मुलांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे प्रसंगी पालक, मित्रांचा सल्ला घ्यावा. स्वतःचे ध्येय कोणते हे जाणून अभ्यासात प्रामाणिकपणा, नियमितता आणून वेळेचे नियोजन करून अभ्यासातून पुढे जावे. असे मत कॅनरा बँक, वेंगुर्लाचे शाखाधिकारी धनराज पांडुरंग आंबेतकर यांनी नगरवाचनालय येथे विद्यार्थी पारितोषिक वितरण प्रसंगी व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर संसस्थेचे अध्यक्ष ॲड. सुर्यकांत प्रभूखानोलकर, उपाध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, कार्याध्यक्ष श्री. अनिल सौदागर, कार्यवाह कैवल्य पवार तसेच व्यासंगी वाचक पुरस्कार प्राप्त प्रा. अरविंद सावंत उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. आंबेतकर यांनी मार्गदर्शन करताना पुढे असे सांगितले की, बँक करिअर करणाऱ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा. मोबाईलचा वापर जनरल नॉलेज, व्हिडिओवरील न्यूज रेकॉर्डमध्ये ठेवून करावा. तसेच दररोज येणारी किमान दोन तरी वर्तमानपत्रे वाचावीत. आपले विद्यार्थीदशेतच असताना बँकेमध्ये खाते असावे कारण पुढे शैक्षणिक कर्ज हवे असल्यास त्याचा उपयोग होतो.
कोविडच्या मागील दोन वर्षात पर्यायी व्यवस्था म्हणून इंटरनेट, मोबाईलचे महत्त्व होते. परंतु शाळेतील अभ्यास, पाठांतर, मनन व त्यातील मजा इंटरनेटच्या खेळात नव्हती. आपणास प्रवासातून संस्कृती समजते. तसाच व्यवहार, धीटपणा व प्रॅक्टीकल नॉलेज कळते. या पुस्तकी ज्ञानातून अभ्यासू जीवनाची वाटचाल, आर्थिक बाजू विद्यार्थ्यास कळते. त्यासाठी वेंगुर्ले नगर वाचनालयातील ग्रंथांचा तिथल्या स्पर्धापरीक्षा पुस्तके, नियतकालीके यांचा वापर करावा असे संस्थेचे अध्यक्ष मा. ॲड सुर्यकांत प्रभूखानोलकर यांनी व्यक्त केले.
जीवनात काय ध्येय गाठावयाचे हे निश्चित केले पाहिजे. त्यासाठी निरंतर कष्ट हवेत. सन 1989 पासून आजपर्यंत दात्यांनी दिलेल्या देणगीतून विद्यार्थ्यांना पारितोषिके दिली जात आहेत. आत्मविश्वासापेक्षा जिद्द व ध्येय यातून विद्यार्थ्यांनी आपला विश्वास साधावा. असे संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. अनिल सौदागर यांनी सांगितले.
इयत्ता पहिली ते पदवीपर्यंतच्या सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीसे देण्यात आली. श्रीराम मंत्री यांनी सन 2002मध्ये दिलेल्या सुदत्त कल्याणनिधीतून स्वर्गीय सुमित्रा मंत्री स्मृती व्यासंगी वाचक पुरस्कार व स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ व रोख रुपये 500 असा यंदाचा पुरस्कार संस्थेचे नियमित वाचक तसेच कुडाळ ज्युनि. कॉलेजचे प्रा. श्री. अरविंद विश्राम सावंत यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. दिलेल्या पुरस्कारांचे वाचन संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य प्रा. महेश बोवलेकर यांनी केले. या कार्यक्रमास संस्थेचे कार्योपाध्यक्ष शांताराम बांदेकर, उपकार्यवाह माया परब, कार्यकारीमंडळ सदस्य दीपराज बिजितकर, मंगल परुळेकर, संस्थेचे स्थानिक हिशेब तपासनीस श्रीनिवास सौदागर साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे तसेच शिक्षक, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक, स्वागत आणि पाहुण्यांचा परिचय संस्थेचे कार्यवाह श्री. कैवल्य पवार यांनी करुन दिला. संस्थेला सुमारे 40 वर्षे देत असलेल्या विविध देणगीदारांच्या देणगीचा उल्लेख करुन संस्था राबवित असलेल्या वाचकस्पर्धा, शिक्षक-शाळा पुरस्कार, सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्त्व स्पर्धा तसेच साहित्यिक/पत्रकार/ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचारी पुरस्कार याबाबत माहिती दिली तर कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांनी आभार मानले.