यावर्षीची लोकसभा निवडणूक सर्वांनाच धडा शिकविणारी!

     लोकसभा निवडणुकीच्या आधी मोठा गाजावाजा करत भाजपने केलेला चारसो पारचा नारा निवडणूक निकालानंतर फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. एवढेच नव्हेतर भाजपाला या निवडणुकीत स्पष्टबहुमतापासूनही दूर रहावे लागले आहे. निकाल लागल्यानंतर एक गोष्ट स्पष्ट झाली की, भाजपा काही ४०० पार जात नाहीत. किबहुना त्यांना सत्ता स्थापन करण्यासाठी २७२ चा आकडाही गाठता आला नाही. आता सत्ता स्थापनेसाठी त्यांना मित्रपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. वास्तविक मोदी ४०० पार जाणार नव्हतेच, ज्याला थोडेफार राजकारण कळते तो सुद्धा हे सांगू शकत होता. फक्त मोदींच्या भक्त मंडळींना तसे  वाटत होते.

      २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एनडीएम्हणून निवडणुकीला सामोरे गेली होती. पण निकालांनंतर आपल्या पक्षाला एकहाती बहुमत मिळाल्याचे समजल्यानंतर मोदींची आणि भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्त्वाची सहयोगी पक्षांशी वागण्याची पद्धत लगेच बदलली होती. त्याकाळी मोदींनी जेव्हा संसद भवनात प्रवेश केला होता आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वगैरे आले होते. त्याचदिवशी दुपारी एनडीएतील सर्व मित्रपक्षांसोबत त्यांची बैठक होणार होती. या बैठकीत खातेवाटप वगैरे निश्चित होणार होते, पण ही बैठक त्या दिवशी झालीच नाही. बैठक पुढे ढकलण्यात आली असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले. या बैठकीसाठी एनडीएतील सर्व घटक पक्षांचे नेते दिल्लीला गेले होते. अगदी शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सुद्धा. आपल्याच पक्षाला बहुमत मिळाल्याचे समजल्यानंतर पुढे ही बैठक झालीच नाही आणि मग थेट खातेवाटप वगैरे झाले होते. आज बरोबर दहा वर्षांनी मात्र हे चित्र पालटले आहे. नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांना विश्वासात घेतल्याशिवाय सत्ता स्थापन करताच येणार नाही, हा नियतीचा न्याय आहे. त्याचसोबत एक वर्तुळ पूर्ण झाले आहे.

      खरंतर आज जो काही निकाल लागला, तो एनडीएआणि इंडियाया दोघांनाही धडा शिकवणारा आहे. कारण सत्ता मिळाल्याचा आनंद एनडीएतील प्रमुख भाजपा साजरा करू शकत नाही आणि जागा वाढल्या तरी त्यातून सत्तेपर्यंत जाणे आणि ती टिकवणे काँग्रेससाठीही अवघडच आहे. त्यामुळे त्यांना तूर्त तरी विरोधातच बसायला लागेल, असे दिसते. आज जो निकाल लागला, तो निश्चितच आश्चर्यकारक नाही. कोणत्याही सामान्य माणसाला डोळ्यासमोर दिसते आहे ते भाजपाच्या चाणाक्ष नेतृत्त्वाला कसे काय दिसले नाही, हाच खरा प्रश्न आहे. ज्या सोशल मीडियाच्या आधारावर नरेंद्र मोदी २०१४ मध्ये निवडून आले होते, त्या सोशल मीडियावर या निवडणुकीत भाजपाच्या नेत्यांनी टाकलेल्या पोस्टवर लोकांनी दिलेल्या कमेंट्स सहज बघितल्या तरी त्यांचा राग जाणवत होता. लोक अत्यंत मुद्देसूदपणे भाजपाच्या नेत्यांना झोडपत होते. दुसरीकडे फक्त नरेंद्र मोदी सोडले, तर भाजपा पक्षाची म्हणून जी हँडल्स होती, त्यावरची एंगेजमेंट बेक्कार पडली होती. सहज म्हणून भाजपा महाराष्ट्राचे हँडल बघा. एकट्या सोशल मीडियाच्या साह्याने कोणीही निवडणूक जिंकू शकत नाही, हे जरी सत्य असले, तरी लोकांच्या मनात काय आहे, हे समजून घेण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होतो. भाजपाच्या तंत्रकुशल नेत्यांनी हे सगळे का हेरले नाही, याचे आश्चर्य वाटते. मोदी-शहांनी सांगितले ४०० पार की आपण ४०० पार जाणार, इतके सोप्पे भारतातले राजकारण नाही. पण एकदा वरून आदेश आले की तेवढे पाळायचे, आपले डोके वापरायचेच नाही, असे ठरवले तर मग यापेक्षा वेगळा निकाल येणार नाही हे निश्चित.

