वेंगुर्ल्यात ‘पाणीबाणी‘ वर मात…!

           यंदा कोकणासह संपूर्ण महाराष्ट्र भारतभर उन्हाळ्याच्या झळा तीव्रतेने जाणवल्या. यावर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, सावंतवाडी, कुडाळ या शहरात पाणीटंचाई शासनाच्या अपु­या राहिलेल्या जलजीवन मिशन सारख्या महत्त्वाकांक्षी योजना, पाणी टंचाईमुळे होणारे नागरिकांचे हाल, तोकड्या उपाय योजना अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या. नागरिकांना पाण्याची मुबलक उपलब्धता हा राजकारणाचा विषय असू नये योग्य दिशेने सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे वेंगुर्ला शहराने पाणीटंचाईवर मात करत टँकर मुक्त वेंगुर्ला हे स्वप्न सत्यात उतरवले.

          मोठ्या प्रमाणावर पाऊस पडून आणि निशाण तलावासारखे धरण असूनही मार्च-एप्रिल-मे महिन्यात वेंगुर्ला शहरवासीयांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागायचे. पाण्याच्या भटकंतीची शोकांतिका वृत्तपत्रातून मांडली जायची. भरीस भर अगदी जानेवारी महिन्यापासूनच एक दिवस आड सुरू झालेले नळपाणी योजनेचे पाणी मार्च-एप्रिल महिन्यांपर्यंत दोन ते तीन दिवस आड पुरविले जायचे. त्यात काही ठिकाणी तर उंचसखल भागामुळे पाणी पुरवठा टँकरने करावा लागायचा. असे हे भीषण पाणीबाणीचे चित्र आता पालटले आहे. अर्थातच ही सुखावह जादू एका रात्री झालेली नाही. दीर्घकाळ यावर काम सुरु असले तरी माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप आणि त्यांच्या सहका­यांनी प्राधान्याने लक्ष घालून नेमके पाणी मुरते कुठे यावर अभ्यास करीत मार्ग काढला.

         दुष्काळाची तीव्रता नैसर्गिक आपत्ती जरुर आहे. परंतु, त्याला आपली नियोजनशुन्यता तेव्हढीच जबाबदार आहे. खरेतर पावसाचे पाणी साठविणे आणि जिरविणे यासाठी ४० वर्षांपूर्वी वसंतदादा पाटील यांनी पाणी अडवा -पाणी जिरवाअसा संदेश देऊन मोहिम राबविली होती. माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी हरित महाराष्ट्र आणि अन्नधान्य स्वयंपूर्ण होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न केले होते. एवढेच कशाला १०० वर्षापूर्वी राजर्षी शाहू महाराजांनी शेती, उद्योग, पाणी साठविण्याच्या योजना यासाठी केलेले ऐतिहासिक काम आजही मार्गदर्शक ठरणारे आहे.

     कोकणातील मंडळी म्हणतात, आपल्याकडे दुष्काळ कुठे आहे? तो तर मराठवाडा, विदर्भात आहे. आम्हाला काय त्याचे? पण दुष्काळाचे चटके कोकणवासीयांना देखील अप्रत्यक्ष भोगावे लागतातच. आपल्या दैनंदिन जीवनात येणा­या भाज्या, कांदे, बटाटे, इतर किराणा माल यासारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती अवास्तव वाढलेल्या आहेत. कोकण व्यतिरिक्त भागात निर्माण झालेल्या ओल्या किवा सुक्या दुष्काळामुळे भाजांच्या उत्पादनात प्रचंड तुटनिर्माण होते. अपु­या होणा­या भाजांच्या किमती गगनाला भिडू लागतात. महागाई हा जसा काही दलालांच्या स्वार्थाचा परिणाम आहे. तसा तो उत्पदनात घट होणे याचाही परिणाम आहे. याची जाणीव ठेऊन पाण्याचा थेंब थेंब किती महत्त्वाचा आहे हे आपल्या लक्षात येईल. आजही सावंतवाडी, ओरोस, देवगड, कुडाळ या तालुक्यांमधून जल नियोजनाच्या योजना अपु­या राहिल्यामुळे येथील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यामध्ये गटबाजीचे राजकारण, प्रशासकीय दिरंगाई अशी कारणे सांगितली जातात. पाण्यासारख्या मुलभूत प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करीत  राजकारण बाजूला ठेऊन वेंगुर्ला शहर टंचाई मुक्त करायचे हा निर्धार सन २०१६च्या नगरपरिषद कौन्सिलने केला. त्यामुळे आज वेंगुर्ला शहराला निशाण तलावातून दररोज पाणी पुरवठा होत आहे. हे एक आदर्श उदाहरण सर्वांसमोर आहे.

