बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ मालवण येथील बॅ.नाथ पै सेवांगणच्या दादा शिखरे सभागृहात करण्यात आला. यावेळी प्रा.आनंद मेणसे, बॅ.नाथ पै यांच्या नात अदिती पै, सेवांगणचे अध्यक्ष अॅड.देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष दिपक भोगटे, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, सुरेश ठाकूर, अॅड. संदिप निबाळकर यांच्यासह नाथ पै प्रेमी उपस्थित होते. याच कार्यक्रमात प्रा.मेणसे यांच्या ‘संघर्ष महाराष्ट्रात विलिन होण्यासाठी‘ या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. अदिती पै यांचा सेवांगण परिवारातर्फे सत्कार करण्यात आला.
बॅ.नाथ पै यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्ताने त्यांचे स्मरण करणे, त्यांच्या विचारांची उजळणी करुन कामाला लागणे, अर्थव्यवस्था समजून घेणे आवश्यक आहे. केंद्र सरकार जे काही चुकीचे निर्णय घेत आहे, त्यातून निर्माण होणा-या अरिष्ठाला भिडणारे निःस्पृह, धाडसी, जे त्याग करायला तयार करावी लागेल. याची सुरुवात सेवांगणच्या प्रांगणात करुया. यात एक सैनिक म्हणून खांद्याला खांदा लावून मी काम करेन, असे प्रतिपादन प्रा.आनंद मेणसे यांनी केले.
आज रेल्वे, बंदरे, एअरपोर्ट, खाण उद्योग, पेट्रोलियमची विक्री होत आहे. गॅसचा दरही वाढत आहे. हे होत असताना देशात उठाव होत नाही, ही चितेची बाब आहे. आज नाथ पै यांच्यासारख्या वक्त्यांची गरज आहे. लाखांच्या सभा घेऊन त्यांच्यात जोश निर्माण करण्याचे काम त्यांनी केले असते. नाथ पै यांचा विचार समतेचा, गांधीचा, सानेगुरुजींचा विचार आहे. त्यामुळे वैयक्तिक जीवनात जातपात मानणार नाही, भाषेचा द्वेष करणार नाही, अशी शपथ घेण्याची गरज आहे असेही प्रा.मेणसे म्हणाले.