स्पृश्‍यास्पृश्‍यता हा भेदभाव न मानणारा सकल उद्धारक  – श्री देव जैतीर

      वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गाव म्हणजे निसर्गाचं वरदान लाभलेलं गाव. गावाच्या चारी बाजूला सुंदर डोंगर आणि मधून वाहणारी नदी, तसेच विविध झाडा-झुडुपांनी आच्छादलेलं हे गाव. सामाजिक, राजकीय, कला, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रणी असलेल्या या गावाला समृद्ध वारसा आहे तो इथल्या अध्यात्मिक परंपरा आणि संस्कृतीचा. तुळस गावाचा श्री देव जैतीर हे असेच एक अढळ श्रद्धास्थान आहे. तुळस गावचं नव्हे तर दशक्रोशीच्या सीमा ओलांडून श्री देव जैतीराचा किर्तीसुगंध सर्वदूर पसरला आहे. मनुष्ययोनीमध्ये जन्माला येऊनही देवत्वाला पोहोचलेली माणसे दुर्मिळ असतात. नराचा नारायण झालेला आणि स्पृश्‍य अस्पृश्‍यतेच्या शृंखला तोडून अठरापगड जातींना समान लेखणारा व सर्वांना कुशीत घेणारा देव अशी या देवाची ख्याती आहे.                  

      श्री देव जैतीर हे वीरपुरुष होते. आपल्या मुलीस सासरहून माहेरी आणताना भिल्लांशी झालेल्या युद्धात वीरमरण प्राप्त झालेला पराक्रमी पुरूष जैते परब म्हणजेच आदरणीय जैतोबा आपल्या मृत्यूनंतरही आपल्या रयतेचे रक्षण करतो, विशेषतः गावातल्या मुलींचे तो पित्याच्या मायेने संगोपन करतो अशी गावकऱ्यांची नितांत श्रद्धा आहे. वैशाख वद्य अमावस्येच्या दिवशी तुळस येथे भरणाऱ्या महोत्सवी जत्रेत अलोट गर्दी लोटते. केवळ जातीची नव्हे तर धर्माचीही सीमा ओलांडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गोवा, मुंबई, पुणे आणि बृहन्महाराष्ट्रातून दर्शनासाठी भाविकांची झुंबड उडते.शेतीऔजारांची मोठ्या प्रमाणात होणारी खरेदी-विक्रीची उलाढाल हे या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.    

      श्री देव जैतीर यांनी आपल्या पुण्यबळाने व दैवीशक्तीने गावचे सारे देवस्थान आपल्या ताब्यात घेतल्याने श्री देव जैतीर याला तुळस गावचा प्रमुख देव म्हणून स्थान मिळाले आहे. त्यांच्या विचाराने गावचे सारे देवकार्य चालत असते.

