वेंगुर्ला मार्केट आता सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरु राहणार असून त्यानंतर प्रशासनाने मार्केट उचलून ती जागा पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात येईल. आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा मार्केट सॅनिटाईज केले जाणार असल्याची नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी बैठकीवेळी दिली.
वेंगुर्ला नगरपरिषद मार्केट व्यवस्थापन व शहरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयात घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, गटनेते सुहास गवंडळकर, प्रकाश डिचोलकर, नगरसेवक विधाता सावंत, तुषार सापळे, धर्मराज कांबळी, पुनम जाधव, वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर-सामंत यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
या बैठकीत दररोज भाजी मार्केट उचलण्यात येऊ नये, मच्छिमार्केट पहिल्याच ठिकाणी बसविण्यात यावे, शहरातील इतर भागात बसणा-या व्यापा-यांना एकाच ठिकाणी विक्रीसाठी बसविण्यात यावे, मार्केट वेळोवेळी सॅनिटाईज करण्यात यावे, फॉगिग मशिनचा वापर न करता स्प्रे पंपाचा वापर करुन फवारणी करावी, शहरातील रखडलेली विकास कामे लवकर पूर्ण करावीत अशा सूचना नगरसेवक, नागरीक व व्यापारी यांनी मांडल्या.
अनलॉक ४ मधील शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्याच्या सर्व सीमा खुल्या झाल्यामुळे मजूर कामगार यांची उपलब्धता होणार आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन महिन्यात मच्छिमार्केटचे काम युद्ध पातळीवर करुन लोकार्पण करण्यात येईल. मच्छिमार्केटच्या जागेत बदल होणार नसून तो सध्या मानसी गार्डनच्या समोरच सुरु राहणार आहे. तसेच शहातील इतर भागात बसणा-या भाजी विक्रेत्यांना कोरोना विषाणूंचा प्रादूर्भाव वाढत असल्याने मार्केटमध्ये बसविणे संयुक्तिक होणार नसल्याची माहिती नगराध्यक्ष गिरप यांनी दिली.
तर २४ तासात बाहेर गावातून जाऊन येणा-या व्यक्तीला क्वारंटाईन केले जाणार नाही. परंतु जिल्ह्यातून व राज्यातून वेंगुर्ल्यात वास्तव्यास येणा-या व्यक्तील १४ दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. तसेच शासनाच्या नविन नियमानुसार एखाद्या नागरीकाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल परंतु त्याला कोणतीही लक्षणे दिसून येत नसल्यास अशा रुग्णांना होम आयसोलेशन करता येते. फक्त अशा रुग्णांच्या घरी वेगळी खोली आणि संडास-बाथरुमची व्यवस्था असणे आवश्यक असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर-सामंत यांनी दिली.