर्ल्यात ४ तर वैभववाडीत २ विहिरींचा समावेश आहे.

         जानेवारी, मार्च, मे व ऑक्टोबर असे वर्षातून चारवेळा या निरीक्षण विहिरींच्या माध्यमातून भूजल सर्वेक्षण केले जाते. भूगर्भातील पाण्याची पातळी समजण्यास त्यामुळे मदत होते व पाण्याचे नियोजन करणे शक्य होते. जानेवारी २०२४ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणाची आकडेवारी समोर आली असून पाणी पातळी ५.४६ मीटरपर्यंत खाली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

     पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून ते जमिनीत जिरवून पाणी पातळी वाढविण्यासाठी जि.प.लघु पाटबंधारे विभागामार्फत दरवर्षी कच्चे व वनराई बंधारे बांधले जातात. यावर्षी ६२०० बंधा-­यांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. यापैकी १३ फेब्रुवारीपर्यंत ३११८ बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. तर काही ठिकाणी बंधारे बांधणीचे काम सुरू आहे. आता बंधारे बांधण्यासाठी प्रयत्न होत असले तरी अनेक ठिकाणचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे उद्दिष्ट साध्य करताना दमछाक होणार आहे. हे बंधारे लोक सहभागातून असल्याने ते बांधण्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे चित्र आहे. काही वर्षांपूर्वी शासनाकडून बंधारे बांधण्यासाठी पैसे दिले जात होते. तेव्हा हेच उद्दिष्ट १०० टक्क्यांपेक्षाही जास्त पूर्ण केले जात होते. आता मात्र, फेब्रुवारी संपत आला, तरी केवळ ५० टक्केच बंधारे पूर्ण झाले असल्याने याबाबत उदासिनता असल्याचे दिसून येत आहे. मात्र, याचा फटका भूगर्भातील पाणी पातळीला बसला आहे.

      पाणी टंचाईवर मात करण्यासाठी काही वर्षांपूर्वी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत उन्हाळ्यात शेवटच्या टप्प्यात संभाव्य पाणी टंचाई लक्षात घेऊन पाणी टंचाई आराखडे तयार केले जात होते. यामुळे टंचाईच्या ठिकाणी पाण्याची सोय उपलब्ध करून देण्यासाठी शासन स्तरावरून प्रयत्न केले जात होते. मात्र, आता ही पद्धत बंद करण्यात आली आहे.

      यावर्षी पाणी पातळी खालावल्याने पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी आतापासूनच पाणी वापराचे योग्य नियोजन करावे. पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन वरिष्ठ भू वैज्ञानिक प्रशांत पोळ यांनी केले आहे. 

Leave a Reply

Close Menu