कथा नराचा नारायण झालेल्या श्री देव जैतीराची

      गावातील जुन्या वडीलधाऱ्या माणसांच्या आठवणीप्रमाणे तुळस गावात जैते परब या नावाचे एक वजनदार परोपकारी आणि अत्यंत लोकप्रिय असे एक प्रसिद्ध महापुरुष होते. ऐतिहासिक काळाला अनुसरून तर दांडपट्टा खेळणारे व तलवार बहादूर असे शूरवीर होते. त्यामुळे सावंतवाडी संस्थान सरकारने त्यांची एका गडावर किल्लेदार म्हणून नेमणूक केलेली होती. ते देवभक्त होते व त्यांच्या अंगी दैवीशक्ती होती. त्यामुळे गावातील लोकांस भूतपिशाच्यादि बाधा झाल्यास त्याचे निवारण करण्यास त्यांची फार मोठी मदत होतं असे. त्यांना एकुलती एक मुलगी होती व ती वरघाटी दिलेली होती. सुभेदारीवरून येत असता आपल्या मुलीस माहेरी आणावी अशा इराद्याने ते तिच्या सासरी गेले; परंतु बरोबर कुळंबीन नसल्यामुळे मुलीच्या सासरच्या मंडळीने तिला बापाबरोबर एकटी पाठविण्याचे नाकारले. त्यावर ते तुळस मुक्कामी येऊन आपल्या बरोबर गावच्या नागल महार व एक कुळंबीण यांस बरोबर घेतले आणि पुन्हा मुलीच्या सासरी जाण्यास निघाले. वाटेत त्यांची (रांगण्याचा घाट असावा) वीर (भिल्ल)लोकांशी गाठ पडली. बरोबरची कुळंबीण व तिच्या अंगावरचे दागिने पाहून तिला पळवून नेण्यासाठी भिल्लानी त्या तिघांहीजणांना वेढले, त्यामुळे त्या ठिकाणी दोन्ही पक्षाची बरीच चकमक उडाली. या चकमकीत जैतोबानी आपल्या तलवारीने बऱ्याच पुंडास कंठस्नान घातले व आपल्या तिघाही जणांचा बचाव करण्यासाठी त्यांनी शर्थ केली. तलवारी पुढे आपला बचाव लागत नाही असे पाहून भिल्ल लोक रानात पळाले आणि ते झाडाआड लपून तीर कामट्यानी बाण सोडू लागले. बेरडाच्या गनिमी काव्यापुढे जैतोबांचा ईलाज चालेना. अशा परिस्थितीत सोबतच्या कुलंबणीस बाण लागून ती तत्काळ मरण पावली. त्याचवेळी एक बाण जैतोबांच्या मस्तकाला लागल्यामुळे ते घायाळ झाले. त्यांची ती असहाय स्थिती पाहून बेरड लोकांनी गतप्राण कुलंबीणीच्या अंगावरील दागदागिने काढून ते पसार झाले. याउपर नागल महाराने आपल्या धन्याच्या (जैते परब)डोक्यास पट्टी बांधून सावध करून आपल्या पाठीवर घेतले व तो तुळस गावी येण्यास परत फिरला.

      नागल महाराने आपल्या जखमी धन्याला घेऊन पहिला मुक्काम नारूर गावी केला. घडलेली दुःखद घटना लक्षात घेवून नारूर गावाच्या सुद्रीक या आडनावाच्या एक वैश्‍य गृहस्थानी जैतोबांना आपल्या घरी नेऊन त्यांची सुश्रुषा व औषधोपचार केला, परंतु बाणाने झालेली जखम तीव्र असल्याने त्यांचा प्राण वाचविण्याची आशा दुरावली. ही घटना वैशाख वद्य 13 रोजी घडली. त्याचप्रमाणे जैतोबांची पत्नी, नातेवाईक व तुळस गावचे इतर लोक नारूर गावी धावत गेले; परंतु मानवी प्रयत्न निष्फळ ठरून वैशाख वद्य 14 रोजी त्यांचे नारूर येथे देहावसान झाले. त्याच दिवशी त्यांनी सुद्रीक यांच्या अंगात संचार केला आणि आपल्या अंत्यसंस्कार वगैरेबाबत सूचना दिल्या. याच सूचनांप्रमाणे आज नारूर आणि तुळस येथे श्री देव जैतीराचे देवपण चालते असे म्हणतात.

      नारूर येथे गेलेल्या तुळस गावाच्या लोकांनी जैतोबांचे शव वैशाख वद्य 14 रोजी तुळस येथे आणून ते प्रथम गावचे राऊळ यांचे घरी (हल्लीचे देवाचे घर जे 1830 साली बांधल्याचा दाखला मिळतो) आणून उतरले व त्याच घराच्या लगत वरच्या बाजूस त्यांना अग्निसंस्कार देण्यात आला. त्याच ठिकाणी श्री देव जैतीर देवालय बांधण्यात आलेले असून त्याच देवालयात त्यांचे समाधीवर आकेरी काळेथर दगडांच्या प्रभावळीमध्ये कोरलेली सुंदर मूर्ती उभी आहे. या मूर्तीच्या डोक्यावर मुकूट असून एका हातात ढाल व दुसऱ्या हातात तलवार अशी आयुधे आहेत. श्री देवाच्या देवालयाचा सभामंडप विस्तिर्ण असून आतील भागही मोठा आहे. त्यात मुंगसाळ व गाभारा असे दोन भाग आहेत. ते अतिशय सुंदर व प्रशस्त असे आहेत. देवलयासमोर दिपमाळीजवळ नागल महाराचे पाषाण आहे.