      पूर्वी वेंगुर्ल्यात भीषण दुष्काळाची स्थिती जरी निर्माण  झाली नसली तरी जोराचा पाऊस पडल्यानंतर काही भागांमध्ये निर्माण होणा­या पाणी टंचाईचे हाल विसरले जायचे. २०१६ मध्ये एप्रिल-मे महिन्यात शहरात टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी राजकीय पुढारी आणि सामाजिक संस्थांमध्ये चढाओढ निर्माण झाली होती. २०१७ ते २०१९ या कालावधीत दरवर्षी प्रमाणे नगरपरिषदेतर्फे देण्यात आलेल्या अनुदानातून, लोकसहभागातून सुंदरभाटले व राऊळवाडा येथे कच्चे बंधारे घालण्यात आले. तर लघुपाटबंधारे तर्फे भटवाडी येथे कायमस्वरुपी बंधारा बांधण्यात आला. यामुळे विहिरींच्या पाणी साठ्यात वाढ झाली तरी मे २०१९ पर्यंत भूगर्भातील पाणीसाठा कमीच राहिल्याने टंचाईची तीव्रता कमी झाली नव्हती. त्यामुळे जलसंधारणाच्या कामामध्ये सातत्य ठेवण्याचे उद्दिष्ट २०१६ मध्ये निवडून आलेल्या कौन्सिलने कायम ठेवले होते आणि त्यादृष्टीने त्यांची वाटचाल सुरु होती. यासाठी त्यांनी सर्वप्रथम वेंगुर्ल्याची पाणी स्थिती व साठविलेल्या पाण्याद्वारे होणारा पाणी पुरवठा याचा सखोल अभ्यास केला.

      पूर्वी ब्रिटीश काळात वेंगुर्ला शहराला नारायण तलाव तसेच खाजगी विहिरींमधून पाणी पुरवठा होत असे. कालांतराने शहराची व्याप्ती कॅम्प, भटवाडी, वडखोल ते अगदी रामघाटपर्यंत वाढली. या विस्तारीत भागातील नागरिकांना देखील खाजगी विहिरींमार्फत पाणी पुरठवा होत असे. पुढे स्वातंत्र्यकाळात नारायण तलाव देखभालीच्या दृष्टीने दुर्देवाच्या फे­यात अडकल्याने तेथून होणारा पाणी पुरवठा बंद झाला. तोपर्यंत वडखोल येथील भाग शहरात समाविष्ट झाला होता. १९९०च्या सुमारास तत्कालीन प्रशासन, नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या प्रयत्नाने समुद्रसपाटीपासून सुमारे ९०० मिटर उंचावरील डोंगराळ भागात असलेला नैसर्गिक निशाण तलावातून पाणी पुरवठा योजना शहरामध्ये यशस्वीरित्या राबविली गेली. सन २०१०पर्यंत ही सेवा विना अडथळा सुरू होती. कोणतेही व्यवस्थेचे दीर्घकालिन लाभ हवे असतील तर त्यामध्ये काळानुसार बदल, देखभाल, डागडुजी आवश्यक असते.

