कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाची अविभाज्य घटक म्हणून स्वीकारली तर भावी पिढीला एकमेकांबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा अशी शाश्वत मूल्ये जपण्यास अत्यंत महत्त्वाची बनेल असे प्रतिपादन चेतना महिला विकास केंद्राच्या संस्थापक अॅड.असुंता पारधे यांनी वेंगुर्ला येथे केले.
१५ मे हा आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन म्हणून जगभर साजरा केला जातो. या निमित्त वेंगुर्ला येथील चेतना महिला विकास केंद्रातर्फे विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमात बोलताना अॅड.असुंता पारधे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी चेतना महिला विकास केंद्राच्यावतीने विवाहाची रौप्य महोत्सवी वाटचाल करणा-या जोडप्यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन जोडप्यांचा तसेच वैवाहिक जीवनाची ६५ वर्षे पूर्ण केलेल्या दोन कुटुंबांचा विशेष सत्कार करण्यात आला. या दोन्ही जोडप्यांनी आपल्या कौटुंबिक सहजीवनातील काही प्रसंग उपस्थितांसमोर कथन केले. श्री.रगजी म्हणाले की, त्यावेळी संसार करणे म्हणजे स्वतःबरोबर आपल्या भावंडांच्या मुलाबाळांच्या सुद्धा जबाबदार स्विकारून त्या पार पाडाव्या लागत होत्या. विमल शारबिद्रे यांनी आपण ६५ वर्षाच्या सहजीवनात कधी भांडण न करता ३० रूपयांत संसाराला सुरूवात करून आजच्या घडीला त्यांनी पतवंडासहीत आपले कुटुंब मार्गी लावल्याचे सांगितले. श्री.रगजी व सौ.शारबिद्रे यांनी सांगितलेल्या अनुभवाने उपस्थितांचे डोळे पाणावले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती इजाबेल नेल्सन डिसोजा यांनी केले.