वेंगुर्ला प्रादेशिक फळ संशोधन येथे २२ जुलै रोजी राष्ट्रीय आंबादिनानिमित्त आंबा पीक व्यवस्थापनाबाबत शेतकरी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले होते. मागील ३ वर्षे सातत्याने पावसाचे प्रमाण वाढत असून डिसेंबरपर्यंत पाऊस पडत आहे. त्यामुळे आंब्याला पालवी येऊन मोहोर येण्याची प्रक्रिया लांबणीवर पडते. याबाबत डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठामध्ये संशोधन चालू आहे. भविष्यात या संशोधनाचा उपयोग आंबा बागायतदारांना होणार असल्याचे प्रतिपादन सहयोगी संशोधन संचालक डॉ.बी.एन.सावंत यांनी केले.
तांत्रिक सत्रात उद्यानविद्यावेत्ता डॉ.एम.एस.गवाणकर यांनी आंबा लागवड समस्या व उपाययोजना याबाबत, हापूस आंबा भौगोलिक मानांकन विषयाचे मार्गदर्शन डॉ.विवेक भिडे यांनी ऑनलाईन, आंबा निर्यात विषयक मार्गदर्शन मिलिद जोशी यांनी, आंबा पीक सरंक्षणाबाबत किटकशास्त्रज्ञ डॉ.ए.वाय.मुंज व वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ.एम.बी.दळवी यांनी तर डॉ.एम.नी.सणस यांनी आंबा पुनरुज्जीवन यावर मार्गदर्शन केले. योगेश प्रभू यांनी आंब्यामध्ये भौगोलिक मानांकनामध्ये कोकण कृषी विद्यापिठाने दिलेल्या योगदानाबद्दल समाधान व्यक्त केले.