श्री देव जैतिर उत्सव

      श्री देव जैतीराच्या समाधीवर मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होऊन भव्य असे देवालय उभे राहिले. नराचा नारायण होताना साऱ्या तुळस गावचे आणि आसमंतातील जनतेचे श्री देव जैतीर अढळ श्रद्धास्थान बनले आणि तदअनुषंगाने पूजा अर्चा इ. नित्यानैमिक विधी सुरु झाले. श्री देव जैतीराचा उत्सव प्रतिवर्षी होतो. या उत्सवानिमित्त श्री देवाचे चंदनी रुपडे (मुखवटा) तयार केलेले असून ते राऊळ घराण्याकडे ठेवलेले असते. श्री देवाचा वार्षिक उत्सव सुरु होण्यापूर्वी हे रुपडे देवाच्या घरी आणून ते तेथील अधिष्ठानावर ठेवले जाते.संपूर्ण उत्सवाच्या अकरा दिवसात त्याची पूजा अर्चा नैवेद्य वगैरे गोष्टी केल्या जातात. संचार होणारा गावकर (पहिला मानकरी परब) हा उत्सवाच्या अकरा दिवस आपल्या घरी न राहता देव घरीच राहतो. तो या काळात व्रतस्थ असतो.

      ज्या दिवशी जैतोबांचे प्राणोत्क्रमण झाले त्या वैशाख वद्य चतुर्दशीपासून श्री देवाचा अकरा दिवस उत्सव चालतो. उत्सवाची सुरवात वैशाख वैद्य दशमीपासून होते. दशमीच्या दिवशी रात्री दिव्याचा कार्यक्रम झाल्यावर जोगिणीचा कार्यक्रम होतो. वद्य चतुर्थी दिवशी भोगिणी हे देवकार्य होते. म्हालटकर बकलातील पहिल्या मानकरी घराण्यातील वडील पुरुषावर श्री देवाचा संचार होतो. भोगिणीच्या दिवशी रात्री देवाच्या घरात गावचे सारे लोक येऊन देवास श्रीफळ ठेवून मानाचा मुजरा देतात व त्यांची प्रार्थना करतात. त्यानंतर ज्याच्यावर देवाचा संचार होतो अशा व्रतस्थ व्यक्तीस दरदिवशी प्रथमतः देवाच्या घरातून नजीकच्या कुळकर देवगृहात जाऊन पोशाख करून यावे लागते. हा पोशाख म्हणजे पंचावर तांबड्या रंगाची तुमान नेसून त्यावर जुन्या रुई फुली रुंद धारीचे धोतर (जोडा) नेसवितात. मग त्यावर कांचा (कपड्याचा कमरपट्टा) बांधून डोक्यावर मराठेशाही तांबड्या रंगाचे पागोटे घालतात व अंगावर मानेवरून दोन्ही खांद्यावर शेला सोडतात. या पोशाखानिशी हातात खंजीर घेतलेली ही व्यक्ती पुन्हा देवघरात प्रवेश करते. स्वगृही आल्यावर पूजेसाठी लावलेल्या रुपड्यासमोर पाटावर बसते व यावेळी सारे मानकरी लोक या व्यक्तीला शेस लावतात. त्यावेळी चांदीची चैन परब घराण्यातील व्यक्ती गळ्यात घालतात. त्याचे डोक्यावर सोन्या-चांदीच्या तुऱ्यानी श्रुंगारलेले श्री देवाचे रुपडे बांधून उजव्या हातात तलवार व डाव्या हातात कुंचा (मोराच्या पिसांचा झुबका) देतात. त्यानंतर ही देवरूपी व्यक्ती सातेरी, रवळनाथ व भूतनाथ यांची तरंगे यासह उत्साही वातावरणात ढोल, ताशा, सनई व शिंगे या नानाविधी वाद्यांचा नादघोषात आणि हर हर महादेवच्या जयघोषात श्री देवरुपी व्यक्ती आपल्या लव्याजम्यासह स्वगृहातून आपल्या मांडावर (श्री देव जैतीर मंदिरच्या समोरची जागा) येते व खेळते. डोक्यावरील रुपडे खाली ठेवावयाचे नसल्यामुळे व  इतर परब मानकऱ्यांना आपल्या मानाप्रमाणे देव खेळावयाचे असल्याने निरनिराळ्या परब घराण्यांतील मानकरी लोक हे रुपडे आपल्या डोकीवर बांधून घेऊन मांडावर खेळवतात. याच दिवशी कातर या नावाचे एक मुख्य देवकार्य केले जाते. हा विधी मनोवेधक आणि चित्तथरारक असा आहे. त्यानंतर परब मानकरी लोकांच्या सुवासिनी स्त्रिया अग्नीच्या निखाऱ्याने आंघोळ करतात (प्रत्यक्षात निखारे असलेली पडली डोकीवर ठेवतात या लगेच झाडून टाकतात), चाळे मारणे (म्हणजे आठ ठिकाणी जमीनीवर तलवार खुपसणे) इ. कार्ये होतात.