      दुसरे म्हणजे संविधान किवा राज्यघटना बदलणार ही काँग्रेसने काढलेली टूम निवडणुकीत चालणार हे समजायला हवे होते. त्यावर आक्रमकपणे उत्तर द्यायला हवे होते. काँग्रेसच्या काळात सर्वाधिकवेळा कसे संविधान बदलले गेले, राज नारायण विरुद्ध स्टेट ऑफ उत्तर प्रदेश ही केस काय होती, त्यावेळी अलाहाबाद उच्च न्यायालायने निकाल काय दिला होता, ४२ वी घटना दुरूस्ती काय होती, ही घटना दुरूस्ती करून घटना आपल्याला हवी तशी बदलण्याचे अनियंत्रित अधिकार कसे इंदिरा गांधी यांच्या सरकारने संसदेकडे घेतले होते, केशवानंद भारती प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश नेमताना केवळ आपल्या विरोधात निकाल दिला, म्हणून सरन्यायाधीश निवडताना सेवाज्येष्ठता कशी नाकारण्यात आली होती. या सगळ्याची खडा न खडा माहिती लोकांपर्यंत पोहोचवायला हवी होती. सभांमधून, सोशल मीडियामधून यावर कारपेट बॉम्बिंग करायला हवे होते. पण कायम हवेत असलेल्या आणि आम्हीच तेवढे शहाणे समजणा­या भाजपाच्या नेत्यांना या नॅरेटिव्हचा किती मोठा फटका बसू शकतो, याची जाणीवच झाली नाही. कोणी काहीही बोलू दे आमच्याकडे मोदी आहेत. त्यांचा फोटो दाखवून आम्ही जिंकू शकतो, अशा अविर्भावात गेलेल्या भाजपाच्या नेत्यांना संविधान बदलाच्या नॅरेटिव्हचा किती मोठा फटका बसू शकतो, हे आजच्या निकालावरून भाजपाला  समजले असेल.

    विरोधक कोणीही असू दे, त्याला कधीही कमी समजू नये, असा सार्वकालिक नियम आहे. तो भाजपाच्या नेत्यांनी समजून घेतला असता तरी फरक पडला असता. पण यापुढेही काँग्रेस किस झाड की पत्तीअसेच समजून भाजपाची वाटचाल सुरू राहण्याची शक्यता जास्त आहे.

      राहिला मुद्दा महाराष्ट्राचा. महाराष्ट्रातील निकालही अनपेक्षित अजिबात नाहीत. लोकांशी बोलताना पक्ष फाटाफुटीबद्दल त्यांच्या मनात राग असल्याचे जाणवत होते. आयुष्यभर कमळाला मत देणा­यांना यावेळी मोदींसाठी घड्याळाला मत द्या सांगणे किती महागात पडते, हेच आज दिसून आले. राजकारण करताना तुम्ही चौकट ओलांडली असली तरी सामान्य मध्यमवर्गीय मतदार आजही कोणतीही कृती करण्यापूर्वी आपण काय करतोय, याचा विचार करतो, हेच या निकालातून दिसून आले. त्यावरही व्होकल व्होटर काय २.५ टक्के असतात. सायलेंट व्होटर आमच्याच बाजूने आहेत, असे भाजपाचे नेते सांगत होते. आज महाराष्ट्रातील निकालांवरून त्याच सायलेंट व्होटरनी भाजपाला सायलेंट मोडवर नेले आहे, एवढे मात्र भाजपने विसरू नये.

      रत्नागिरी-सिधुदुर्ग मतदार संघाचा विचार केला तर ज्या दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी भाजपाने जाहीर केली त्याच दिवशी भाजपाचा विषय दृष्टीक्षेपात आला होता. राणे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सिधुदुर्ग जिल्ह्यासाठी अमाप असे कार्य केले आहे. त्यामुळे सिधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांना साथ मिळणे अपेक्षितच होते. मात्र, ज्या रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, रत्नागिरी व राजापूर या मतदार संघांवर विजयाची भिस्त होती तेथून मात्र राणेंना अपेक्षित साथ मिळाली नाही. एकट्या सिधुदुर्ग जिल्ह्यातून राणेंना लाखाचे मताधिक्य मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित झाला.

      बाकी कोणतीही निवडणुक म्हटली तरी विजय-पराभव होतच असतो. त्यातून शिकून पुढे जायचे असते. फक्त यापुढे त्या बिचा­या ईव्हीएमला तेवढा कोणी दोष देऊ नये, एवढीच विनंती.                                                               विश्वनाथ गरूड, पुणे

 

 

Leave a Reply

Close Menu