बाळा फेोंडके!

        फोंडाघाट, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील शहरीकरणाकडे झुकलेले गांव. या गावची लोकसंख्या साधारणपणे 15 हजाराच्या आसपास. सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं व कोकण व घाटमाथा यांना दाजीपूरच्या खिंडीत जोडणारं गांव. या गावाच्या माध्यातूनच उगम पावलेली व पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारी उगवाई नदी. गावच्या चारही बाजूला असणारे सह्याद्री पर्वत अन त्यातून पावसाळ्यात वाहणारे पांढरे शुभ्र मनमोहक पाण्याचे झरे की जे पावसाळ्यात पर्यटकांचे मन आनंदून टाकतात. गावची बाजारपेठ ब्रिटिशकालीन कालावधीपासून प्रसिद्ध असलेली. सध्याचा मुंबई कोकण गोवा महामार्ग अस्तित्वात येण्याअगोदर याचं फ़ोडाघाट मधून कोकण ते मुंबई अशी रस्त्याने वाहतूक होत असे. त्यामुळे या गावच्या बाजारपेठेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या काळी या बाजारपेठेला उतारुंची बाजारपेठ असे संबोधण्यात येत असे. खाण्याच्या पानांचा व्यापार संपूर्ण कोकणात त्या काळी या बाजारपेठेतूनच होत असे. सद्यस्थितीत गावात अनेक शैक्षणिक सुविधा, आरोग्य सुविधा, शेती केंद्र, तांत्रिक प्रशिक्षण केंद्र, कृषी महाविद्यालय अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. गावापासून 5 किलोमीटर अंतरावर कुर्ली घोणसरी येथे कार्यान्वित झालेला देवघर मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे की ज्यामुळे शेती व्यवसाय करणे सुलभ झाले आहे. या प्रकल्पाचे प्रशासकीय कामकाज चालविण्ााऱ्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी कर्मचारी वसाहत उभारण्यात आली आहे. कुर्ली घोणसरी प्रकल्प बाधितांसाठीचे सर्व सोयीने केलेले पुनर्वसन कोल्हापूर कणकवली रस्त्यावर आहे. फेोंडाघाटला अनेक साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक व राजकीय वारसा लाभला आहे. केवळ आजच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्वीच्या संयुक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुद्धा तत्कालीन राजकीय व सामाजिक स्तरावर महत्त्वाचे स्थान होते.

      पूर्वीच्या काळी आजच्या सारखी लोकसंपर्काची साधने नव्हती. सन 1990च्या दशकापूर्वीचा काळ पाहिल्यास देशात अगर परदेशात किंवा राज्य अगर जिल्हा पातळीवर घडणाऱ्या बातम्या केवळ वृत्तपत्रांच्या माध्यमातूनच लोकांपर्यंत पोहचत असतं. त्याकाळी वृत्तपत्रांची संख्याही मर्यादितच होती. आजच्यासारखी प्रगती आणि प्रगल्भता प्रसार माध्यमामध्ये निर्माण झाली नव्हती. माहिती आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर शासकीय दूरदर्शन व विविध भाषेतील खाजगी दूरदर्शन वाहिन्या दिवसेंदिवस निर्माण होताना दिसत आहेत. इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांच्या या गदारोळात प्रिंट मीडिया (वृत्तपत्र माध्यम) मात्र कुठे तरी हरवल्यासारखी दिसत आहेत. असे असले तरीसुद्धा देशातील वृत्तपत्रे आपले स्थान व इमान अबाधित राखत जनतेला बातम्या पुरविण्याचं काम प्रामाणिकपणे करताना दिसत आहेत व याचं सारं श्रेय मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक व सिंधुदुर्ग देवगडचे पोंभुर्ले येथील सुपुत्र कै. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना जाते. त्यांनी मराठी वृत्तपत्र सृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्यामते वृत्तपत्रे ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे की ज्यामुळे देशातील राजकीय सत्ताधाऱ्यांवर व विरोधी पक्षांवर अंकुश ठेवण्याचे काम लोककल्याणकारी माध्यमातून वृत्तपत्रे करत असतात. म्हणून वृतपत्रे जीवंत ठेवणे काळाची गरज आहे.

