साधनेचा पहिला दिवस – पहिला साधना मंत्र..
एक स्त्री दुसऱ्या स्त्रीविषयी मत्सर.. व्देष.. टिंगल टवाळी वा अपमानास्पद शब्द वापरणार नाही.
दुसरा दिवस – दुसरा साधना मंत्र
प्रत्येक स्त्रीचे स्वतंत्र भावविश्व हे दुसऱ्या स्त्रीने सहज स्वीकारावे. या क्षणी ती अशी चुकीची वागली वगैरे म्हणून तिच्या, त्या क्षणाच्या भावनांचा उगाच पंचनामा करत व्यर्थ वेळ दवडवू नये, त्यापेक्षा समोरूनच तिला समजून घ्यायचा प्रयत्न करावा.
तिसरा दिवस – तिसरा साधना मंत्र
एक स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची स्पर्धक नसून सहाध्याय्यी असते. प्रत्येक स्त्रीची शक्तिस्थानी वेगळी व आपल्यातली शक्ती ओळखून ती वापरण्याची युक्तीस्थानी वेगळी. आपण कालीला दुर्गा म्हणत नाही, दुर्गेला शारदा म्हणत नाही. प्रत्येकीने आपण कोण हा आपला शोध आपणच लावावा.
चौथा दिवस – चौथा साधना मंत्र…
प्रत्येक स्त्रीने स्वतःतील दिव्य देवीतत्व ओळखुन पारखुन उजाळुन घ्यावे. त्यानंतरच पुरुषातील देवतत्वावर नतमस्तक व्हावे. हीच तिच्या शालिनतेची रित असावी.
पाचवा दिवस – पाचवा साधना मंत्र…
स्त्रीला “अबला“ ही उपाधी पुरुषांनी दिली असली तरी स्त्रीयांनी या उपाधीस “वृत्ती“ म्हणुन अंगी भिनवली.. यात पुरुषांचा दोष की स्त्रीचा?
सहावा दिवस -सहावा साधना मंत्र…
ग्रिष्मातील प्रखरतेमुळे बिज स्वतःला जमिनीत खोल गाडुन घेते. वर्षा ऋतूतील पाऊस व जमिनीच्या नांगरणीनंतरच ते रुजुन फुलुन येते. तद्वतच स्त्रीस अनुकुल समाजव्यवस्था असल्याशिवाय ती सर्वगुणालंकाराने बहरुन समाजास मिळणार नाही.
सातवा दिवस – सातवा साधना मंत्र..
घर म्हणजे विसावा, घर म्हणजे निवांतपण, घर म्हणजे आपण स्वतःला भेटण्याची जागा. कामावरुन दमुन आलेल्या स्त्रीला जरा वेळ तरी भेटु द्यावे निवांत स्वतःशी.. त्याशिवाय ती इतरांच्या वाट्याला कशी येणार?
आठवा दिवस – आठवा साधना मंत्र…
झरा, ओढा, नाला, नदी, खोरे सगळे शेवटी समुद्रालाच समृध्द करतात. बहिण, सखी, पत्नी, मुलगी आत्या, मावशी, नणंद, मेव्हणी आणि आई प्रत्येकीच्या भुमिका, कर्तव्ये वेगळी. ज्याच्या पायी आपापल्या प्रेमाची पायली रिती करायची मापेच भिन्न तिथे कुरघोडी ती कसली.
नववा दिवस- नववा साधना मंत्र..
अमृताला उचलुन दुसरा पदार्थ ताटात ठेवावा असा पर्याय विश्वात उपलब्ध नाही. स्त्रीतत्व, व जीवन हे पर्यायी शब्द आहे. ही स्त्रीची महत्ता आधी स्त्रीने जाणावी व आपल्याच बाह्यरुपापेक्षा आभ्यंतर स्त्रीतत्वाचे रक्षण करावे.
वैद्य- सुवर्णा सोनारे-चरपे.
7038381553