शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण संपन्न

गुरुवर्य वि. स. खांडेकर विद्या प्रतिष्ठान शिरोडा या संस्थेकडे कै.राधाबाई गोविंद प्रभूसाळगांवकर व कै. गोविंद हरी प्रभूसाळगांवकर यांच्या स्मरणार्थ प्रभाकर प्रभू यांनी संस्थेकडे 32 लाख रुपयांची ठेव तर रघुवीर मंत्री यांनी, अ.वि.बावडेकर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या कन्या नंदिनी श्रीनिवास नाडकर्णी, तसेच कै.सौ. मंदाकिनी विष्णू खांडेकर व वा.श.नाबर यांनी सुद्धा संस्थेकडे ठेव ठेवली आहे. त्याच्या व्याजातून गरजू व होतकरु विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दरवर्षी शिष्यवृत्ती दिली जाते. हा शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला.

      यावेळी दहावीतून प्रथम आलेल्या तीन क्रमांकांना संस्थेच्या शिरोडा, आरवली व टांक हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना तसेच बारावी कला, वाणिज्य, शास्त्र व तांत्रिक संकुल शाखेतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख रकमेची बक्षिसे देण्यात आली. शिरोडा हायस्कूलची तिलोत्तमा शेलटे हिने दहावी परीक्षेत तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकाविल्याने तिचाही विशेष गौरव करण्यात आला. यावेळी संस्थेमार्फत तिला रोख रुपयांचे पारितोषिक तर संस्था उपाध्यक्ष माजी आमदार शंकर कांबळी यांनी स्वत: 5 हजार रुपयांचे पारितोषिक देऊन पुढील उच्च शिक्षणासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. दहावीचा निकाल जाहीर होताच चंद्रकांत ओटवणेकर यांनीही तिला रोख बक्षिस देऊन गौरविले होते. या कार्यक्रमाला संस्था अध्यक्ष चंद्रकांत ओटवणेकर, उपाध्यक्ष शंकर कांबळी, सचिव उमेश सुकी, प्रा. डॉ. श्रीराम दिक्षित, संस्था अधिक्षक पांडुरंग कौलापुरे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Close Menu