      फेोंडाघाटमध्ये साधारणतः 70च्या दशकापासून वृत्तपत्र विक्री व्यवसायाची सुरुवात झाली. 70च्या दशकात फेोंडाघाटमधील शिक्षणतज्ज्ञ कै. बाबासाहेब नाडकर्णी यांनी प्रथमतः वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू करून त्याकाळच्या फेोंडाघाटवासीय वृत्तपत्र वाचकांच्या वाचनाची सोय केली. मला आठवतं त्यावेळी दै. केसरी, दै. तरुण भारत पुणे, दै नवशक्ती, तसेच टाइम्स ऑफ इंडिया, बिझनेस टाइम्स यासारखी वृत्तपत्रे त्यांच्याकडे मिळत असतं. आजघडीस दै. तरुण भारत संवाद, दै. पुढारी, सकाळ, लोकमत, कोकणसाद, प्रहार यांसारखी अनेक वृत्तपत्रे फेोंडाघाटमध्ये उपलब्ध असतात. त्यांच्या पश्‍चात त्यांचे सुपूत्र पत्रकार कुमार नाडकर्णी हे सुद्धा हा व्यवसाय सांभाळताना दिसतात. सन 1969मध्ये कै. बाबासाहेब नाडकर्णी यांच्या दुकानात वृत्तपत्र विक्रीसाठी सहाय्यक म्हणून फेोंडाघाटमधील तत्कालीन तरुण अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असलेला सूर्यकांत रामचंद्र उर्फ बाळा फेोंडके काम करू लागला. बाळा पूर्वीची अकरावी पास झालेला विद्यार्थी परंतु अत्यंत गरीब, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असल्यामुळे त्याला ही नोकरी करणे गरजेचे होते. बाळा अत्यंत मितभाषी, हळुवार बोलणारा, आपण व आपलं काम भलं, आपल्या कामाप्रति श्रद्धा बाळगणारा अशा स्वभावाचा. बाबासाहेब नाडकर्णी अत्यंत कडक शिस्तीचे परंतु प्रेमळ होते. त्यांची बाळाच्या प्रामाणिकपणावर मर्जी होती. त्यामुळे ते बाळाला सांभाळून घेत. बाळा मुळातच हुशार असल्याने वृत्तपत्र विक्री व्यवसायातील अनेक बारकावे त्याने दुकानात काम करताना न्याहाळले होते व आपणही स्वतंत्र वृत्तपत्र व्यवसाय करावा अशी इच्छा तो बाळगून होता. त्याने सन 1969 ते 1973 या कालावधीत वृत्तपत्र विक्रीचे काम नाडकर्णी यांच्या दुकानात केले व त्यानंतर त्याने सन 1973 मध्ये स्वतःची फेोंडके वृत्तपत्र एजन्सी चालू केली ती आजतागायत.

      बाळाचा जन्म सन 1952 मधील. बाळा आज 73 वर्षांचा आहे. सन 1990पासून या व्यवसायात त्याची पत्नी त्याला मदत करते. फक्त दुर्दैव असे की बाळाला एकही मूल नाही. ही खंत त्याच्या बोलण्यातून व्यक्त होताना दिसते. त्याला त्याच्या वृद्धापकाळात कोणातरी मानसिक व शारीरिक आधाराची गरज असताना तीच त्याची बाजू नेमकी कमकुवत असल्याचे त्याच्या बोलण्यातून जाणवते.

      फेोंडाघाटसारख्या मोठ्या गावात बाळा व त्याची पत्नी साधारणतः दरदिवशी 250 ते 300 वृत्तपत्रांची विक्री करतात. ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची पर्वा न करता हे दांपत्य घरोघरी पायी जात अगदी वेळेत वृत्तपत्र वाचकांना पुरविण्याचे काम करतात. बाळा आज 73 वर्षांचा असूनही तो पायी चालत वृतपत्र विक्री करताना दिसतो. त्याची ही इच्छाशक्ती आजच्या तरुणाईला निश्‍चितच लाजवणारी आहे. कारण आजची तरुणाई अर्धा किलोमीटर सुद्धा पायी न चालता मोटरसायकलचा वापर करताना दिसून येते. त्याला मी बोलतं केलं असता तो म्हणतो की या व्यवसायात मला आर्थिक प्राप्ती अत्यंत अल्प आहे. परंतु दररोज सकाळी लोकांना वृत्तपत्र देऊन त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मला नेहमीच ऊर्जा व समाधान मिळते. म्हणून मला हा व्यवसाय आवडतो. लोकांच्या वाचनाची आवड जोपसण्याचे काम करताना त्याला मनापासून आनंद होताना दिसतो. बाळा आज वयोपरत्वे हळू हळू चालत दोन हातात वृत्तपत्रांच्या दोन पिशव्या सांभाळत पेपर विक्री करताना दिसतो, तर त्याची पत्नी अत्यंत चपळपणे घरोघरी जाऊन पेपर विक्री करताना दिसते. बाळाला काही वर्षांपूर्वी दुर्दैवाने फिट येण्याचा आजार झाला होता. तो पेपर विकताना अनेक वेळ रस्त्यात फिट येऊन पडलेला मी पाहिला आहे. काहीवेळा त्याच्या तोंडातून फेसही येत असे. परंतु योग्य उपचारांती तो आजार त्याचा बरा झाला. परंतु काही वेळा कधी तरी हा आजार डोकं वर काढतो. परंतु पूर्वीएवढा त्रास होत नसल्याचे बाळा म्हणतो. बाळा आज 73 वर्षांचा असूनही हात पाय चालतात तोपर्यंत काम करत आहे. परंतु भविष्यात हातपाय थकले की पुढे काय? हा प्रश्‍न त्याच्या समोर आ वाचून निर्माण झाल्याचे दिसते. एकतर त्याला स्वतःचे आधाराला मुलबाळ नाही. त्यामुळे भविष्याची चिंता त्याला त्याच्या बोलण्यातून सतावताना दिसते.

      शासनाने अशा आयुष्यभर जनहित जोपसणाऱ्या व वार्धक्याकडे झुकलेल्या लोकांना मानवतेच्या भावनेतून शासकीय पातळीवर काही मदत करता येईल का हे पाहणे गरजेचे आहे. शासन जसं राज्यातील इतर कलावंताना त्यांच्या वृद्धाकाळाची सोय म्हणून काही ठराविक मानधन दर महिना देतं त्याच पद्धतीने अशा लोकांची सेवा करणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायीकांना त्यांच्या वृद्धापकाळात काही मदत करावी अशी अपेक्षा बाळा व्यक्त करताना दिसतो. शासनाने व प्रशासनाने याबाबत सहानुभूतीपूर्वक मानवतेतून विचार करावा असं या माध्यमातून व्यक्त व्हावंस वाटतं म्हणून हा लिखाण प्रपंच.

– संजय तांबे, फेोंडाघाट 9420261888

Leave a Reply

Close Menu