मुक्तांगणचा वार्षिक पारितोषिक वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम 31 मार्च रोजी संपन्न झाले. यावेळी विद्यार्थीप्रिय शिक्षक विनय सौदागर, सौ.सौदागर, ॲड.देवदत्त परुळेकर, प्रा.महेश बोवलेकर, मंगल परूळेकर, सेवानिवृत्त केंद्रप्रमुख कैवल्य पवार यांच्या हस्ते मुलांना पारितोषिके देण्यात आली. बालवयात आनंदाचे, प्रेमाचे, श्रध्देचे, समतेचे आणि माणुसकीचे संस्कार व्हावे लागतात आणि सुरांची जादू मेंदूच्या वाढीसाठी विलक्षण जादूई असते, ती देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आम्ही शिकवत नाही, शिकतो असे मत मुक्तांगणच्या संचालिका मंगल परूळेकर यांनी केले.
सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरूवात रद्दीपासून वेशभूषा या उपक्रमांतर्गत दर्शा नवार, राघव बांदवलकर, यशस्वी परब, काव्या परब, अद्वैत परब, शौर्या धुरी, रेयांश गायकवाड व आराध्या बोवलेकर यांनी कला सादर केली. डॉ. तनिशा धुरी यांनी गणेश वंदना केली. शेतकरी नृत्य, कोळी नृत्य व मुलांच्या भावविश्वातील विविध प्राणी, समाजातील घटक, निसर्गाची किमया दाखवत बालचमूने धमाल आणली. मुक्तांगण महिला मंचातील पालकांनी केलेल्या विठोबा-रखुमाईसह संतांच्या केलेल्या वेशभुषेतून वारकरी नृत्य, श्यामच्या आईला वंदन म्हणून श्यामच्या जीवनातील दोन प्रसंग भुतदया, साक्षी परब, श्लोक परब आणि सानवी परब या माय लेकरांनी तसेच आरती बांदवलकर आणि राघव बांदवलकर यांनी मुकी फुले हा प्रसंग सादर केला. ‘देव एकच आहे, या विश्वावर प्रेम करा‘ हा संदेश रेयांश गायकवाड, श्लोक परब, युवराज पाटोळे, महेंद्र रेडकर, जन्मय मसुरकर आणि अद्वैत परब, परी पटेल, दक्षा नवार यांनी दिला.
‘शिक्षण मुलांचे, सहभाग पालकांचा‘ उपक्रमातंर्गत सुजाण पालक केंद्रातर्फे शेतकरी नृत्य सादर केले. जागृती शेटये, नुतन दाभोलकर, भारती बांदवलकर, डॉ.स्नेहा नवार, डॉ.तनिशा धुरी, साक्षी परब, श्रध्दा बोवलेकर, तेजल तारी यांचा नृत्यातील सहज सहभाग प्रेक्षणीय ठरला. नुतन दाभोलकर यांनी सादर केलेले कोळीनृत्य विशेष लक्षणीय ठरले.
मुक्तांगण महिला मंचातील संजना तेंडोलकर (विठोबा), रूपा शिरसाट- (रुक्मीणी), माधवी मातोंडकर (संत तुकोबा), दिव्या आजगांवकर (संत सावतामाळी), दिपा वाडेकर (संत कबीर), स्वाती बांदेकर (संत नामदेव), मंजिरी केळजी (संत जनाबाई), वारकरी महिला निलम रेडकर, माहेश्वरी गवंडे, साक्षी वेंगुर्लेकर यांनी वारकरी नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. याच महिलांनी मुलांसाठी ‘नाचरे मोरा‘ हे बालगीतही सादर केले.
सुजाण पालक केंद्रातर्फे गौरी खानोलकर, साक्षी परब, तेजल तारी, सुप्रिया राऊत यांनी सुरेल आवाजात स्वागतगीत सादर केले. प्रा.वसंतराव पाटोळे व राजश्री गायकवाड यांनी मुक्तांगण मुलांचे आहेच, पण ते पालकांचेही आहे. मुक्तांगणतर्फे राबविण्यात येणारे प्रकल्प, उपक्रम हे कुठेही दिसून येत नाही. दिवसेंदिवस आव्हानात्मक होणारे पालकत्व पेलताना पालक असण्यातला आनंद इथे अनुभवता आला अशा भावना व्यक्त केल्या.
हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता मुक्तांगणच्या सहशिक्षिका निलांगी करंगुटकर, गौरी माईणकर, प्रिती राऊत यांनी विशेष परीश्रम घेतले. वेशभूषा आणि रंगमंच व्यवस्थेसाठी गणेश माईणकर यांचे सहकार्य लाभले. नृत्यदिग्दर्शन ओंकार तुळसकर, रिया केरकर आणि मंगल परूळेकर यांनी केले. हार्मोनियम सुशिल नरसुले व तबला पिंट्या वेतुरकर, लाईट लुईस फर्नांडस आणि साऊंड सिस्टीमचे काम भानू मांजरेकर यांनी केले. दिव्या आजगांवकर यांनी आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक, शिक्षण संस्था, सामाजिक कार्यकर्ते, संस्था यांचे संदेश आले होते. वेंगुर्ला तालुका व जिल्ह्यातील अनेक संस्थांचे मान्यवर उपस्थित होते. सामाजिक कार्यकर्ते अभि वेंगुर्लेकर व लता वेंगुर्लेकर यांनी मुक्तांगणला शुभेच्छा देवून विशेष कौतुक केले.