रत्नागिरी-सिंधुदुर्गात नारायण राणेंची बाजी

भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांचा 47 हजार 850 मतांनी पराभव केला. चाळीस वर्षांनंतर प्रथमच या मतदारसंघात राणेंच्या विजयाच्या रुपाने कमळ फुलले; परंतु बालेकिल्ला असलेली शिवसेना रत्नागिरी जिल्ह्यात पाय रोऊन असल्याचे निवडणुकीतून स्पष्ट झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मिळालेल्या मताधिक्यानेच राणेंना तारले. त्या जोरावर त्यांनी रत्नागिरीतील राऊत यांच्या मताधिक्यावर मात करीत दणदणीत विजयी मिळवत गुलाल उधळला.

      दि. 4 जूनला सकाळी आठ वाजता एमआयडीसीच्या एफसीआय

 गोदामात पोस्टल मताने मतमोजणी सुरू झाली. रत्नागिरी जिल्ह्यातील पोस्टल मते विनायक राऊत, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोस्टल मते नारायण राणे यांच्या पारड्यात पडली. पहिल्या फेरीने विनायक राऊत यांनी मताधिक्य घेत सुरुवात केली. त्यामुळे पुढे असाच ट्रेंड राहील, अशी अनेकांची अपेक्षा होती; परंतु दुसऱ्या फेरीतच चित्र पालटले. नारायण राणे यांनी 2 हजार 305 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुन्हा विनायक राऊत यांनी तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली. चौथ्या फेरीनंतर नारायण राणे यांनी जे मताधिक्य घेतले ते वाढतच राहिले. सकाळी दहा ते साडेदहाच्या सुमारास नारायण राणे मतमोजणी केंद्रावर हजर झाले.

      सहाव्या फेरीला राणे यांनी 7 हजार 818 मताधिक्य घेतले. त्यानंतर प्रत्येक फेरीला राणे यांना मताधिक्य मिळत गेले. 12 व्या फेरीला तर राणेंनी 23 हजार 450 मतधिक्य घेतले. विशेष म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी या तिन्ही मतदारसंघातून राणेंना घसघशीत मताधिक्य मिळत गेले. अगदी उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्या कुडाळ मतदारसंघात तर विनायक राऊत यांना मोठा धक्का बसला आहे. राणे यांना या मतदारसंघात मोठे मताधिक्य मिळाले आहे. सुमारे लाखाच्या घरात राणेंना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मताधिक्य मिळाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, लांजा-राजापूर आणि रत्नागिरी या तिन्ही विधानसभा मतदारसंघांत मात्र विनायक राऊत यांना मतदारांनी चांगले मताधिक्य दिले आहे. त्यामुळे रत्नागिरीत निष्ठावंत शिवसैनिक अजूनही शिवसेनेच्या बाजूने ठाम असल्याचे दिसते. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून राणेंना चांगले मताधिक्य मिळेल, अशी अपेक्षा होती; परंतु 9678 मताधिक्य महाविकास आघाडीने रत्नागिरीतून घेतले आहे. त्यामुळे महायुती अर्थात उदय सामंत, भाजप येथे कमी पडल्याचे स्पष्ट दिसते. राजापूर विधानसभा मतदारसंघात राऊत यांना सुमारे 30 हजारांच्या दरम्यान मताधिक्याची अपेक्षा होती. तिथेही राणे यांनी चांगली मुसंडी मारत हे मताधिक्य 18 हजारांवर आणले. चिपळूण विधानसभा मतदारसंघात 19 हजार मतांनी विनायक राऊत यांनी आघाडी घेतली.

Leave a Reply

Close Menu