उत्सव रानभाज्यांचा उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न

        ‘माझा वेंगुर्ला’ व लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘उत्सव रानभाज्यांचा’ अंतर्गत प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धेत तालुक्यातील महिलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सानिका नाईक (वेतोरे) यांनी बनविलेले ‘शतावरपासून शिरवळे’ प्रथम, सुमित्रा सावंत (वेतोरे) यांनी बनविलेल्या कोरफडच्या करंज्या व गोकर्णाचा चहा द्वितीय तर प्रियांका गावडे (वेेंगुर्ला) यांनी बनविलेली भरलेली फागली याला तृतीय क्रमांक मिळाला. उत्तेजनार्थ प्रथम संध्या  करंगुटकर (वेेंगुर्ला) यांनी बनविलेल्या सुरणाचा हलवा व द्वितीय क्रमांक श्रेया  रेडकर (वेेंगुर्ला) यांनी बनविलेल्या फातरीची भाजी व चाईच्या भाजीचे मोदक यांना मिळाला.

      पावसाळ्यात उगवणाऱ्या दुर्मीळ रानभाज्यांचे जतन व संवर्धन व्हावे, यासाठी माझा वेंगुर्ला आयोजित व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी पुरस्कृत उत्सव रानभाज्यांचा अंतर्गत स्वामिनी मंडप हॉलमध्ये प्रदर्शनात्मक रानभाजी पाककृती स्पर्धा भरविली होती. याचे उद्घाटन माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप व लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे रिझनल मॅनेजर आनंद सामंत यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर माझा वेंगुर्लाचे अध्यक्ष निलेश चेंदवणकर, सचिन वालावलकर, संजय पुनाळेकर, मंगल परूळेकर, मोहन होडावडेकर, सुनील नांदोस्कर, प्रशांत आपटे, जयप्रकाश चमणकर, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या मार्केटींग मॅनेजर साक्षी मयेकर, वेंगुर्ले शाखाधिकारी पुरुषोत्तम राऊळ, कुडाळ शाखाधिकारी ऋषिकेश सामंत आदी उपस्थित होते. मान्यवरांचे माझा वेंगुर्लाचे खेमराज कुबल यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

      माझा वेंगुर्ला ही संस्था गेली सहा वर्षे स्वतः कोणताही फायदा न बघता जे उपक्रम राबवित आहे, ते उपक्रम महत्त्वाचे आणि कौतुकास्पद उपक्रम आहेत. अशा जनतेशी निगडीत उपक्रमाला लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी नेहमीच प्रोत्साहन देते. असे प्रतिपादन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीचे रिजनल मॅनेजर आनंद सामंत यांनी केले. तर वनस्पती शास्त्रज्ञ बाळकृष्ण गावडे यांनी रानभाजीचे आपल्या जीवनातील महत्त्व आणि उपयोगिता याबाबतीत उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी रामचंद्र शृंगारे यांनी 100 रानभाज्या व औषधी वनस्पतींचे प्रदर्शन मांडल्याने या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.

      पाककृती स्पर्धेत वेंगुर्ले तालुक्यातील 50 गृहिणी, महिला बचतगट, निसर्गप्रेमींनी सहभाग घेतला होता. पॉप्युलरचे अमर दाभोलकर यांनी प्रथम क्रमांकासाठी पैठणी, गावडे होम अप्लायन्सच्या वतीने द्वितीय-तृतीय क्रमांकासाठी भेटवस्तू, चौथ्या-पाचव्या क्रमांकासाठी माझा वेेंगुर्ल्याच्या वतीने रोख पारितोषिके व सहभागी सर्व स्पर्धकांना लोकमान्य मल्टिपर्पजने आकर्षक भेटवस्तूंचे प्रायोजकत्व स्विकारले होते. स्पर्धेचे परीक्षण मंगल परूळेकर, संजय पुनाळेकर, प्रा. सुनील नांदोस्कर यांनी केले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी माझा वेंगुर्लाचे राजन गावडे, प्रदीप कुबल, कपिल पोकळे, वसंत तांडेल, गोविंद उर्फ दादा केळूसकर, अमृत काणेकर, पंकज शिरसाट, सदाशिव नाईक, हेमा गावस्कर, लिना यरनाळकर, ऋतुजा गावडे, सौ. कनयाळकर, यासीन मकानदार तसेच लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

      यानिमित्ताने संपन्न झालेल्या जंगल सफरीमध्येही अनेकांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शविला. यासाठी कुडाळ येथून रामचंद्र शृंगारे, रोहा-रायगड येथून निशांत पाटील, खर्डेकर महाविद्यालयाच्या प्रा. धनश्री पाटील यांनी विशेष सहाय्य केले.

      यावेळी कोविडकाळात कोरोना वॉरियर्स म्हणून काम केलेल्या ओेंकार तुळसुलकर, शशांक मराठे, सचिन बांदकर, अर्पिता वाटवे, समृद्धी मळेकर, नम्रता नेवगी, प्रशांत काराणी, डॉक्टर फॅटर्नीटी क्लबच्या वतीने डॉ. प्रल्हाद मणचेकर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तसेच आरोग्य चळवळीत पुढाकार घेणाऱ्या मोहन होडावडेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक व निवेदन  प्रशांत आपटे तर आभार निलेश चेेंदवणकर यांनी मानले.

Leave a Reply

Close Menu