      निशाण तलावाचे पाणी जलशुद्धीकरण केंद्रावरील टाकीत येऊन गुरूत्वाकर्षण प्रक्रियेद्वारे शहरात सोडले जाते. शहराला पाणी पुरवठा करणा­या टाकीची क्षमता ७ लाख लिटर एवढी असली तरी १९८० सालामध्ये बांधलेल्या या पाण्याच्या टाकीच्या क्षमतेमध्ये २०१७ सालापर्यंत कोणताही बदल अगर क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न झाले नव्हते. १९९० साली ६४ सार्वजनिक नळ जोडण्यांद्वारे पाणी पुरवठा व्हायचा. सन २००४ पासून मिटर लावून घरगुती नळजोडण्यांद्वारे पाणी पुरवठा सुरू झाला. मिळालेल्या माहितीनुसार ६४ कनेक्शनवरून नळ धारकांची संख्या १३५० हून अधिक झाली आहे. ऐन एप्रिल-मे महिन्यात शहरातील पर्यटन, हॉटेल्स, घरोघरी येणारे चाकरमानी यामुळे भरपूर प्रमाणात पाणी पुरवठा उपलब्ध करुन देणे न.प.ला अनिर्वाय होते. ज्यावेळी निशाण तलावातील पाणीसाठा कमी व्हायचा त्यावेळी अग्नीशमन केंद्राजवळील जुनी विहिर, कंपोस्ट डेपोमधील बोअरवेल तसेच इतर खाजगी विहिरींमधून ते टँकरद्वारे शहरात पुरविले जाई.

      दिवाळीपर्यंत परतीचा पाऊस पडून सुद्धा वेंगुर्ला शहराला पाणीपुरवठा का होत नाही किवा पाणीटंचाई का होते? यासाठी एप्रिल २०१७मध्ये पाणी पुरवठा विभाग कर्मचा­यांच्या सहकार्याने नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरसेवक प्रशांत आपटे व साप्ताहिक किरातच्या टीमने सर्वे करीत पाणी टंचाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्टसाप्ताहिक किरातमधून प्रसिद्धही केला होता. त्यावेळी पाणी साठवणूक क्षमता आणि पाणी वितरण व्यवस्था यामध्ये निदर्शनास आलेल्या समस्यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने २०१७ पासून टँकरमुक्त वेंगुर्ल्याचे चित्र दिसू लागले.

      पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन जीर्ण आणि कमकुवत झाली असल्याने फार मोठ्या प्रमाणावर पाणी गळती होऊन पाणी वाया जात असे. यासाठी पाईपलाईन दुरूस्ती हाच एकमेव उपाय होता. पण अन्य तात्पुरता उपाय करण्यापेक्षा भविष्यातही नागरिकांना या समस्येला तोंड द्यावे लागू नये म्हणून पाईपलाईन बदलण्याचे काम नगरपरिषदेने ऐरणीवर घेऊन पूर्ण केले. नगरपरिषदेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पाईपलाईन बदलण्याच्या कामाला नगरविकास महासंचालनालय विभाग मुंबई, जिल्हाधिकारी सिधुदुर्ग यांची मान्यता मिळाली आणि हे काम सुरू झाले. सुमारे ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या ६० टक्के पाईपलाईन बदलण्यात आल्या. त्यामुळे जीर्ण झालेल्या पाईपलाईनमधून वाया जाणारे पाणी बंद झाले. तसेच जुन्या पाईपलाईनवरचे वॉल्व्ह बदलण्यात आल्यामुळे विविध भागात पाणीपुरवठा करण्याचे नियोजन सुरळीत झाले. तसेच वेशी भटवाडी येथील उंच भागात कमी दाबाने नळ पाणी पुरवठा होतो. त्यामुळे तेथे २०१७ पर्यंत टँकरने पाणी पुरवठा करावा लागत असे. यावर उपाय म्हणून १ लाख लिटर पाण्याची टाकी व विहिर आदी कामे मंजूर करुन ती पूर्णत्वासही नेली. हा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित झाल्याने याठिकाणी पाणी टंचाई भासली नाही.