      तृतीयेपासून जेष्ठ शुद्ध अष्टमीपर्यंत सहा दिवस हा देव संपूर्ण गावभर ग्रामस्थांचे घरी जाऊन त्यांना दर्शन देतो. अशा प्रत्येक घरी त्याची पूजा अर्चा व नैवेद्य होतो. गाव फिरून आल्यावर रात्रौ देव मांडावर खेळतो, चाळे मारतो व स्वगृही जातो. पाचव्या रात्रीपासून देवपणाला सुरुवात होते. या दिवशी देव बोलतो ते उत्सवाच्या सांगतेपर्यंत अर्थात कवळास उत्सवापर्यंत. त्यानंतर देव वर्षभर बोलत नाही. भाविक जणांची पडस्थळे (तक्रार) ऐकून त्यांना उपाय सूचविणे, भूत पिच्छाच बाधा काढणे व इतर देवकार्य उत्सवादरम्यान सुरु असतात. अशातऱ्हेने अकरा दिवसांचा हा देवाचा वार्षिक आनंद सोहळा असतो.

      या महोत्सव काळात स्पृश्‍यास्पृश्‍यता हा भेदभाव मानला जात नाही हे या  महोत्सवाचेे वैशिष्ट्य आहे. या देवाला सोन्या-चांदीच्या तुऱ्यांचा नवस करतात. या देवाचा संचार फक्त उत्सव काळात होत असतो. बाकी कालावधीत त्याचे मूर्तीस तांदळाचा प्रसाद लाऊन कौल घेतात. इतर देवपण वर्षभर तरंगमार्फत होते असते.

गावाचा मानकरी वर्ग

      तुळस गावची मराठा परब घराणी एक असली तरीही मानापानाच्या दृष्टीने म्हालटकर व बोवलेकर अशी दोन वकले आहेत. म्हालटकर वकलांतील पहिला मानकरी घराण्याकडे पूर्वसत्तेचा पहिला मान असून दुसऱ्या घराण्याकडे राजसत्तेचा  मान चालतो. त्यामुळे गावातील देवस्थानविषयक मूलभूत बाबी या दोन्ही मानकऱ्यांच्या  विचाराने होतात. या परब मानकऱ्या व्यतिरिक्त गावडे, मयेकर, घाडी, राऊळ, गुरव, सावंत, सुतार, मडवळ व महार असे मानकरी वृत्तिक असून तुळस गावात नाबर घराण्यांस  बहुमान दिलेला आहे.

        श्रध्दायुक्त अंत:करणाने अढळ निष्ठने श्री देव जैतीराचे जो स्मरण करतो त्यावर सदा देवाच्या कृपेचा वरदहस्त असतो, असा सकल श्रद्धाळू भाविकांचा अनुभव आहे. अशा थोर व पुण्यशील महापुरुषाच्या पायी नतमस्तक होतो.

संकलन – प्रा. सचिन वासुदेव परुळकर

(सौजन्य : तुळस श्री देव जैतीराश्रीत संस्था यांच्याकडील प्रकाशित साहित्य)

Leave a Reply

Close Menu