    कॅम्प येथील अग्निशामक केंद्राजवळील २ लाख लिटर पाण्याची टाकी व विहिरी यांचे कामही पूर्ण झाले. नारायण तलावाच्या जवळील असलेल्या विहिरीची खोली वाढविल्याने निमुसगा येथे असणा­या १ लाख लिटर पाण्याची टाकी रोज भरण्यात येऊ लागली. गाडीअड्डा येथील ५० हजार लिटर पाण्याच्या टाकीजवळ नविन विधन विहिर (बोअरवेल) खोदून या बोअरवेलचे पाणी त्या टाकीत भरण्यात येऊ लागले. जलशुद्धीकरण केंद्रा जवळील पाण्याच्या टाकीची क्षमता ७ लाख लिटर एवढी आहे. न.प.च्या प्रयत्नांनी इतर तीन  टाक्यांचे बांधकाम पूर्ण झाल्याने पाणी साठवणूक क्षमता १०.५ लाख लिटर एवढी वाढली. मार्च ते मे या पाणी टंचाईच्या कालावधीत उपलब्ध पाणी साठ्याचे नियोजन करुन ते सर्वांना समान पाणीपुरवठा करत असतानाही न.प.ला थकबाकीदार व चोरून पाणी वापरणा­यांपासून बराच त्रास होत होता. याचा सर्व्हे करुन संबंधितांना याची कल्पना देऊन नाईलाजास्तव न.प.ने काही कनेक्शने २०२० मध्ये कायमची बंद केली आहेत.

      या सर्व उपायांबरोबरच शहर कायमचे पाणी टंचाई मुक्त करण्यासाठी निशाण तलाव धरणाची उंची वाढविणे आवश्यक असल्याने सप्टेंबर २०१९ मध्ये धरणाची उंची अडीच मिटरने वाढवण्याचा कार्यारंभ आदेश मिळवण्यात न.प.ला यश मिळाले. त्यामुळे प्रति माणशी किमान ७० लिटर पाणी देणे बंधनकारक असलेल्या न.प.ला भविष्यात १३५ लिटर प्रति माणशी पाणी देण्याचा मानस आहे.हे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिंधुदुर्गनगरी यांच्यावतीने पूर्ण करण्यात आले. पुढील २५ ते ३० वर्षांचे नियोजन करुन नगरपरिषदेने उपाययोजना केल्या असल्या तरी नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे. न.प.पुरवत असलेले पाणी त्यावर शुद्धीकरण प्रक्रिया करुन नळाद्वारे लोकांच्या घरापर्यंत येते. या पाण्याचा झाडांना शिंपण्यासाठी, गाड्या धुण्यासाठी वापर अपेक्षित नाही. लोक सहभागातून मोठ्या प्रमाणावर पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी अडवून जमिनीखाली पाण्याची पातळी वाढविण्याच्या दृष्टीने सामाजिक संस्था व शासन यांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. असे न केल्यास वाढती लोकसंख्या व शहरीकरण यामुळे २५ ते ३० वर्षानंतर पुन्हा टँकरयुक्त वेंगुर्ला दिसण्यास वेळ लागणार नाही. याचबरोबर ब्रिटीशकालीन नारायण तलावाचे पुनरूज्जीवन होण्यासाठी शासनस्तरावर योग्य पाठपुरावा होणे गरजेचे आहे.

    वेंगुर्ला पाणी पुरवठा योजना अव्याहतपणे सेवेत रहाण्यासाठी योग्य वेळी देखभाल दुरुस्ती होणे तेवढेच गरजेचे आहे. तात्पुरत्या उपाय योजनांवर भर न देता उन्हाळ्यातील भीषण पाणीबाणीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी पाणी पुरवठ्याची सद्यस्थिती सुधारण्यासाठी न.प.ने केलेले काम शहरवासीयांसाठी अभिमानास्पद आणि दीर्घकाळ दिलासा देणारे ठरले आहे.                                                                   – सीमा मराठे, ९६८९९०२३६७

 

 

Leave a Reply

Close Menu